

सांप्रतकाळी, मद्यपानाची घातक सवय जडल्याने रोज रात्री नव्या थापा मारुन घराबाहेर पळणारे,
मध्यरात्रीनंतर लटपटत घरात शिरणारे (क्वचित दुसर्याच्याही), आणि सकाळी सार्याचा पश्चात्ताप
करुन दारु सोडण्याचा निश्चय करणारे नवरोबा आणि त्यांना व्यसनापासुन परावृत्त करण्यासाठी
ढसाढसा रडणे, अबोला धरणे, माहेरी निघुन जाणे, रात्री उशीरा घरी आल्यास दरवाजा न उघडणे
वगैरे निष्फळ खटाटोप करणार्या त्यांच्या अर्धांगिनी हा आमच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
त्यामुळेच शासनाचा जसा एक शासकीय दृष्टीकोन असतो, तसा आमचा स्वतःचा एक खास असा
चषकीय दृष्टीकोन तयार झाला आहे. याच सुमारास मराठीत अमाप पिकत असलेला 'चारोळ्या' नामक
काव्यप्रकार [मी माझा वगैरे] आम्ही या दृष्टीकोनातून वाचला आणि या चषकीय चारोळ्या तयार झाल्या.
या चषकात ज्यांना आपलेच प्रतिबिंब दिसेल त्यांनी तो निव्वळ योगायोग समजू नये... चिअर्स!
♫
No comments:
Post a Comment