Wednesday 3 February 2010

दुसरा बाजीराव

एक व्यक्तिचित्र
श्रीमंत बाजीराव रघुनाथराव पेशवे यांच्याबद्दल मराठी इतिहासात 'पळपुटा बाजीराव', 'देशबुडवा', 'रावबाजी' असे अनेक कुत्सित उदगार उपलब्ध आहेत. सामान्य मराठी माणूसच नव्हे, तर मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासावर हक्क सांगणारे पंडितही बाजीरावांची अशीच संभावना करतात. हे पाहिलं म्हणजे या शेवटच्या पेशव्याइतका दुर्दैवी माणूस इतिहासानं पाहिला नाही, असंच म्हणावं लागतं.
पण हा शेवटचा पेशवा_ दुसरा बाजीराव खरोखर इतका नादान होता का? त्याच्या व्यक्तिमत्वाचे जे जे पैलू मुद्दाम आमच्यासमोर भडकपणे मांडले जातात, त्याचा वास्तविक अर्थ काय आहे? त्याखेरीज बाजीरावाच्या व्यक्तिमत्वाला दुसरे काही पैलू आहेत का? आणि बाजीरावाविरुद्ध म्हणून जो पुरावा मांडला जातो, तो तरी बिनतोड आहे काय? अनेक प्रश्न आहेत, त्यांची सुसंगत आणि तर्काला पटणारी उत्तरं देण्याचं टाळता येणार नाही. या उत्तरातूनच खरा बाजीराव मराठी माणसासमोर उभा राहणारआहे.
बाजीरावाचा जन्म धारच्या किल्ल्यात झाला. त्याचे वडील दादासाहेब आणि आई आनंदीबाई हि त्यावेळी या किल्ल्यात जवळ जवळ बंदिवासातच होती. पुढे, मराठी राज्याचा मालक झालेला बाजीराव आपला जन्म बंदिवासात झाला, आणि बंदिवासाला कारण पुण्यातली जुनी समजली जाणारी मुत्सद्दी मंडळी, हि गोष्ट कधीही विसरू शकला नाही.
याच संदर्भात बाजीरावाचे बालपण आणि किशोरपण कसं गेलं ते पाहण्याजोगे आहे. बाजीरावाच्या जन्मापासून ते, तो गाडीवर येईपर्यंत तो कुणाच्या ना कुणाच्या आज्ञेवरून एकसारखा कैदेतच आपल्या आईच्या सानिध्यात होता. आयुष्यातली बहुतेक सारी संस्कारक्षम वर्षे कैदेतच गेली, आणि तीही आनंदीबाई सारख्या अत्यंत महत्वाकांक्षी स्त्रीच्या छायेत गेली; या घटनांचा फार खोल ठसा बाजीरावाच्या मनावर उमटला होता.
आनंदीबाई हि अपमान विसरणारी स्त्री नव्हती. दादासाहेबांच्या भोळ्या स्वभावानं तर जखमेवर मीठ चोळाव, अशा वेदना तिला होत होत्या. नारायणरावांच्या खुनाचं निमित्त करून बारभाईनी आपला मुत्सद्देगिरीत पराभव केला, हे शल्य तिला एकसारखं सलत होतं. तिची ती तडफड, जळजळ, मळमळ ती एकसारखी शब्दांतून व्यक्त करत होती; हे शब्द निखाऱ्यासारखे बाल बाजीरावांच्या मनावर चटके देत होते. एकसारखं वर्षानुवर्ष हे चालू होतं. हा कडवटपणा किती दाहक होतां त्याचा हा नमुना पहा:
बंदिवासात आनंदीबाईला पुत्र झाला. कसंही झालं तरी ती एके काळची पेशवीण होती. मराठी राज्याची नौबत उत्तरेत फडकवणाऱ्या थोरल्या बाजीरावांची सून होती, अटकेपार भीमथडी तट्टाच्या टापाची धूळ उडवणाऱ्या राघोभरारीची धर्मपत्नी होती. तिला पुत्र झाला होतां; तो समारंभ त्याच तोलामोलानं व्हावा, हि तिची अपेक्षा. हत्तीवरून साखर वाटली जावी, सुवासिनींनी दारासामोर जलकुंभ रिते करावेत आणि ओघळ नदीला मिळावा, हे तिचं स्वप्न. पण काय झाल? काही नाही! पुत्र जन्माची हि वार्ता ऐकून पुण्यात नाना फडणीसांनी आपली काटकुळी मान एकदा फक्त हलवली, आणि तो खलिता बाजूला ठेऊन दिला, तेंव्हा बाई काय म्हणाली हे पाहण्यासारखं आहे. ती म्हणाली, "पहिला एक वैरी होतां, त्याला बंद केला होतां. पुढे दुसरा वैरी निर्माण झाला अआहे, त्यास दु:ख झाले, त्यामुळे शर्करा विस्मरण झाले!" पुण्यातील मुत्सद्यांबद्दल आपल्या आईचे हे उदगार बाजीरावांच्या लहानपणी कानी पडत होते.
या बंदिवासात बाजीरावाचे शिक्षण नीट होऊ नये, याची दक्षता नाना फडणीसांनी घेतली होती. ठोसर नावाचा शिक्षक कोपरगावी बाजीरावाला शिकवण्यासाठी ठेवला होता. तोही फक्त अक्षर, पाढे, आणि जुजबी गणित शिकवण्यासाठी. पेशव्यांच्या घराण्यातल्या या मिळाला शस्त्रास्त्रांच काही शिक्षण मिळावं, लढाईतील डावपेचात तो तरबेज व्हावा याव्ही नानांनी बुद्धिपुरस्सर हेळसांड केली. ठोसराना या ना त्या सबबीवर पुण्याला बोलावून महिनोंमहिने पुण्यात थांबवून घेऊन, बाजीरावाच्या शिक्षणात खंड पडेल तेवढा पाडण्याचा नानांनी प्रयत्न केला.
कोपरगावच्या या कैदेत बाजीरावाजवळ अत्यंत हलक्या दर्जाचे लोकच फक्त राहतील, हि काळजी नानांनी घेतली होती. बाहेर कुणाशी बोलायचं झाला, पत्र पाठवायचं झालं, गाठीभेटी घ्यायच्या असल्या, तर त्या साऱ्या पुण्याहून नाना फडणीसांच्या दीर्घसूत्री कारभाराच्या घोळातून परवानगी आणूनच कराव्या लागत. कित्येकदा हि परवानगी मिळतच नसे. अशा वातावरणात बाजीरावाला आईबरोबर धर्मकृत्यांत व उपासतापासात आणि भट-भिक्षुकांच्या कर्मकांडात वेळ घालवावा लागत होता.
मराठी इतिहासातील अत्यंत आणीबाणीच्या काळात राज्याची धुरा वाहण्यासाठी नियतीनं ज्याला मुक्रर केलं होतं, त्या बाजीरावाच त्या पदासाठी शिक्षण हे असं झालं होतं; आणि तेही नाना फडनिसांसारख्या चौफेर दृष्टीच्या माणसाच्या देखरेखीखाली.
अशा बाजीरावाची नाना फडनिसाना आठवण झाली ती सवाई माधवरावांचा अपघाती मृत्यू झालं तेंव्हा; पण त्याही वेळी नानांची जिद्द अशी कि, दुसरा कुणीही फडतूस माणूस मी पेशव्यांच्या गाडीवर बसवीन; पण रघुनाथदादांच्या वंशजाला पेशवा म्हणून कदापीही मुजरा करणार नाही. पण शिंद्यांच्या जोरावर नानांना हा हट्ट सोडवा लागला, आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी बाजीराव पेशवेपदावर आरूढ झाला.
या वेळी मराठी राज्य फार कठीण अवस्थेतून जात होते. एकजात कर्ती माणसं एकापाठोपाठ एक मृत्यू पावली होती, त्यांच्या मागे वारसासाठी कलह सुरु झाले होते, आणि अशा संधीची वाट पहात बसलेला इंग्रज पुढं सरू पहात होता; त्या वेळी जरूर होती ती एकजुटीची, पेशव्यांच्या झेंड्याभोवती एकदिलान उभं राहण्याची; पण घडत होतं वेगळंच. त्या काळचा एकमेव मुत्सद्दी नाना फडणीस 'अंगठीतला हिरा बदलायचा आहे' अशा सांकेतिक शब्दांनी बाजीरावाला गादीवरून खाली ओढण्यात गर्क झाला होता. अननुभवी असला तरी बाजीरावांकडे आनंदीबाईकडून कारस्थानीपणाचा वारसा भरपूर आलेला होता. नानांचा तो डाव ओळखून होता. त्यांना शह देण्यासाठी त्यानं शिंद्यांच मोहोरं पुढं केलं, आणि नानांवर प्यादी केली. शहाला काटशह सुरु झाले. आणि मराठी राज्याचे मालक आणि मुत्सद्दी एकमेकांना खाली ओढू लागले.
परिणामत: दोघेही खाली आले, आणि वसईच्या तहाने इंग्रज घरात घुसला. त्या तहाची भयानकता शिंदे, भोसले, होळकर या जुन्या सरदारांना समजली; पण खुद्द बाजीरावाला मात्र वाटले कि, हि तात्पुरती सोय आहे; आपण यातून निभाऊन जाऊ, आणि तो तसा निभावून गेलाही असता. पण तो गादीवर आल्यापासून असं काही संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं कि, त्यातून मी मी म्हणणार्यांना बाहेर येत येईना, आणि हळूहळू खुद्द पेशव्यांचेच सरदार इंग्रजांच्या अमिषाला बळी पडून एकेक त्यांच्या कच्छपी लागले. यावेळी बाजीराव मोठ्या खोड्यात सापडला होता. राज्यकारभार सुसूत्र चालावा म्हणून त्यानं थोडं कडक धोरण स्वीकारलं कि, त्यांच्याविरुद्ध न्याय मागण्यासाठी म्हणून त्यांचे सरदार इंग्रजांकडे जाऊ लागले;सौम्य वागावं म्हटलं, तर त्यांचा बंदोबस्त न राहून लहानमोठी बंड उभी राहू लागली,आणि त्याचा उपशम करण्यासाठी इंग्रजांचा तगादा लागू लागला. वसईच्या तहान मोठ्या कौशल्यानं हे दुष्टचक्र इंग्रजांनी पेशव्यांच्या गळ्यात अडकवलं होतं. बाजीरावांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर, अशी झाली होती.
हा इंग्रजी फासा उदाहरणाशिवाय समजण्याजोगा नाही. बापू गोखले हा पेशव्यांचा शूर सेनापती म्हणून उत्तर पेशवाईत गाजला.पेशव्यांचा सेनापती म्हणून मोठी खडी फौज जय्यत तयार ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. हि जबाबदारी पार पडता यावी, म्हणून त्याला मोठा सरंजाम लाऊन दिला होता. गोखले हा सरंजाम खात, पण त्याच्या पोटी घोडदळ ठेवण्यास मात्र टाळाटाळ करीत. सरंजामदारांनी ठेवायच्या घोडदळाचे बारीक सारीक तपशिलासह वर्णन पेशव्यांच्या दप्तरात असे. एकदा बाजीरावाने गोखल्यांच्या घोडदळाची पाहणी करण्याचा हुकुम दिला. तीस हजार घोडदळऐवजी जेमतेम सात-आठशे घोडदळ बापुंजवळ निघालं. पेशव्यांनी जाब विचारताच 'अन्याय! अन्याय!' असं ओरडत हा सेनापती इंग्रजांकडे गेला आणि त्यांनी मध्यस्थी करावी, म्हणून त्यांची मनधरणी करू लागला; त्यांना मेजवान्या, भेटी देऊ लागला. थोड्याफार फरकांत पेशव्यांच्या साऱ्याच जहागिरदारांचा आणि सरंजामदारांचा हाच प्रकार होता. पेशव्याकडून मिळालेली जहागीर खायची, पण त्याबरोबर येणारी जबाबदारी टाळायची, आणि पेशव्यांनी त्याबद्दल दरडावून विचारलं कि, इंग्रजांकडे जायचं, याच मनोवृत्तीतून इंग्रजांच्या मध्यस्थीने बाजीरावाचा जहागिरदारांशी पंढरपूरचा तह झाला, व मध्यस्थ म्हणून दोन्ही पक्षांकडून इंग्रजांना प्रतिष्ठा प्राप्त झाली; म्हणजे वसईच्या तहाने जे जोखड बाजीरावाच्या मानेवर बसलं ते त्याच्याच जहागिरदारांच्या नादानपणामुळे पक्कं झालं; ढिलं झालं नाही.
दिवसेंदिवस मराठी राज्यात इंग्रजांचा झालेला हा आक्रम वाढतच चालला. युद्धासारख्या धकाधकी पासून दूर राहणाऱ्या बाजीरावाने अखेरीस ओळखले कि, या जिण्यातून मुक्त होण्यापेक्षा सोक्षमोक्ष करण्यासाठी इंग्रजांशी उघड युद्ध पुकारण्यावाचून गत्यंतर नाही. सर्व उपाय थकल्यावर त्यानं युद्ध पुकारलं, आणि त्या युद्धात तो हरला. इंग्रजांचं राजकारण आणि युद्धकारण दोन्हीही वरचढ ठरलं, आणि खडकीच्या लढाईपासून सुरुवात झालेल्या युद्धाच्या धूळकोटाचा शेवट झालं, त्यात मराठी राज्य नष्ट झालं. इंग्रजांनी दिलेल्या अटीवर तह पत्करून बाजीराव ब्रम्हावर्ताला निघून गेला.
दिवसेंदिवस मराठी राज्यात इंग्रजांचा झालेला हा आक्रम वाढतच चालला. युद्धासारख्या धकाधकी पासून दूर राहणाऱ्या बाजीरावाने अखेरीस ओळखले कि, या जिण्यातून मुक्त होण्यापेक्षा सोक्षमोक्ष करण्यासाठी इंग्रजांशी उघड युद्ध पुकारण्यावाचून गत्यंतर नाही. सर्व उपाय थकल्यावर त्यानं युद्ध पुकारलं, आणि त्या युद्धात तो हरला. इंग्रजांचं राजकारण आणि युद्धकारण दोन्हीही वरचढ ठरलं, आणि खडकीच्या लढाईपासून सुरुवात झालेल्या युद्धाच्या धूळकोटाचा शेवट झालं, त्यात मराठी राज्य नष्ट झालं. इंग्रजांनी दिलेल्या अटीवर तह पत्करून बाजीराव ब्रम्हावर्ताला निघून गेला.
मराठी राज्य लयाला गेलं आणि दक्षिणेत इंग्रजी अंमल निर्वेध चालू झाला, त्याच वेळी जहांबाज इंग्रजी मुत्सद्दी एल्फिन्स्टन राज्याची स्थिरस्थावर करीत होता. त्यानं विजेत्याचा गर्व मिरवला नाही; तसं तो करता तर, असंतोष धुमसून त्यांच्या स्फोटात तो व त्याच राज्य नष्ट झालं असतं. तेवढं समजण्याची अक्कल त्याच्यापाशी होती. त्यानं मराठी माणसाची मने पोखरण्याचे काम प्रत्यक्ष मराठेशाही नष्ट होण्याअगोदर आठ वर्षापासून सुरु केलं होतं, ते काम आता जोमानं हाती घेतलं. या कामाचा प्रमुख भाग म्हणून त्यानं शर्करावगुंठीत शब्दात आपलं भ्रामक तत्वज्ञान त्या वेळच्या बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मराठी माणसाच्या गळी उतरवलं. त्याचा सिद्धांत असं कि, 'तुम्ही मराठी माणसं तशी फार शहाणी, मोठी; तुमचा धर्मही फार थोर; पण तुमचा हा पेशवा फार नादान! राज्य कसं चालवावं, याची त्याला अक्कल नाही.त्याचे अधिकारी तुमच्यावर जोरजबरदस्ती करतात, तुमची वित्तविषय हरण करतात, असं जुलमी सत्तांपासून तुमची सुटका करून, तुम्हाला सुखासमाधानान आपापला व्यवसाय, शेतीभाती करता यावी, म्हणून आंम्ही हा प्रपंच केला.' हे भ्रामक तत्वज्ञान एल्फिन्स्टननं एवढ्या प्रभावी शब्दांत मांडले कि, आज दीडशे वर्षे झाली, एवढं पाणी वाहून गेलं, तरी ते आपली पकड सोडत नाही! एल्फिन्स्टन चा कावा, ढोंग मराठी माणसाला आकलला नाही; ज्या थोड्यांना तो आकालला आणि ज्यांनी त्याला विरोध केला, त्यांचा त्याने पद्धतशीरपणे काटा काढला. शब्दांचं अवडंबर दूर करून बोलायचं तर, त्यांचे त्याने खून केले, जन्मातून उठवलं. या दहशतीने बाकीचे गप्प बसले, याउलट ज्यांनी त्यांच्या होत हो मिळवला त्यांचं त्यानं कोटकल्याण केलं. या लोकांना हाताशी धरून एक नातू संप्रदाय तयार केला. त्यांच्या मदतीनं त्यानं इंग्रजांच्या दुष्कृत्यावर पांघरूण घातलं, मराठ्यांच्या राईएवढ्या दोषांचे पर्वत करण्याचा चमत्कार करून दाखवला, त्याला एत्तदेशीय तथाकथित तज्ञ मिळाले, त्यांनी देशभक्ताविरुद्ध साक्षी दिल्या, हव्या तशा जबान्या आणून दिल्या.
नको ते कागद पद्धतशीरपणे नष्ट केले, इतिहास लिहिण्याच्या नावावर अत्यंत हिडीस, असत्य लिहून ठेवली. असत्य उघडकीला येऊ नये म्हणून, त्याल सत्याची झिलई दिली. खोटे कागद, खोटे दस्त ऐवज, खोट्या जबान्या, कशा कशाची तमा न बाळगता, अत्यंत धूर्तपणे मराठी माने पोखरून मराठी राज्यकर्त्यांविरुद्ध लोकमत तयार केलं, आणि इंग्रजी अंमल पक्का केला.
आज बाजीरावाबद्दल जो मतप्रवाह प्रचलित आहे, त्याचा हा उगम आहे. एल्फिन्स्टन हा बाजीरावाचा कट्टा दुश्मन, त्यानं बाजीरावाबद्दल लिहिताना वाईट लिहिण्याचं कांही बाकी ठेवलं नाही, त्यामुळे विलायतेतल्या डायरेक्टर यांनाही एल्फिन्स्टनची कृती समर्थनीय वाटू लागली. मराठी इतिहासातील शेवटच्या पेशव्यासंबंधी कुठलंही इंग्रजी साधन पाहिलं, तर त्याचा उगम एल्फिन्स्टन पाशी लागतो; त्याच्याच मताची री पुढं साऱ्यांनी ओढली आहे. शिक्षित मराठी माणसाच्या मनावर या मताचा एवढा बसला कि, अनेक कारणासाठी, सम्यक अभ्यास झाला नाही; त्यामुळे या शेवटच्या पेशव्यावर इंग्रजांनी केलेला अन्याय अद्याप चालू आहे.
इतिहासात त्रिकालाबाधित काही असत नाही. वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या साधनाद्वारे तपासून घ्यावे लागतात; जरूर तर बदलावे लागतात, किंवा नवीन स्वीकारावे लागतात.शेवटच्या पेशाव्याबद्दल नवीन साधनाद्वारे विचार केला,तर त्याचं व्यक्तिचित्र अगदी वेगळं दिसू लागतं.
बाजीरावाला मोठं दूषण लावलं जातं ते 'पळपुटा' म्हणून. शेवटच्या लढाईत बाजीराव पुढं पळत होता; मागे इंग्रजांची फौज होती, हे हे खरं; पण बाजीरावाचा पळ हा लढाईतून पराभव झालेल्या माणसाचा पळ नव्हता; या पळात हुलकावण्या होत्या, अनुकूल वाटल्यास एखाद्या ठिकाणी ठासून युद्धाला तोंड देण्याची तयारी होती, प्रचंड फौज बरोबर घेऊन वेगाने कूच करण्याचं कौशल्य होतं, त्यातही कांही अंदाज होते, पण दुर्दैवाने ते चुकीचे ठरले.भोसले व शिंदे यांच्या फौजांना जाऊन मिळण्याचा त्याचं विचार होता, आणि ते सध्या होईपर्यंत हुलकावण्या देत पळन्याशिवाय गत्यंतर नव्हते. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धातील पळणाऱ्या जर्मन सेनापती, रोमेलची आठवण करावी, म्हणजे युद्धशास्त्रात शत्रूला हुलकावण्या देत पळत राहणे हा देखील एक युद्धप्रकार आहे, हे लक्षात येईल; पण बाजीरावाचा पराभव झाला आणि लगेच त्याच्या नादानंपणाच्या जाहिराती फडकवण्यात आल्या, त्यामुळे त्याच्या शेवटच्या पळाची शहानिशा करण्याची कुणी तसदी घेतली नाही; त्याचं नादानपणा, पळपुटेपणा गृहीतच धरला गेला; पण हा पळ पराभवाच्या पोटी निर्माण झाला नसून, पुढे काहीतरी राजकारण योजून पद्धतशीरपणे झाला होत होता, हे लक्षात घेतलं म्हणजे त्याचं महत्व लक्षात येत.
या आरोपाबरोबरच इंग्रजांनी बाजीरावाच्या भित्रेपणाबद्दल अनेक कंड्या उठवल्या. तो भित्रा होता, तोफांचे आवाज ऐकून त्याची घाबरगुंडी उडत असे, त्यामुळे आपल्या स्वागताच्या वेळी तोफांचे आवाज ऐकून त्याची घाबरगुंडी उडत असे , आपण दूर गेल्यावर ते काढावेत, असा हुकुम दिला होता, अशीही कंडी पिकवली होती.
बाजीरावाने स्वतः हातात तलवार घेऊन रणात उडी घेतली नव्हती हे खरं; त्याच कारण म्हणजे त्याला प्रत्यक्ष शस्त्रांच शिक्षणच दिलं गेलं नव्हतं. मर्दानी खेळांपासून त्याला मुद्दाम दूर ठेवलं होतं. पण हातात शास्त्र न धरणं वेगळं आणि स्वभाव भित्रा असणं वेगळं. कोपरगावी असताना भर पुरात नदीत पोहण्याचा नाद बाजीरावला होता, असे उल्लेख पेशवे दप्तरात आहेत. त्याचं शरीर बळकट होतं, चांगल्या मेहनतीचं होतं, असा पुरुष तोफांच्या आवाजाला घाबरेल, हि गोष्ट तर्काच्या पलीकडे आहे.
बाजीरावाच्या ज्या दुर्गुणांच इंग्रजांनी भांडवल केलं तो दुर्गुण म्हणजे त्याचा स्त्रैणपणा. या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे, आणि ती म्हणजे इंग्रज स्वतःच्या चालीरीतीवरून बाजीरावाच मोजमाप करीत होते. बाजीरावकालीन मराठी समाजात मोठ्या स्थानावरील माणसाकडे एकदोन लग्नाच्या बायका आणि एकदोन अंगवस्त्र असणं हि अगदी मामुली गोष्ट समजली जात होती. बाजीराव या बाबतीत थोडा सढळ होतं इतकंच पण त्याचं वर्तन त्या काळच्या रूढ व्यवहाराच्या दृष्टीने अनैतिक होते, असा कोणताही पुरावा इंग्रजांनी पुढे मांडलेला नाही. इंग्रजांचे आरोप पद्धतशीरपणे मोघम होते. बाजीराव शनिवारवाड्यात मोठ्या मोठ्या सरदारांच्या बायकांना बोलावीत असे, आणि तेथे अत्यंत निंद्य असा व्यभिचार चालत असे, अशी वावडी उठवून इंग्रजांनी बाजीरावाबरोबर गोखल्यांची आणि रास्त्यांची नालस्ती केली आहे. पण या कपोल कल्पित हकीकतीला तत्कालीन कागदातून कुठेही निर्विवाद दुजोरा नाही. जे तुटपुंजे उल्लेख आहेत ते, इंग्रजांच्या कच्छपी लागलेल्या लोकांनी लिहिलेल्या एखाद-दुसऱ्या बखरीतून, नाहीतर कैफियतीतून. पण इंग्रजांची मर्जी संपादन करण्याच्या हेतूतून या बखरी किंवा कैफियती निर्माण झाल्यामुळे, त्यातले उल्लेख सत्याच्या निकषावर टिकत नाहीत. याचा असाही अर्थ नाही की, बाजीराव त्या काळच्या फुटपट्टीने सोवळा होतं. तो विलासी जरूर होता; पण त्याच्या विलासीपणाला जे हिडीस रूप इंग्रजांनी दिलं आहे ती मात्र निव्वळ त्यांची हातचलाखी आहे. क्षणभर अशी कल्पना करूया कि, त्यावेळी बाजीरावाचा जय होऊन इंग्रजांचा पराभव झाला असता, तर खुद्द इंग्रजांचीच नैतिक दृष्टीने गर्हणीय अशी कितीतरी कृत्ये उजेडात आली असती; पण तसं व्हायचं नव्हतं, म्हणून बाजीराव स्त्रैण ठरला आणि ते साळसूद ठरले.
याउलट बाजीरावाच्या बाजूनं सांगण्याजोग्या कांही गोष्टी आहेत, त्यांचा इंग्रजांनी चुकुनही उल्लेख केला नाही. बाजीराव कपटी होता, त्याच्याजवळ सभ्यता नावालाही नव्हती, औषधालाही नव्हती, हे इंग्रजांचे मत. पण तुमच्याविरुद्ध युद्ध पुकारलं आहे, असं बाजीरावान स्पष्ट शब्दात इंग्रजांना अगोदर कळवले होते; हे कपटी स्वभावाचं लक्षण खचितच नव्हे. इतकंच काय पण त्याआधी एल्फिन्स्टनला बोलून नि:संधीग्ध शब्दात बाजीरावान आंपण इंग्रजी नीतीला कसे विटलो आहोत, हे साहेबाला ऐकवलं होतं. कडक सोवळंओवळं पाळणारा बाजीराव शानिवावाड्यात इंग्रजी डॉक्टरना खुशाल वाटेल तिथं फिरून औषधोपचार करायला परवानगी देतो, खुद्द आपल्या बायकोला देवीची लस टोचून पुण्यातल्या लोकांसमोर उदाहरण ठेवतो, या गोष्टी फार बोलक्या आहेत. लग्नात मुलीचा पैसा घेऊ नये, घेतल्यास दंड होईल असं फतवा त्याच पेशव्याने काढला आहे. प्रजेची काळजी असलेल्या सुसंस्कृत राज्यकर्त्याचे हे लक्षण म्हणायचं का नादान राज्यबुडव्याचे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. वन महोत्सवाचा गाजावाजा आज आपण ऐकतो; पण त्या धामधुमीच्या काळातही हजारो वृक्ष लाऊन ते चांगले जोपासतील याची तरतूद बाजीरावान केली होती, हि गोष्ट उपेक्षणीय खास नाही. खाटिक गोहत्या करतात असं समजताच, त्याचा तत्परतेने बंदोबस्त करणारा पेशवा अगदीच नादान असेल काय? बाटून ख्रिस्ती झालेल्यांना पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मात घेण्याइतका उदार असलेला हा मराठी राज्याचा धनी, पट्टीच्या ब्राह्मणाबरोबर वेदमंत्र म्हणू शकणारा हा ब्राह्मणगडी इंग्रज रंगवतात तेवढा वाईट असेल यावर विश्वास बसत नाही.
बाजीराव स्वतः हिशेब लिहित असे. कित्येक हिशेब त्याने सांकेतिक भाषेत लिहून ठेवले आहेत, ते वाचता आले तर चंद्राची दुसरी बाजू दिसावी अशी मौलिक माहिती उजेडात येणार आहे.
असं हे बाजीरावाच व्यक्तिचित्र खोट्या इतिहासानं डागाळलेलं आहे. मग बाजीराव पेशवा होता तरी कसा? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर सोपं आहे. नारायणराव पेशवा किंवा सवाई माधवराव पेशवा यापेक्षा बाजीराव खासच वाईट नव्हता. त्यांच्या वेळची परिस्थिती त्याला लाभती, तर इतिहास काही वेगळा घडला असता. पण तो गादीवर आल्यापासून पुण्यात जे जे मुत्सद्दी होते, त्यांनी त्यांनी त्याच्याविरुद्ध कटकारस्थान करायला सुरुवात करून स्थिर राज्यकारभार करण्याइतकी उसंतच त्याला मिळू दिली नाही. नियतीनं त्याच्याविरुद्ध कट करावा, अशीच परिस्थिती उत्पन्न झाली. साडेतीन शहाण्यांपैकी शहाणे नाना फडणीस यांनी आपल्या आयुष्यातील अखेरची वर्षे बाजीरावाविरुद्ध कारस्थानं करण्यात घालवली; महाडला बसून प्रचंड राजकारण उभं केलं. खर्ड्याच्या लढाईत मिळवलेला विजय होत्याचा नव्हता करून मराठयांच हसू या मुस्तद्यानी केलं. याउलट दौलतराव शिंद्यांसारख्या मातबर सरदारान होळकरांच्या द्वेषान अंध होऊन बाजीरावाला त्याच्याशी समझोता करू दिला नाही. शिंदे व होळकरांचे हे संबध तुटेपर्यंत ताणले गेले. खजिना रिता, जवळ स्वतःची फौज नाही, मुत्सद्यांचे पाठबळ नाही, सरदार एकमेकांच्या जीवावर उठलेले, इंग्रजांसारखे मातबर लोक टपलेले, अशा परिस्थितीत राज्यकारभाराच यत्किंचितही शिक्षण नसलेल्या बाजीरावाने एकवीस वर्षे राज्यकारभाराचा गाडा हाकला, हेच विशेष.त्याचा अखेर पराभव झाला हि साऱ्या मराठी माणसांची गफलत, नाना फडणीसासारख्यांची अदूरदृष्टी आणि पानसे, पुरंदरे, पटवर्धानासारख्या जुन्या सरदारांचा स्वार्थ, यापलीकडे याची उपपत्ती नाही.स्वतःच्या तुटपुंज्या ताकदीने बाजीरावाने अखेरपर्यंत शर्थ केली. मराठी राज्यासाठी त्याच्याजवळ असून त्यानं ते दिलं नाही, असं एकही उदाहरण दाखवता येणार नाही. जे त्याच्याजवळ नव्हतंच ते त्यानं दिलं नाही असं म्हणणं म्हणजे त्याच्यावर घोर अन्याय करण्यासारखे आहे. याउलट कितीतरी मराठी सरदारांनी त्यांच्या अंगी राज्य वाचवण्याला उपयोगी पडतील असे अनेक गुण असताना त्यांचा वापर न करत अंगचोरपणा केला आहे. प्रत्यक्ष लढाई पुकारल्यानंतर विंचूरकरांच्या पथकासमोरून एल्फिन्स्टन पालखीत बसून, बरोबर दहापाच लोक घेऊन जातो, विंचूरकर त्याला अडवीत नाहीत, हि घटना काय दर्शवते? युद्धात सामील होऊन, खाल्ल्या अन्नाला जागा, हि बाजीरावाने सरदाराना घातलेली साद अरण्यरुदन ठरते, यावरून काय निष्कर्ष निघतो? हजारो लोक नातू पंथात सामील होऊन देश बुडवण्याच काम राजरोस उजळ माथ्यान करतात, हा काय प्रकार म्हणावा?
बाजीरावाच्या व्यक्तीमत्वाच मूल्यमापन करताना खुद्द रियासतकार सरदेसायांनाही हाच पेच पडला होता. बाजीरावाच नवीन मूल्यमापन त्यांनी केलेले नाही; पण जुनेही बरोबर आहे असे त्यांना वाटेना. मधला मार्ग म्हणून त्यांनी बाजीरावाबद्दल कोण कोण काय म्हणते याचे उतारे देऊनच मूल्यमापनाचे काम भागवलेआहे. पेशवे दप्तरात आणि इतरत्र उपलब्ध झालेली अस्सल ऐतिहासिक साधनं अभ्यासल्यावर रियासती पुन्हा लिहिण्याचा योग त्यांना आला असता, तर माज्झी खात्री आहे, त्यांनी फार वेगळा बाजीराव उभा केला असता. पराभवाच्या गडद छायेमुळे अस्पष्ट झालेली दुर्दैवी बाजीरावाची व्यक्तिरेखा घासून पुसून खऱ्या स्वरुपात त्यांनी मांडली असती.

ना.सं.इनामदार
[इनामदारी]
संकलक:प्रवीण कुलकर्णी




No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....