Thursday, 25 February 2010

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता


मला दि.पू चित्रेे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.
मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.
मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही
याचंही टिंब टिंब.
मी सकाळी रीतसर उठतो.
घडाळ्याच्या काट्यात गुंडाळलं जात रेडिओवरचं बातमीपत्र
आदल्या रात्रीच्या कवितेतला तडफडून मेलेला शब्द
आंघोळीचं पाणी, अंडरवेअर,
बशीतल्या कोमट चहाला फुर्रकन फुंकर
डावा उजवा मोजा, उजवा डावा पाय
मी सुसाट पळतो इच्छा मरण्यापूर्वी,
ऑफिसच्या आठवणीने तरंगत राहतो.
कविता नुसती बरोबर असावी असला तरंग विचार.
`जगणं हतबल असल्याशिवाय कविता लिहिता येत नाही.'
असला कृत्रिम सुविचार पगाराचा दिवस सोडून
महिनो न्‌ महिने वरच्या खिशात घुटमळतो.
मला विवाहबाह्य संबधातलं सुप्त आकर्षण असतं
कुठल्या बाईशी आपले संबंध प्रस्थापित होतील
आत्यंतिक समजूतदारपणे
यावर मी विचार करतो,
नावडत्या ओळीवर नजर खिळावी तस.
जगण्याची मोडतोड अडगळीच्या कोपऱ्यात लोटून
कवितेची कोळिष्टकं होण्याची वाट पाहत राहतो
साने गुरुजींनी संस्कार केलेल्या शाळकरी मुलांप्रमाणे
कोणी कोणी होता येत नाही याचं दुःख
अनुक्रमणिकेनुसार विसरतो. स्वच्छ जगतो. समजूतदारपणे
कवितेशिवाय.

संदेश ढगे


No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....