भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही इतिहास उरलाच नाही. उलट लाचारीचा वर्तमान काय तो समोर राहीला. ज्याने मराठ्यांचा स्वाभीमान जागविला, उत्थानाची प्रेरणा दिली त्या शिवाजी महाराजांची समाधी तर रायगडावरील भग्नावशेषांत उन, पाऊस आणि वारा खात एकाकी पडली होती.
जेम्स डग्लस या इंग्रज अधिकार्याने शिवरायांच्या समाधीच्या उपेक्षेकडे लक्ष वेधले. १८८३ मध्ये त्याने रायगडाला भेट दिली. औरंगाजाबेच्या मोगली सत्तेशी टक्कर देऊन रयतेचे हिंदवी स्वराज्य उभारणार्या या मराठी राजाच्या समाधीच्या दुरवस्थेने तो इंग्रज अधिकारीही हेलावला. त्यावेळी रायगडावरील मंदिर भग्न झाले होते. महाराजांची मूर्तीची अवस्थाही चांगली नव्हती. त्याने आपल्या 'अ बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकांत ही अवस्था लिहिली. एक मोठे साम्राज्य उभारणार्या या राजाच्या समाधीसाठी आज साधा रूपयाही खर्च होत नाही. कुणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा शब्दांत त्याने तत्कालीन मराठी समाजाची लक्तरे काढली. एवढे करून डग्लस थांबला नाही. त्याने ब्रिटीश सरकारलाही या समाधीकडे लक्ष द्यायला सांगितले. भलेही शिवाजी महाराजांचे राज्य आज ब्रिटिशांच्या ताब्यात आले असले तरी तो एक मोठा राजा होता, याकडे त्याने लक्ष वेधले.
डग्लसचे प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत. समाधीची अवस्था कळाल्यानंतर तत्कालीन समाजातही संतापाची भावना उसळली. त्याचबरोबर राजांच्या देदिप्यमान पराक्रमानंतर वतनदारी, जमीनदारी उबवणार्या सरदार-दरकदारांवर ही चीड व्यक्त झाली. एकूणच प्रजेचा दबाव वाढू लागल्याने ब्रिटिश सरकारने पुरातत्व खात्याकडे या समाधीची व्यवस्था सोपवली.
| |
त्याचवेळी डग्लसने आणखी भर घालून काढलेल्या त्याच्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात पुन्हा तोच लेख छापला. या एकूणच प्रयत्नांनी वातावरण चांगलेच तापले. मग टिळकांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केसरीत २३ एप्रिल १८९५ मध्ये एक सणसणीत लेख लिहिला. त्यात मराठी माणसाच्या निष्क्रियतेवर टीका करताना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे लाभ उचलणार्या त्या पिढीतील सरदार, वतनदारांवरही चांगलीच झोड उठवली.
टिळकांच्या या लेखाने योग्य तो परिणाम साधला. आता लोकभावना चांगल्याच तापल्या होत्या. महाराजांच्या समाधीसाठी आता काही तरी ठोस केले पाहिजे ही भावना तयार झाली. मग त्यातून निधी उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून रायगडावरील शिवकालीन साधनांची दुरूस्ती करून तेथे दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरले. हा मुद्दा त्यावेळी एवढा पेटला की तो केवळ महाराष्ट्राचा राहिला नाही. एक तर आधीच ब्रिटिश अंमल असल्यामुळे छत्रपती शिवाजी हे आपोआपच राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. मग काय पश्चिम बंगाल, आसाम संयुक्त प्रांत इकडेही शिवाजी महाराजांचे वारे पसरले. जणू एक राजकीय चळवळच तयार झाली.
टिळकांनी आता सर्व सूत्रे हाती घेतली. त्यांनी रानडेंप्रमाणेच ३० मे १८९५ मध्ये हिराबागेत बैठक घेतली. तीत एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. पन्नास सदस्यांच्या या समितीत स्वतः टिळकही होते. वास्तविक त्यावेळी सरकारही समाधीच्या दुरूस्तीसाठी पैसे देत होते. पण ती रक्कम होती वर्षाला पाच रूपये. मराठा साम्राज्याची निर्मिती करणार्या छत्रपतीच्या वाट्याला ही अवस्था यावी? टिळकांनी या बैठकीत सगळ्यांनाच चांगले खड़सावले. ही बाब आपल्याला शोभनीय नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून निधी उभारण्याचे ठरले. अगदी एका विद्यार्थ्याकडून मिळालेले दोन आणे ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेले एक हजार रूपये अशा प्रकारे निधीची उभारणी सुरू झाली. अवघ्या सहा मिहन्यात नऊ हजार रूपये जमले.
| |||||||||
| |||||||||
No comments:
Post a Comment