पुण्याहून पत्र
प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि.
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत , तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत.
इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात.
सिग्नलपाशी लाल दिवा असला , तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना.
वळताना हात दाखवायचा , तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही.
हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत ?
अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.
तुमचा लाडका.
नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे.
अनामिक
संकलक:हेमंत कुलकर्णी
No comments:
Post a Comment