Tuesday 16 November 2010

माझी कादंबरी- एक ब्लडी हार्ड वर्क ! - भाऊ पाध्ये

(१९८१ साली 'आयुध' ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख.)
 
नुस्तं लिखाण करणं म्हणजे चक्क ब्लडी हार्ड वर्क (अभिनेत्री तनुजाच्या शब्दांत!) असतं. आणि कादंबरीसारखं विस्तृत लेखन करणं म्हणजे तर....., मराठीमध्ये हल्ली जो तो कादंबरी लेखन करू लागलाय. ते पाहून मनात विचार येतो की एक तर आपल्याला वाटतं तितकं काही कादंबरी लेखन हार्ड वर्क नसावं किंवा मराठी भाषेतले लेखक असे काही जिनिअस असावेत की एकोणिसाव्या शतकातील ग्रेट रशियन रायटर्सही त्यांच्यापुढे फालतू वाटावेत.
 
लेखनासंबंधी म्हणाल तर तनुजाची जी भूमिका फिल्म इंडस्ट्री व अदाकारीसंबंधी आहे तीच आहे. (तिच्या क्षेत्रात ती आणि माझ्या क्षेत्रात मी सारख्याच उंचीचे आहोत, असे मला म्हणायचा मोह होतोय!)
 
माझ्या 'वासूनाका', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' अशा एक दोन चीजा गाजल्या तर तनुजाचीही 'दो चोर', 'अनुभव' अशी एक दोन पिक्चर्स चालली. दुसरे म्हणजे ती आपण फिल्म इंडस्ट्रीला बांधलेले आहोत असे मानते तसे मीही कादंबरी लेखनाला बांधलेलो आहे असे मानतो. कादंबरी हा सर्वात श्रेष्ठ वाङ्‌मयप्रकार असून नाटक-बिटक लिहिणे त्या मानाने फारच मामुली आहे असे मनापासून मी मानतो.
 
मी कादंबरी लिहायला घेतली त्या वेळी कादंबरी हा पॉप्युलर वाङ्‌मयप्रकार नव्हता. त्या वेळी मराठीत कादंबरीकार किती- तर हातावर मोजण्याइतके तीन-चार. श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर किंवा गो. नी. दां. कुठल्याही साहित्यप्रेमी व्यक्तीस मी, एका नवोदित लेखकाने कादंबरी लिहिली असे म्हटले, म्हणजे तो शॉक लागल्याप्रमाणे माझ्याकडे पहात असे. माणसाने हळूहळू लघुकथा लिहून हात घोटवावा. मग तो चांगला कसून तयार झाला की लिहावी कादंबरी असे तेव्हा मानले जात असे नि मला तसा हितोपदेश केला जात असे. अशी परिस्थिती. ...तोच प्रकार आता किती पॉप्युलर झाला पहा. मी लघुकथांचा संग्रह करावा म्हणून प्रकाशकाला शोधतो तेव्हा प्रकाशक मला सांगतो, "कादंबरी आहे का बोला? आज कादंबरी खपते." काय जमाना आहे पहा, ज्या वेळी मी हातात कादंबरी घेऊन प्रकाशकाकडे जात होतो, त्या वेळी त्याला कथा हव्या होतात. आता कथा घेऊन जातो त्या वेळी त्याला कादंबरी हवी. आज बाजारात हा माल खपतो म्हणून तो हवा. 'ऑफ सीझन'चा माल आणू नका. मागे दुसरा माल खपत होता, हा खपत नव्हता. हा माल 'ऑफ सीझन'चा ठरला होता. मराठी प्रकाशक प्रकाशक आहेत की बनिये?
 
असो. 'डोंबा-याचा खेळ' या माझ्या कादंबरीचे प्रकाशन म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासातली दर्दभरी दास्तान आहे. वो किस-किसको सुनाऊं! 'लग्न पहावं करून' या उक्तीप्रमाणे 'कादंबरी पहावी छापून' अशी एक म्हण मी त्या वेळी काढली होती. पण सध्या लग्न सराईची धामधूम पाह्यली की 'लग्न पहावं करून' म्हणण्याची सोय राह्यली नाही. ललित मासिकाचा कुठच्याही महिन्याचा अंक उचलावा नि नव्या कादंब-यांची जंत्री पहावी. लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंग तरी करता येते- पण कादंब-यांच्या प्रॉडक्शनचे काय? सध्या ज्या जोमाने हे प्रॉडक्शन चालू आहे, त्यांच्या हिशेबात स्वत:चा विचार करता मला नपुंसकत्व आल्यासारखे वाटते.
 
लिहिण्याबाबत आपले लहरी खाते- हवं तर म्हणा. हवं तर 'लिहावेसे वाटेल तेव्हाच लिहावे' अशी यामागे तात्विक भूमिका आहे असे म्हणा. परंतु दर वर्षी बाजारात आपण काही माल टाकला नाही म्हणून गेलाबाजार पश्चात्ताप करण्याची वेळ नियमितपणे आली आहे.
 
खरे म्हटले तर आपला कादंबरीचा माल बाजारात टाकला आणि माल कसा काय खपला म्हणून बाँबे बुक डेपोवाले, मॅजेस्टिक बुकवाले यांच्याकडे जाऊन 'कसं काय चाललंय?' म्हणून विचारावं आणि माल खपत असला तर त्यांनी म्हणावं. "आणा आणा, आणखीन असला माल आणा- चांगली डिमांड आहे तुमच्या मालाला!" असे मलाही वाटते. असे भाग्य आपल्याला कुठे? आपण इतके कुठे सेलेबल आहोत? आपण म्हणजे आपला माल! आपला माल आणि आपण यात फरक कुठे आहे? माल कसा प्रोड्यूस करावा याचे बाजाराचे तंत्र आपल्याला कुठे ठाऊक आहे? आपल्या देशात बांगलादेशचे युद्ध झाले. त्या निमित्ताने दादरला एक परिसंवाद झाला. या परिसंवादात शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साहित्य व्यवसाय मार्गदर्शन करणारा बराच बोध केला. ते म्हणाले,"पहा, बांगलादेशचा लढा म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. यावर साहित्यिकाने लिहिले पाह्यजे! कुठे आहे साहित्यिक?" मी तोंड लपवले. कसं मी त्या शाहिरांना कादंबरीकार म्हणून आश्वासन देणार- "शाहीर, हा मी आहे. पाडतोच मी एक बांगलादेशच्या लढ्यावर कादंबरी!" आपली ती कुवत नाही. आपल्याला या मर्यादा मंजूर आहेत. त्यानंतर आणीबाणी आली तेव्हा हेच! ...हाही प्रसंग मोठा संघर्षमय! कुठे आहेत साहित्यिक? अश्या आपल्या रोमहर्षक ऐतिहासिक प्रसंगाच्या बसेस चुकत आल्या आहेत. एखाद्याच्या लेखणीच्या मर्यादा असतात! मर्यादा तरी वाचकांनी मंजूर करायला हरकत काय आहे?
 
कादंबरी लिहिणे हा हार्ड जॉब असो वा नसो, मला तो करावाच लागतो. आपल्याला मिळालेला तो शापच म्हणा. तुम्ही कधी एखाद्या प्रचंड कारखान्यात गेलात त्या वेळी तुम्हाला प्रचंड चक्र फिरताना, शॅफ्टस् हालताना दिसतात. अनेक वेळा ही यंत्र थांबवण्यासाठी आपला हात घालण्याची वेडी उर्मी माझ्या मनात आली आहे. तशीच माझ्या डोक्यात चालणारी चक्रे, शॅफ्टस्, पिस्टन्स थांबवावेत असे मला वाटले आहे. ही जोपर्यंत चालतात तोपर्यंत 'प्रॉडक्शन' निघणारच. ते अटळच असतं. कुठल्याशा अमेरिकन कादंबरीकाराला एका पत्रकाराने मुलाखतीत सवाल विचारला होता, 'आपण लेखक होऊ असे तुम्हाला केव्हापासून वाटू लागले?' मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिले असते, "अगदी फार पूर्वीपासून!. . . " पण, असे वाटत तरी मी लिहिण्याकडे कधीच तसे लक्ष दिले नव्हते. मला पुढारी व्हायचे होते, मला आदर्श शिक्षक व्हायचे होते. तरुण वय म्हणजे हिरो बनण्याची स्वप्न पहाण्याचे. ब्लडी हार्ड वर्क करण्याचे नव्हे. पुढारी बनणे सोपे आहे, कोवळ्या विद्यार्थ्यांवर भंपकपणे इंप्रेस करून हितोपदेश करून आदर्श शिक्षक होणे शक्य आहे. परंतु ब्लडी हार्ड वर्क केल्याखेरीज कादंबरीकार बनणे कसे शक्य आहे? मला वाटते म्हणूनच मी कादंबरी लिहिण्याचा माझा मनसुबा पुढे ढकलला होता. आयुष्यात चांगले कर्तृत्व संपादन करून उतार वयात निवृत्त व्हावे. आपली एखादी लायब्ररी असावी. उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करून आपण व्युत्पन्न व्हावे. आपल्या जवळ भरापूर वेळ असावा. कधीही कॉन्स्टीपेशन होऊ नये आणि आपण तोंडात पाईप धरून धुराची वलये काढत गालिच्यावरून येरझारा घालत आपला नायक नायिकेशी कसा वागेल याचा विचार करावा वगैरे वगैरे. म्हणजे आपण पूर्ण कादंबरीकार बनू असे मला वाटायचे. सुप्रसिद्ध पाश्चात्य लेखक सॉमरसेट मॉम यांनी लेखनाविषयी एक ग्रंथ लिहिला आहे, तो मी वाचला होता. त्यातले एक वाक्य माझ्या नजरेत अंजन घालणारेच होते. "बरेच लेखक आपल्या तारुण्याच्या उर्मीमध्ये लिहितात, पण. . . " आपण तरुण असलो म्हणजे लिहिणे बरे नाही असे माझ्या मनात तेव्हापासून घर करून बसले होते. मग कादंबरीसारखा प्रदीर्घ व विस्तृत खटाटोप करण्यास पन्नाशीपुढचा निवृत्तीचा काळ योग्य नव्हे काय? तर कादंबरी लेखनासाठी योग्य काळाचे भान असूनही मी ऐन पंचविशीतच कादंबरी लिहावयास घेतली याचे कारण माझ्या डोक्यात चालणारी यंत्रेच होत, दुसरे काही नाही. पंचविशीत किंवा गद्धे-पंचविशीत विचार म्हणजे एक कथानक, एका विशिष्ट पार्श्वभूमीवर येणारी कॅरेक्टर्स व त्यातून निर्माण होणारे कथेचे सूत्र यापुढे गेलेला नसतो. हिंदी चित्रपटात कधी काश्मीर, कधी युरोप तर कधी मुंबई असे बॅक ड्रॉप वापरून हिरो-हिरॉईन व खलनायक, त्यांचे आईबाप, सहायक नट, त्याची प्रेयसी, विनोदी नट, नोकरचाकर असा एक संपूर्ण प्लॉट तयार करावा लागतो, त्याचप्रकारे कादंबरीचे आहे. तसे हिंदी चित्रपटाची पटकथा जमवणे वाटते तितके सोपे नसते. त्याचप्रमाणे ना. सी. फडक्यांच्या तंत्र - मंत्राने बेतून लिहिलेली कादंबरी लिहिणे सोपे नसते. दोन्ही हार्ड जॉब्स असतात. निवृतीच्या वयात बुद्धिबळ खेळण्याचा जो आनंद मिळेल तोच आनंद असे हार्ड जॉब्स करण्यात मिळतो. म्हणून हार्ड जॉब्स न करता लेखन हे इझी व्हायला हवे असते. असे इझी झालेलं लेखन हे केव्हाही अधिक समाधान देणारे असते. मी 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' ही कादंबरी एका महिन्यात 'नॉन स्टॉप' लिहिली. त्यामुळे ती चांगली उतरली यात मला शंकाच राह्यली नाही. कादंबरी लिहिताना आपला अनुभव, धडपड, मेहेनत, डोक्यातील चक्रे यांचा अशा रीतीने मिलाफ झाला पाहिजे की कधीही कॉनस्टीपेशन झाल्याप्रमाणे अस्वस्थ होता कामा नये. लेखन हे तेव्हाच स्वस्थता निर्माण करते जेव्हा तुम्हाला ते पार करताना कॉनस्टीपेटेड अवस्था अस्वस्थता निर्माण करत नाही. हा एक असा ब्लडी हार्ड जॉब आहे की जो कादंबरीकाराला आवडायला हवा. मी जेव्हा तो ब्लडी हार्ड जॉब म्हणतो, त्या वेळी कादंबरी लेखनाविषयीचा तिटकारा आणि कादंबरी लेखनाची ओढ यातील 'लव्ह-हेट रिलेशनशिप' मी अनुभवतो. या 'लव्ह-हेट रिलेशनशिप'मधूनच कादंबरी निखार चढतो. 'वैतागवाडी' हे माझ्या कादंबरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 'वैतागवाडी' ही मुंबईतल्या बेघर कारकुनाची कहाणी. ती लिहिताना मला फारच कॉनस्टीपेटेड अस्वस्थता जाणवली. मी हा विषय का लिहिण्यास घेतला हे मलाच समजत नव्हतं. या कादंबरीतला मध्यमवर्गीय बेघर माणूसच एकदा म्हणतो, "मला घर नाही ही काय समस्या आहे?" एका मोठ्या प्रकाशकाने ही कादंबरी (स्क्रिप्ट) वाचल्यावर मला म्हटलं, "ही कादंबरी तुम्हाला यश मिळवून देणार नाही कारण ही हिणकस आहे!" मी त्याच्याशी सहमत झालो नाही. माझे मित्र अशोक शहाणेही सहमत झाले नाहीत. मला बेघर माणसाचे दु:ख लिहिण्याची इच्छा डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या एका भाषणातून झाली. ते म्हणाले होते, "कल्पना करा, एखाद्या माणसाला रस्त्यावर पडल्यानंतर त्याची काय परिस्थिती होते ती." मी अनेक वेळा आमच्या गृहनिर्माण मंडळातील अनधिकृत भाडेकरूंना घराबाहेर काढल्याची दृश्ये पाह्यली. केव्हढी दर्दभरी शोकांतिका! सामानसुमान, बायकामुले यांसह माणूस घराबाहेर फेकला जातो, ते केव्हढे प्रचंड क्रौर्य दिसते. मी आमच्या समाजवादी कार्यकर्त्यांनाही तो कायदा बदलण्यासाठी हलवू लागलो होतो. 'वैतागवाडी'चा नायक अखेर आपला संसार, आपली ड्यू असलेली बायको घराबाहेर पडणार अशा परिस्थितीत येऊन पचतो, त्या वेळी त्याचा पुरुषार्थ संपतो. डोळ्यासमोर एक प्रचंड काळोखाची खाई पसरते नि तो रडतो. बेघर माणसाच्या प्रचंड शोकांतिकेच्या त्या शेवटाला पॅरलल फक्त डी-सिकाच्या 'बायसिकल थीफ'मधल्या नायकाच्या रडण्यामध्ये मिळेल.

कुठचीही कलाकृती म्हणजे कलाकाराने पसंत केलेला विषय आणि त्याचे व्यक्तिमत्व यांचे लग्न अशी माझी एक स्वत:च्या लेखनाच्या संदर्भात केलेली सुटसुटीत व्याख्या आहे. आपल्याकडचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोसला' ही कादंबरी आहे. ही कादंबरी आणि प्रा. भालचंद्र नेमाडे यांचे व्यक्तिमत्व ह्या गोष्टी अविभाज्य आहेत. आय राईट अ‍ॅज आय लिव्ह, असे ज्या वेळी लेखकाला म्हणता येते, त्याच वेळी आपल्याला त्या लेखकाची लेखन प्रवृत्ती लक्षात येते. बाजारात अनेक प्रकारचे खपाऊ माल हारीने पेश केले जातात, त्या वेळी लेखक स्वत:ला पेश करून आपले व्यक्तिमत्व अनेक प्रवाहपतितांपेक्षा वेगळे असे असल्याचे स्वच्छपणे दाखवतो. कादंबरी हे तुमच्या स्टेटमेंट व्हायला हवे. 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर'मध्ये त्या कादंबरीचा नायक एका अपघाताविषयी चिंतन करताना दिसतो. मी असा अपघात- सामान्य अपघात जो मुंबईसारख्या शहरात घडतो- तो पाह्यला. तो पाह्यला यात विशेष काहीच नाही. तसा तो त्या वेळी अनेकांनी पाह्यालाच होता. हेमिंग्वेच्या शब्दांत 'एव्ह्री डेथ डीमीनिशेस मी' अशी अवस्था मला जाणवली. आणि ती बॅ. धोपेश्वरकराच्या चिंतनामध्ये मी मांडली. जो अनुभव अनेकांनी घेतला होता तरीसुद्धा मला तो माझ्या लिखाणातून पुन्हा सर्वांप्रत पोचवावासा वाटला, इतका तो माझ्या व्यक्तित्वाशी अटळ बनला होता.


असाच एक अनुभव म्हणजे माझ्या एका प्रिय पात्रासंबंधी. तिने एक दिवस लग्न जमवल्याची बातमी मला दिली. मला धक्का बसला. मी म्हणालो, "माझ्याबरोबर राह्यल्यानंतर तुला लग्नाची इच्छा कशी होते?. . . ज्या पुरुषाशी तू लग्न करण्यास तयार झालीस त्याच्यापासून तुला सुख मिळण्याची खात्री कुठे आहे?" तिने मला काय उत्तर द्यावे. "त्यात काय आहे? चार-चार वेळा पोट पाडूनही मुलींची लग्न होतात! मग माझे का होऊ नये?" ती स्वत:ला 'अग्रेसर चेंडू' म्हणवून घ्यायची. तिच्या या दृष्टीचा मी प्रथमच अनुभव घेत होतो. मी तिला मानलं. तिच्यासारख्या चार-चार वेळा पोट पाडणा-या समाजातल्या सर्व मुलींना मानलं! ती मुलगी चालू खरी परंतु तिच्या चालूगिरीमध्ये सुसंगतपणा होता. मानलं तिला मी!


मोटार अपघात ही एक सर्वसामान्य घटना असेल किंवा अग्रेसर चेडूची विचार करण्याची पद्धत जगावेगळी असेल, या दोन्ही घटनांकडे मी माझ्या दृष्टीकोनातून पाहातो म्हणूनच त्या मला सिग्निफिकंट वाटतात. ज्याप्रमाणे बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर हे माझे कॅरेक्टर मृत्यूच्या दर्शनाने हादरते व अंतर्मुख होते त्याच प्रमाणे अग्रेसर चेडूला सवाल करणारा मी आपल्या कनिष्ठ मध्यम वर्गातील तरुण मुली व्होअरिश लेव्हलवर कशा जगात असतात हे दाखवतो. पावित्र्याचे आणि पातिव्रत्याचे, सेलेबल नीतिमत्तेचे बोजड कुबड पाठीवर न बाळगता त्या अधिक मुक्त जीवन जगतात. (साहजिकच स्त्री-मुक्तीची चळवळ त्यांना अपील होत नाही.) सध्या लेखकांच्या व्यक्तिमत्वाविषयी मराठी भाषेमध्ये चर्चा करणे थांबलेच आहे. आणि चर्चा तरी कुणाची करणार?. .. आजचा एखादा लेखक स्वत:ला मार्क्सवादी म्हणवतो, म्हणजे काय, तर काहीच नाही! किंवा एखादा लेखक स्वत:ला दलित म्हणवतो. म्हणजे तो ज्या समाजात वाढला त्या समाजाचा आरसा समाजापुढे ठेवतो आहे. त्याच्याविषयी इंटरेस्ट वाटेल असे कुठे आहे. मी कादंबरीची व्याख्या केली त्याप्रमाणे कादंबरी म्हणजे लेखकाचा विषय आणि व्यक्तिमत्व यांचे लग्न आहे असे एकदा गृहीत धरले तर आजच्या कादंबरीच्या बोहल्यावर फक्त विषय उभा आहे. परंतु आंतार्पाटापलीकडे नवरा मुलगा जो लेखक असायला पाहिजे त्याचा पत्ताच नाही. लेखक हा युनिक असायला हवा. तो दुस-या कुणासारखा असू नये. अर्थात युनिक माणसालाच युनिक अनुभव मिळतात आणि युनिक अनुभवांतूनच तो युनिक निर्मिती करू शकतो. अलीकडे एका अमेरिकन ज्यू लेखकाची- आयझॅक सिंगरची मुलाखत वाचली. तो जे म्हणतो, टॅलेंट नेव्हर ट्राइज टू इमिटेट अदर टॅलेंट. इट इज इटसेल्फ. ही स्वत:च्या लिखाणाविषयी जागरूक असलेल्या लेखकानेच खबरदारी घेतली पाह्यजे. मी माझ्या कादंब-यांच्या आलेखाकडे वळून पहातो, त्या वेळी किती वेगवेगळ्या विषयांना मी हाताळले आहे, हे मला सांगावेसे वाटते. डोंबा-याचा खेळ, करंटा (कामगार चळवळ), वैतागवाडी (गृहहिनांची समस्या), वासूनाका (रोडसाईड रोमिओज), बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर (परात्म व्यक्तिमत्व), अग्रेसर (कनिष्ठ मध्यम वर्गातील मुलीचे जीवन), राडा (बेछूट तरुण व्यक्तित्व), वणवा (नवश्रीमंत व निसर्ग), होमसिक ब्रिगेड (शैक्षणिक विकासाचे प्रकल्प), वॉर्ड नं. ७ सर्जिकल (एका निर्मितीक्षम कलावंताच्या समस्या). प्रत्येक कादंबरीमध्ये मी आहे म्हणून या कादंब-यांमध्ये एक अदृश्य धागा आहे. मी जर पुढे मागे लिहीत राह्यलो तर तो धागा पुढे वाढत चालणार आहे. मी पाह्यल्या त्या मिशनलेस संस्था (कामगार चळवळ, शिक्षण प्रकल्प), घनघोर अंधाराने भरलेले आभाळ (वैतागवाडी, राडा) नव-श्रीमंतांचा उद्दामपणा व आत्मघातकीपणा (वणवा), अस्तित्व विचार (बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर) हे पेश करताना माझ्या व्ह्यू- पॉईंटमध्ये वाचकाला इंटरेस्ट वाटतो की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जे कादंबरीमधून विधान करतो, त्यामुळे वाचक सिरीअसली स्टीम्युलेट होतो की नाही हा प्रश्न आहे. माझी 'होमसिक ब्रिगेड' दादा कोंडकेला दिली. अर्थातच ती त्याला आकलन होण्याच्या पलीकडची आहे, त्यामुळे तो कसा काय स्टीम्युलेट होणार? ते अशक्यच आहे.


वाचकाची समस्या सर्वच चांगल्या रीडर्सना भेडसावणार. अमेरिकेत ३ टक्के लोक वाचतात. ते सिंगर आपल्या मुलाखतीत म्हणतातच,
नंबर ऑफ पोटेंशिअल रीडर्स इज डिमीनीशींग. आपल्या वाचकाच्या संदर्भात मी माझी तक्रार पूर्वीही मांडली आहे.

आपल्या वाचकांचा प्रॉब्लेम काय आहे. आपल्याकडे दोन प्रकारचेच वाचक आहेत, एक प्रोफेसरी टीकाकार आणि दुसरे न वाचणारे वाचक. असे वाचक ज्या मराठी समाजामध्ये आहेत; त्या समाजात लिहिण्याचे ब्लडी हार्ड वर्क केल्यानंतर सवाल उभा रहातो तो असा की, कुणासाठी हा खटाटोप? गेल्या दहा वर्षांत मराठीतील वाङ्‌मयीन अ‍ॅक्टीव्हिटीज खतम होत चालल्या आहेत. आणि त्याबद्दल कुणालाही चिंता आहे, असं मला वाटत नाही. प्राध्यापक मंडळी सबस्टॅन्टीव्ह लेखनाची जाणीवपूर्वक दाखल घेण्याचे टाळत आहेत. एक आघाडीची समीक्षिका कुठच्याही व्यासपीठावरून मराठी साहित्याबद्दल रोजचीच तक्रार करत असे- "या देशात विकासाची कामे वगैरे काही चाललंय? पण मराठी वाङ्‌मयात त्याचं दर्शन कुठे आहे?" मला तिला विचारावसं वाटलं- "होमसिक ब्रिगेड हे काय आहे?" पण मला वाटतं, तिला त्या तपशीलात शिरणे सोईचे वाटत नसावे. भाऊ पाध्यांची कादंबरी टाळणेच सोयीस्कर वाटत असावे. प्राध्यापकांची काय कथा! वृत्तपत्रे, दैनिके, नियतकालिके तर साहित्य समीक्षा अंगाबाहेर टाकू लागली आहेत. मराठीतील सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या संपादकाला मग भाऊ पाध्येच्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे आपल्या दैनिकाच्या जागेचा अपव्यय वाटतो. हेमामालिनी किंवा अमिताभ बच्चन यांच्यावरील मजकूर पेईंग वाटतो. परत इतकी मराठी साहित्यविषयक तुच्छता बाळगूनही परत मराठी साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर मिरवण्याची संधी ते सोडत नाहीतच! त्यातच टीव्हीसारख्या गोष्टीही मराठीतील पोटेंशिअल वाचकाला दूर नेत असतातच!


लिहावे लागते अश्या कुडकुडणा-या मॉर्गसारख्या जगामध्ये. मराठीमध्ये लिहिताना असेच म्हणावे लागते, "ही माझी भाषा आहे. मी सेलेबल असलो काय किंवा नसलो काय, मला निर्धार करून लिहिलेच पाहिजे. वैफल्य वाटून घेता कामा नये. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. लिहिणे. दुसरं काही नाही! 'वासूनाका' आणि ' बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' यापलीकडे मी काही लिहिलं आहे की नाही, हेसुद्धा आमच्या तथाकथित पोटेंशिअल रीडरला ठाऊक नसते. नाटके, टीव्ही, चित्रपट कथा- कुठचेच माध्यम आपण गाजवत नाही म्हणजे आपल्या अस्तित्वावरून या तथाकथित पोटेंशिअल रीडरने छेद मारलेला असतो. अर्थात या मुश्कील हालातमध्ये आपली जिंदगी कशी काटणार असे वाटत रहाते. पण तरीसुद्धा एक आशा नेहेमीच लेखकाला वाटावी लागते, आपण युनिक आहोत; आपण निवडलेला विषयही आगळा आहे. . . आय शल नेव्हर ट्राय टू अपील टू द रीडर व्हू हॅज लिटल ऑर नो टेस्ट बट बिग प्रिटेंशन्स! वन डे धिस रीडर इज गोईंग टू व्हॅनिश- आय सिन्सिअरली होप. अखेर लेखकाच्या सेलेबिलिटीची आपल्या समाजात कसोटी लागणार नसून या मिशनलेस समाजाच्या ससेप्टीबिलिटीची कसोटी लागणार आहे.


मिशनलेस सोसायटी इज अ थिंग आणि तिला सामोरे जाण्यात मला स्वारस्य वाटतं. हॅरॉल्ड रॉबिन्स स्टायलीने इथे तिथे चावे घेणे आणि अखेर एस्टॅब्लिश्ड व्हॅल्यूजना शरण जाणे मला मंजूर नाही. आयझॅक सिंगर म्हणतो ते मला यथातथाच वाटते. रिअल रायटर्स स्टे इन देअर इनव्हीरॉनमेंट- इन देअर कॉर्नर. मुंबईकर रहाणे आणि मुंबईकर म्हणून लिहिणे मला मंजूर आहे. एरव्ही माझे रूट्सही मुंबईतच आहेत. कुठच्याही ग्रामीण किंवा इतर समाजाशी नाते मला सांगता येणार नाही. अपघात म्हणून मी दिल्लीला जाईन (होमसिक ब्रिगेड), जंगलात फेरफटका मारीन (वणवा). परंतु मला मुंबईबाहेरच्या जगाबद्दल औत्सुक्य नाही.


मुंबईच्या जीवनाइतकाच लैंगिक संबंधही मी महत्त्वाचा मानतो. माझ्या 'डोंबा-याचा खेळा'पासून 'वॉर्ड नं. ७' पर्यंत माझ्या कादंब-यांमधून लैंगिक जीवनाचे दर्शन नॅचरली पेश केले गेले आहे. आपल्या समाजाच्या लैंगिक जीवनाबद्दल मी काय सांगावे. डॉ. लोहियांनीच आपला समाज लैंगिकदृष्ट्या विकृत आहे असे प्रतिपादन केले आहे. जर डॉ. लोहियांसारखा विचारवंत लैंगिक जीवनावरील भाष्य उघडपणे मांडतो तर ते मी 'वासूनाक्या'तून आणले तेव्हा अनेक प्रोफेसरी समीक्षकांनी, मला लैंगिक जीवनाशिवाय काही दिसतच नाही, अशी बोंबाबोंब केली होती. लैंगिक संबंध व न-संबंध, दोन्ही बाजू मी हाताळल्या आहेत. दुर्गाबाईंच्या मते या दोन्ही बाजू हाताळण्यातच लेखकाचे सामर्थ्य आहे.


मी 'वेडा' (एक सुन्हेरा ख्वाब) नावाची एक बलात्कार विषयावरील कथा माझी पत्नी शोशन्ना हीस वाचावयास दिली होती. ती वाचल्यानंतर शोशन्ना भयंकर अस्वस्थ. ते पाहून मला चित्रण यथार्थ असल्याचे समाधान झाले. लैंगिक चित्रणाचा आस्वाद वाचकांनी अलिप्तपणे घेतला तर ते खरे नव्हे. त्यामुळे वाचक अस्वस्थ झालाच पाह्यजे. तीच त्याची कसोटी होय. मीही हे चित्रण करताना खूपच अस्वस्थ होतो.



सेक्स ही दिलीप चित्रे म्हणतो त्याप्रमाणे एकच गोष्ट लिहिण्यासारखी आहे नि वाचण्यासारखी आहे. आपल्या एरव्ही अ‍ॅक्टीव्हिटीज खूप चालतात. परंतु अखेर आपल्या जीवनाचा ताळेबंद आपल्या लैंगिक जीवनातील यशापयशानेच होतो. मला वाटतं, कादंबरी किंवा कोणतेही लेखन या विषयाच्या संदर्भात असेल तरच ते वर्थ रीडिंग असते. मला ठाऊक आहे, सध्या लैंगिक विषयाकडे वाकड्या नजरेनं पहाण्याची लाट आली आहे. अरुण साधूसारख्या लेखकांना तर हा विषय हाताळताही येत नाही. (हे माझेच मत नाही, एका मोठ्या साहित्यिकाचेही मत आहे!) तरीसुद्धा तो मराठीतील अग्रगामी लेखक ठरतो. मराठी भाषेतच सेक्सशिवाय लिहिणारी माणसे मोठी होतात.

 
सेक्सवर लिहिण्यासारखे आपल्याला दर घडीला दिसून येते म्हणूनच आपण लिहीत आहे. मी सेक्सवरच लिहितो आणि त्याच्याबद्दल मला यत्किंचितही शरमेची बाब नाही. इंग्लंडमध्ये एका जुन्या जमान्यात सेक्स संबंधात स्त्री-पुरुषांना लाजा वाटत- ते त्यांचे लैंगिक संबंध हे कर्तव्यबुद्धीवर आधारलेले असत. मजा अशी की आज जुन्या जमान्याप्रमाणे आपल्या प्रोफेसरांसकट सेक्ससंबंधी टॅबू बाळगणारे लोक पाह्यले की माझ्या लक्षात येते- आपण काही आपल्या समाजासाठी लिहीत नसलो पाहिजे, याची खात्री पटते. सहाजिकच आपण सेलेबल नाही. वि. स. खांडेकरच निरनिराळ्या मुखवट्याखाली या भाषेत जन्म घेतात आणि आपण त्यांचे रोम्यांटिक, अलंकार-भारलेले सुखवस्तू व चमचमीत लेखन हीच त्यांच्या आस्वाद्यमान्यतेची सर्वश्रेष्ठ क्षमता म्हणावी लागेल. . .आय सिन्सिअरली होप, दे विल पास. मगच मला आपला लेखक म्हणवणारी पिढी जन्माला येईल.
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....