Tuesday 16 November 2010

02/07/2010

आज किंवा आताच जे तीन पेशंट अॅडमिट झाले, त्यापैकी एकाची अवस्था फारच वाईट होती. तो खूप भूक लागली म्हणतो पण एखादेच बिस्कीट कसेबसे खातो. त्याला उठून बसवावे लागते. अर्धवट बेशुद्धी, आणि आता दारू हळूहळू उतरत असल्याने विड्रोल ची लक्षणे...कमालीचा अशक्तपणा हे सर्व पाहत असताना मला एक वर्षापूर्वीची माझी अवस्था आठवली. कोणीतरी शेअर केले तसे आता एक सराव केला पाहिजे की, obsession आले की हि अवस्था आठवण्याचा सराव केला पाहिजे. कॅजुअल अॅप्रोच आता थोडा दूर ठेवला पाहिजे असे वाटू लागते.
खरं तर कुठलीही घटना, संदर्भ मी माझाशी जोडू शकतो. त्याचा अन्वयार्थ माझ्यापुरता लावू शकतो. मी जेंव्हा एखादे पुस्तक वाचत असतो तेंव्हा त्यातील एखादे वाक्य त्या त्या कथानकाशी आणि पत्राच्या तत्वज्ञानाशी सुसंगत असतेच, मात्र त्याचा संदर्भ मी माझ्याबाबत देखील लावू शकतो. 
उदा: जसे, "आपला भविष्यकाळ वर्तमान झालेला कदाचित माणसास पाहता येईल, मात्र भूतकाळ वर्तमान झालेला पाहण्यास बहुदा तो जिवंत राहत नाही." हे आठवण्याचे कारण की, जर मी भूतकाळासारखी दारू पीत राहिलो तर निश्चितच फ्रेम मध्ये जाईन.(पुन्हा आपल्या नशिबी 'फ्रेम' तरी आहे की नाही कोण जाने!) कारण सकाळी इनपुट मध्ये संगीता मॅडम प्रार्थनेविषयी बोलताना काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही याविषयी सांगत होत्या. नंतर चहा पिताना कान्हेरे व मी बोलताना कान्हेरेंनी एक शेअरिंग सांगितले. की एक एक दिवसाच्या हिशेबाने पंचवीस वर्ष सोबर राहून एकाने त्या पंचवीस वर्षांचा 'भूतकाळ' देखील बदलून दाखवला! हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे, की तो चाळीस मधील पंचवीस वर्षे सोबर आहे आणि पंधरा वर्षे सातत्याने पिऊन राडा करण्यात गेली. हा काळ एकदम न घेता जर पंचवीस वर्षांचा घेतला तर निश्चितच तो भूतकाळ बदलू शकतो. असो.
आपल्या इथे एकजण  स्वतःशीच बडबड करतो. मी देखील काहीतरी जोरात बोललो (स्वतःशीच) तेंव्हा एकाने, 'त्याच्यासारखा ' काय बोलतो आहेस? असे विचारले.तेंव्हा मी म्हणालो , काही नाही self talk मोठ्याने झाला!
आपल्या नोटीस बोर्डवर एक अब्राहम लिंकनचे पत्र आहे. त्यातील बरेचसे शब्द तसेच ठेऊन स्वतःचे दोनचार आणि येथे सतत कानावर आदळणारे शब्द घालून 'व्यसनमुक्ती केंद्रातील गुरुजींना पत्र' एका सोबर बापाचे असे काहीतरी लिहिले आहे. नंतर दाखवेन.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....