Wednesday, 11 August 2010

विदूषक :जी.ए.कुलकर्णी


विशाल पसरलेल्या द्वादश गोपुरांनी सुशोभित असलेल्या रक्ताक्षीच्या मंदिरावर सुवर्णरंगाचा हंसध्वज मंदपणे थरथरत होता आणि शुभ्र कंदामधून केशरपुष्प उमलल्याप्रमाणे भासत होता. महामंदिराच्या दीर्घ, चित्रवेलीयुक्त अशा पाय-या ओलांडल्यावर खाली अत्यंत विस्तीर्ण असा संगमरवरी मंडप होता आणि त्या ठिकाणी आज राजसभेची योजना झाली होती. अर्धवर्तुळाकार मांडलेल्या अलंकृत आसनावर सर्व अमात्य तर राजवस्त्रात स्थानापन्न झाले होतेच, पण त्याशिवाय आजच्या विशेष प्रसंगी, पर्वतांच्या उतरणीवर राहणा-या वनजनांचे व्याधप्रमूख, सागराशी झुंज देत जगणा-या धीवरांचे नायक, झंजावाताप्रमाणे वनमुक्त संचारणा-या अश्वसमूहांना रजुबद्ध करणा-या अश्वव्यापा-यांचे नेते इत्यादी अनेक मांडलिकही उपस्थित होते. व्याधप्रमुखांच्या अंगावर कृष्णजीनांची आवरणे होती व त्यांनी कानात रुद्र-सुवर्णवलये अडकवली होती. धीवरांच्या अंगावर झगझगीत रेशमी वस्त्रे तंग बांधलेली दिसत होती आणि गुडघ्याखाली त्यांचे पाय उघडे, ओबडधोबड व केसाळ होते.इतर सराईत मानक-यांच्या समूहातून ते अवघडून, अस्वस्थपणे बसले होते. आणि स्वतःचे धैर्य टिकवण्यासाठी ते मधूनमधून आपल्या अनुयायांपैकी कोणावर तरी अकारण संतप्त होऊन कठोर शब्दांत कसल्या तरी आज्ञा देत होते.
सभामंडपापासून ब-याच अंतरावर, पट्टनगरीत होणा-या कोणत्याही समारंभास गर्दी करणा-या उत्सवप्रिय आणि निरुद्योगी नगरवासीयांची गर्दी होती, व त्यातही विविध केशभूषा केलेल्या नटव्या वस्त्रांतील स्त्रियांचा भरणा अधिक होता. परंतु एवढ्या शृंगारानेदेखील कदाचित इतरांचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही, या संशयाने कृत्रिम हातवारे करत, जरुरीपेक्षा जास्त मोठ्याने त्या क्षुद्र विषयावर तन्मयतेने बडबडत होत्या. सगळ्या जनसंमर्दावर अद्याप खेळीमेळीची छाया होती; कारण अद्याप धर्माचार्यांचे आगमन झाले नव्हते. अमात्यांच्या समोर ठेवलेले त्यांचे पीठ अद्याप अनधीष्ठीत होते, परंतु पारंपारिक प्रथेप्रमाणे तेथे सेवक चव-या ढाळत उभे होते आणि आता त्यांच्या चेह-यावरही क्लांतीची कळा दिसू लागली होती. जनसंमर्द एके ठिकाणी दुभागल्यासारखा झाला व त्याच्यात हास्याच्या लहरी उमटल्या. आपल्या दैनंदिन वस्त्रांवर एका बाजूने पूर्ण काळा व दुस-या बाजूने पूर्ण शुभ्र, असा वेश घातलेला विदूषक गाढवावर बसून राजसभेकडे येत होता. एका दोराच्या तुकड्याच्या टोकांना एका बाजूला घंटा व दुस-या बाजूला दीप बांधून त्याने तो आपल्या गळयाभोवती वेटोळ्याने टाकला होता, परंतु घंटेची जीभ काढून ठेवली होती व दीपात तेल अथवा वात काहीच नव्हते. भोवतालच्या कुत्सित उद्गारांकडे दुर्लक्ष करत तो राजसभेकडे आला, आणि उच्चै:श्रव्यावरून इंद्र उतरत असल्याच्या दिमाखानेच तो खाली उतरला. त्याला पाहून, फक्त सम्राटांच्याच विनोदाला हास्य अर्पण करण्याची सवय असलेल्या प्रधान अमात्यांच्याही मुद्रेवर स्मिताची भावना दिसली. विदुषकाने गळयाभोवतीची दोरी न काढताच दीप व घंटा एखाद्या देवतेच्या आयुधाप्रमाणे दोन्ही हातात उचलून धरली व राजसभेत प्रवेश करून तो सेनानायकांच्या आसनाशेजारीच, पण खाली संगमरवरी फरशीवर नम्रपणे बसला.
"स्वागत असो, बृहस्पती! आज गाढवावरून आगमन झालं?" सेनानायकांनी नाटकी गंभीरपणे विचारले.
"आपण चुकलात, सेनानायक! आपल्या दिवंगत पुण्यश्लोकांच्या पवित्र आज्ञेचा भंग केलात! साम्राज्यात कशालाही, कोणालाही, त्याच्या ख-या रोखठोख नावानं संबोधायचं नाही, अशी एक आज्ञा त्यांनी प्रसृत केली होती याचा आपणास विसर पडला आहे का? गाढवाला गाढव म्हणायचं नाही, तर त्यास मलराशीविमर्शक अथवा आजानुकर्ण म्हटलं पाहिजे. आत्ताच येत असता मी माझ्या मार्गावर एक मोठा कोलाहल ऐकला. घोड्यांचे केस कापून त्यांना नीटनेटके ठेवणा-या व्यावसायींचा, उंदीर मारून उपजीविका करणा-या श्रमिकांचा एक मोठा समूह राजसभेच्या दिशेनं आक्रमक आवेशात येत असलेला मला दिसला. गत राजसभेच्या प्रसंगी मासे धरणा-यांना, शिकार करून जगणा-यानां नवीन नामचिन्ह मिळून त्यांना सभेत मानाचं स्थान मिळालं, तेंव्हा या वेळी आपल्यासारख्या राज्यमंडलाच्या महत्वाच्या दिग्गजांना तसंच स्थान का मिळू नये, अशी त्यांची क्रोधजन्य विचारणा आहे.
तेंव्हा त्यांचं आगमन होण्याआधीच यांच्या प्रमुखांना अनुक्रमे अश्वकेशभूषारत्न आणि मूषककुलसंहारभास्कर अशा उपाधी देण्याची चतुर प्रधान अमात्यांनी योजना केली आहे, अशी वदंता आहे. मी फक्त वदंताच ऐकत असतो सेनानायक, सत्य नाही. एकदा काही तरी सत्य झालं की ते स्थिर, जड, चैतन्यहीन होतं, तर वदंता ही सदैव नवनवोन्मेषशालिनी असते. आणखी एक महत्वाचा विरोध म्हणजे-"
तोच विदूषकाचे लक्ष मार्गाच्या कडेने जात असलेल्या एखाद्या द्रोणमेघाप्रमाणे काळ्याकभिन्न दिसणा-या डोंबाकडे गेले. तो तात्काळ उठला व धावत जाऊन अति नम्रपणे त्याने डोंबापुढे दंडवत घातले आणि लीन स्वरात त्याच्याकडून अभय मागितले. भोवतालच्या संमर्दात हास्याचा मोठा स्फोट झालं, आणि डोंबदेखील किंचित लज्जित झाला. विदूषक उठला व मोठ्या गंभीरपणे स्वस्थानाकडे परतला.
"पण बृहस्पती, ही घंटा, हा दीप-ही आपली नवी बिरुदं कसली? त्यांचं प्रयोजन काय?" कोषाधिपतींनी विचारले.
"त्याचं असं आहे-आज एका तरी शहाण्याशी दोन शब्द बोलावेत अशी मला फार तीव्र इच्छा झाली. तेंव्हा त्याचा शोध करत असता उपयुक्त व्हावा म्हणून हा दीप मी घेतला आणि त्याचा शोध लागताच तो दिव्य सुवार्ता सर्वत्र सांगावी म्हणून मी घंटा जवळ ठेवली."
"परंतु हा कसला दीप आहे? त्यास तैल तैलिकेचा स्पर्श नाही, आणि त्या घंटीकेत जिव्हा नाही!" कोषाधिपतीला रंजवण्यासाठी उप
कोषाधिपतीने कुत्सितपने म्हटले.
"इतक्या दीर्घ कालावधीत मला एकही शहाणा भेटला नाही, तो आजच नेमका कसा काय भेटणार? तेंव्हा दीप प्रकाशित करण्याचा किंवा घंटा वाजवण्याचा प्रसंगच येणार नाही, असा माझा प्रथमपासून विश्वास होता." विदूषक म्हणाला.
"मग आपण घंटा आणि दीप या वस्तू घेतल्याच कशाला?" नौदलनायकांनी विचारले. कोणत्याही प्रसंगी आपण निदान एक तरी प्रश्न विचारला नाही, तर आपण सजीव आहो या गोष्टीवर जनतेची मुळीच श्रद्धा राहणार नाही, अशी त्यांची भावना होती.
पण जणू त्याच प्रश्नांची अपेक्षा करत असल्याप्रमाणे विदूषकाने तात्काळ सांगितले, "पण जर अकस्मात एखादा शहाणा भेटलाच, तर आपली सजगता असावी, म्हणून या वस्तू मी घेतल्या!"
कोषाधिपती प्रसन्न मुद्रेने हसले, पण धीवरप्रमुखाने मात्र कपाळाला वळकट्यांसारख्या नि:संशय आठ्या घातल्या व म्हटले, "वात नसता दिवा लागत नाही, जीभ नसता घंटा वाजत नाही, हे तर आमच्या प्रांतात लहान मुलालादेखील समजतं!"
विदूषक त्याच्याकडे वळला व त्याने धीवरप्रमुखांस अत्यंत नम्रपणे अभिवादन केले. तो म्हणाला, "मीनजालपाणी, आपले शब्द अत्यंत ज्ञानगर्भ आहेत. आपल्यापुढं हा सेवक अगदी य:कश्चित आहे." मग तो कोषाधिपतींकडे वळला व म्हणाला, "नाही तर माझी स्थिती हंसासारखी व्हायची!"
"हंसासारखी म्हणजे कशी?" नौदलनायकांनी विचारले. जणू त्या आमंत्रणाचीच वाट पाहत असल्यासारखे विदूषकाने आपले आसन प्रशस्त केले व तो सांगू लागला, "एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखाचा, लाल चोचीचा एक हंस हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला व त्यांनी हंसास
मानससरोवर सोडून जाण्यास सांगितलं, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता सुरु झाली होती."
"अनादिकालापासून हे सरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला, "शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर
मानससरोवर हवं कशाला?"
"आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे?
आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेक तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कोठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय व राजनीतीचा प्रगाढ अभ्यास केला होता.
"आणि आत्ताच्या आत्ता तो मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानांचा पूर्ण नाश करू!" एक तरून कावळ्याने गर्जून सांगितले.
"परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा त-हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपनीतीत स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले, "आपलं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे.
मानससरोवर हंसांसाठीच आहे, ही आपली प्राचीन परंपरा मला आढळ राखायची आहे. उलट, त्या पवित्र परंपरेच्याच सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी हंस कोण हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात हे कशावरून?"
"हंसाला या प्रश्नाचाच मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपण हंसच आहो हे सांगण्यास त्यास प्रमाण सुचेना.
कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला, "तेंव्हा प्रथम आपण या प्रश्नाचा निर्णय लावू. येथे उपस्थित असलेल्या सर्वाना आपण एकेक पान आणायला सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी लाल पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवं पान आणावं."
" पण या ठिकाणी हंसापेक्षा कावळेच संखेने जास्त आहेत." हंसी म्हणाली.
"देवी, आपले शब्द पूर्ण सत्य आहेत, पण तो आमचा का अपराध आहे?" नेता विनयाने म्हणाला.
"थोड्याच वेळात त्या ठिकाणी हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक अस्फुट काळी आणून ठेवली.
"कावळ्यांचा नेता म्हणाला, 'पाहिलंत? न्यायनीतीनुसार निर्णय घेऊन मी हंस ठरलो आहे, हे इतर सारे माझेच आप्तगण असल्यामुळे अर्थात ते देखील हंसच आहेत; आणि आता आपणच मान्य केलंत की, मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेंव्हा तुम्ही आता येथून जावं हे न्यायाचं होईल.'
"हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, 'प्रिया, तू खिन्न का?' ती म्हणाली, 'पानांच्या राशीनं का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल-जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल.'
"हंस हंसीबरोबर उठून जायला सिद्ध झाला, तोच वेगाने उडत चाललेल्या सुवर्णगरुडाशी त्याची भेट झाली. त्याने विचारले, हंस म्हटला की त्याचं मुख मानससरोवराच्याकडे असायचं, पण तू असा विन्मुख होऊन कुठं चाललास?" मग हंसाने सारी हकीकत सांगताच गरुडाच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार दिसला.""मित्र मी एक गरुड आहे की नाही, हे पानं गोळा करून हे क्षुद्र ठरवणार? माझ्या चोचीचा एक फटकारा बसला की त्या गोष्टीचा तात्काळ निर्णय होत असतो. त्या क्षुद्रांची तू गय करणार? जा, आणि आपल्या देवदत्त मानससरोवराकडे पाठ वळवू नको. उद्या हेच कावळे पानांचे भारे गोळा करत, माझ्या नंदादेवी कांचनगौरीवर अधिकार सांगू लागतील."
हंसीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला, पण हंस आता प्रज्वलित झाला होता व त्याला शब्दांची धुंदी चढली होती. हंसी हताश चित्ताने त्याच्याबरोबर मानससरोवरापाशी आली.
त्यांना पाहून कावळ्यांचा समुदाय त्यांच्यावर धावून आला. कावळ्यांचा नेता म्हणाला, "आणि त्याचा स्वर क्रोधापेक्षा दु:खाने कंपित झाला होता, 'मी अत्यंत शांतताप्रिय आहे, पण आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही आत्मसमर्पण, प्राणार्पण करू. हंस कोण याचा न्याय्य व नि:पक्षपाती निर्णय लागलेला आहे.'
"आता तर त्याचा स्वर दु:खापेक्षा अनुकंपेने आर्द्र झाला होता. त्याची अनुज्ञ होताच ते असंख्य कावळे हंसहंसीवर तुटून पडले, व त्यांचे शुभ्र पंख व लाल चोची यांचा विध्वंस झाला.
"पण झाडाच्या ढोलीतून एक खर हि हत्या पाहत होती. ती चित्कारत म्हणाली, "गरुडाची गोष्ट निराळी. त्यानं एकदा नखं फिरवली की दहा कावळ्यांच्या चिंधड्या होतात. पण तुम्ही झुंजणार कशानं? पांढ-या पंखांनी, डौलदार मानेनं, की माणकासारख्या चोचींनी? प्रतिपक्षाला चांगली समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल, तर शहाण्यानं त्याठिकाणी सत्य खपवायला कधी जाऊ नये.'
"खारीचा चित्कार काही कावळ्यांनी ऐकला आणि त्यांनी तिला देखील टोचून मारून टाकले. म्हणजे ते सत्य माहित नसलेला हंस आणि ते सत्य माहित असलेली खार या दोघांचाही सर्वनाश झाला.
तात्पर्य काय, स्वसंरक्षणाच्या संदर्भात सत्याचे ज्ञान-अज्ञान या गोष्टी पूर्णपणे असंगत आहेत. कारण अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य पूर्णपणे उदासीन असते. दुसरे एक शेष तात्पर्य असे की, मग तो स्वर कितीही तात्विक का असेना, "भोवती कावळे असताना खारीने चित्कारू नये," इकडे तिकडे पाहत विदुषक थांबला.
"मानससरोवर हे हंसाचं देवदत्त दान आहे, याचं आम्हाला देखील लिखित प्रमाण अद्याप उपलब्ध झालं नाही, " दंडाधिकारी असमाधानी स्वरात म्हणाले. "आणि हे कसलं आहे तात्पर्य? याचा मूळ कथेशी काहीसुद्धा संबंध नाही."
विदूषक हसला व म्हणाला, "तत्पर्याचं खरं कौतुक ते हेच! त्याचा मूळ कथेशी संबंध असलाच पाहिजे असा काही दंडक नाही. ते स्त्रीच्या कटीवरील बालकासारखे असते. ते तिचेच अपत्य असले पाहिजे असे नाही."
सेनानायकांनी आपले आसन किंचित विदूषकाकडे सरकवले व मोठ्या सलगीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांची मुद्रा दवाने भिजलेल्या रानशेणीसारखी झाली आणि त्यांचे डोळे, जगात हाडे थोडी दगड फार, असा साक्षात्कार झालेल्या वृद्ध कुत्र्याच्या डोळ्यांप्रमाणे ओलसर, उदास झाले. हि परिचित लक्षणे दिसताच विदूषक एकदम सावध झाला. सेनानायकांच्या प्रणयिनी शुक्लपक्ष कृष्णपक्षाप्रमाणे नियमित बदलत. निरनिराळ्या वस्तू स्वीकारून देखील आपल्या नूतन प्रणयिनीने आपली कशी कुशल प्रतारणा केली, हे आता आर्तपणे आणि अत्यंत सविस्तरपणे सांगायला सुरुवात करणार हे त्याने पुर्वानुभवाने ओळखले व तो तेथून तात्काळ उठला.
"असा अकस्मात स्थानत्याग का?' नेत्रपल्लवी करत कोषाधिपतींनी हसत विचारले. विदूषकाने आता पसरत चाललेल्या उन्हाकडे बोट दाखवले. ते आता त्याच्यापर्यंत सरकले होते आणि खालची फरशी स्पष्ट जाणवण्याइतपत तप्त झाली होती. तो म्हणाला,
"क्षुद्रांनी थोरांशी केलेला अतिपरिचय मानहानीकारक होतो, थोरांचा अनाहूत अतिस्पर्श तापदायक ठरतो. छायेचे संरक्षण न सोडता सूर्याच्या प्रखर वैभवाचा आदर करावा, आत्मसंयम न सोडता मदिरेचा स्वाद स्वीकारावा, आणि निष्ठेची अपेक्षा न करता स्त्रीसुख घ्यावे असं शास्त्रवचन आहे."
विदूषक त्या स्थानापासून किंचित दूर, अर्धवर्तुळाच्या दुस-या टोकाकडे येऊन बसला. त्याची काळीपांढरी वस्त्रे पाहून चव-या ढाळत असलेल्या सेवकांच्या चेह-यावर देखील हसू दिसले. विदूषक स्थिर झाल्यावर दुर्गाधिका-यांनी विचारले, "अहो बुद्धीभास्कर, हा भागीरथी कालिंदी वस्त्रालंकार कसला?"
विदुषकाने त्यांच्याकडे वळून वेताप्रमाणे लवून त्यांना प्रणाम केला व म्हटले, "आपल्यासारख्या मान्यवरांचं लक्ष या क्षुद्राकडे जावं यात मी धन्यता मानतो. मी या वस्त्रांस अत्यंत कृतज्ञ आहे. हि वस्त्रं म्हणजे दिनरात्र असून वर माझा मुखचंद्र ज्ञानतेजाने विराजत आहे."
भोवतालचे सारे अधिपती हसू लागले. पण कविराजांचे हास्य प्रथम संपल्यामुळे त्यांनी उपहासाने म्हटले, "पण चंद्र कधी इतका ओबडधोबड असतो का?" आणि त्यांच्या या प्रश्नाने पुन्हा हास्याच्या लहरी उमटल्या.
"परंतु कविराज, चंद्र अगदी शीतल, स्निग्ध असतो हे तरी आम्हा य:क्वश्चीतांना कोणी ऐकवलं, कवींनीच ना?
कवीचं खरं पाणी जोखलं ते एका गौड प्राकृत भाषेनंच! त्याभाषेत कवी आणि कपी या दोहोंनाही एकंच समान शब्द आहे, म्हणूनच ती राजसभेतून स्थानभ्रष्ट झाली आणि तिच्या जागी संस्कृत भाषा आरूढ झाली!"
विदूषकाने आपल्यावरील अस्त्र असे परतावल्याने कविराज अस्वस्थ होऊन लालसर झाले. त्यांनी ऐहिक गोष्टींवरून लक्ष काढले व युवतीने लत्ताप्रहार करताच उमलणारा अशोकवृक्ष हा सगळ्या ख-या प्रियकरांचा कुलपुरुष आहे अशा त-हेचे व्यावसायिक काव्य करण्यास ते शब्द शोधू लागले. म्हणून विदूषक इतरांकडे वळून म्हणाला,
"आपल्या राजनीतीत, अथवा शासनकर्तव्यात विशेषत: या भाषेचं मूल्य अमर्याद आहे. राजकारण आणि महाभारत यामध्ये एक लक्षणीय अंतर आहे. एकात द्रौपदी-वस्त्रहरण आहे, तर दुस-यात विवस्त्र, शुद्ध सत्यावर वस्त्राभरणे व अलंकार चढवत राहण्याचे कार्य असते आणि या कार्यासाठी संस्कृत भाषानिर्मित वस्त्रासारखी राजवस्त्रे मिळणे अन्यत्र केवळ अशक्य आहे. राजकारणात धर्मराज वस्त्रहरण करून सत्यस्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर सत्ताधारी दु:शासन भरजरी वस्त्रे टाकून डोळे दिपवीत स्वतःची लाज राखतात!"
"अहाहा! काय हे दैदिप्यमान बुद्धिवैभव!" भुवया उंचावत शुभ्राजटाधारी वेदमित्र ऋषी म्हणाले, "आपण आपलं पांडित्य घनघोर अरण्यात प्राप्त करून घेतलेलं दिसतं!"
वेदमित्रांनी भोवती असलेल्या आपल्या आश्रमातील शिष्यांकडे विजयाने पाहिले. त्यांच्या शब्दांनी शिष्यांच्या मुद्रेवर प्राचीन संस्कृतीला शोभेल एवढे स्मित दिसले.
"ऋषिवर्य, एकदा गुरूंचा अनुग्रह झाला, तेवढ्यावर हा क्षुद्र आपला बुद्धीसंसार चालवत आहे." विदूषक म्हणाला, "त्याचा पूर्वोतिहास असा आहे: अध्ययनासाठी मी माझ्या गुरूंच्या आश्रमात प्रवेश केला, परंतु माझा स्वीकार करून आशीर्वाद देण्यापूर्वी त्यांनी माझी कठोर परीक्षा घेतली. त्यांनी मला प्रथम छिद्रीकेतून पाणी आणायला सांगितले, व त्यासाठी एक वर्षाची मुदत दिली. मी वर्षभर प्रवास केला, व एक हिमखंड छिद्रिकेत ठेवून त्यांच्यासमोर सादर केला. गुरुवर्य म्हणाले, "जल प्रवाही तर असतं, अथवा त्याची वाफ होऊन ते ऊर्ध्वगामी तरी होतं. मग हा स्थिर हिमखंड म्हणजे जल कसं?" मी उत्तर दिलं, तपश्चर्या करून स्वर्गप्राप्ती करून घ्यावी, कि सामान्य जनांचे भूमिसमांतर जीवन जगावं याविषयी ध्यानस्थ असलेला मानव हा आत्माच असतो; हा हिमखंड म्हणजे जलाचं ध्यानस्थ स्वरूप आहे." गुरूंनी पुन्हा आज्ञा दिली, 'जा, आणि मृत्तिकेचा स्पर्श न झालेली, अविवाहित, सुगंधी पतिव्रता घेऊन ये. परंतु हे कार्य एक वर्षात नव्हे, तर एक मासात पूर्ण झालं पाहिजे.'
सुगंधी पतीव्रतांचा शोध करत मी एक मास कालावधीपर्यंत फिरलो आणि मग गुरुवर्यांपुढे एक चंपककलिका ठेऊन नम्रपणे उभा राहिलो. गुरूंनी प्रश्न केला, "हि सुगंधी नि:संशय आहे, पण ती अविवाहित पतिव्रता कशी? " मी उत्तर दिलं, 'तिचा विवाह होतो हे कुणालाच ज्ञात नाही. चंपकाला भुंगा स्पर्श करत नाही. मग गुरुवर्य, न स्वैर: कुत: स्वैरिणी?' मग गुरुदेवांनी पुन्हा आज्ञा केली, "जा, आणि एका घटीकेत परत ये. हरणाचे डोळे मृगजळ पाहतात व वंचित होतात. परंतु तू हरणाचे डोळे असलेले मृगजळ घेऊन ये.' मी राजमार्गावर आलो, त्या वेळी एक मृगनयना युवती चालली होती. मी तिला विनंती करून गुरुदेवांपुढे आणून उभं केलं. गुरूंनी पृच्छा केली, 'हि मृगनयनी खरी. परंतु ती मृगजल कशी?' मी म्हटलं, "स्त्रीचं सारंच चंचल असतं. तिचं सौंदर्य पाहता पाहता जराग्रस्त होतं. तिचं प्रेम क्षणभंगुर असतं आणि तिचं स्मित भूमीवर झर्रकन सरकणा-या ढगाच्या छायेसारखं असतं. चार पायांची स्वमिनिष्टा हवी असेल तर कुत्रा घ्यावा, तीन पायांची मन:शांती हवी असेल तर केशरयुक्त चंदनाचा त्रिपुंड भाळी धारण करावा, दोन पायांचा द्रोह हवा असेल तर स्त्रीचा स्वीकार करावा, आणि एका पायाचं सामर्थ्य हवं असेल तर हातात लोहदंड असावा.'
"माझ्या उत्तराने गुरुदेव प्रसन्न झाले व त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला. ते म्हणाले, "वत्सा, जा आणि ज्ञानी हो. तुला कोणत्याही परंपराजड गुरुकुलात प्रवेश मिळणार नाही, आणि कोणताही आचार्य तुला आपली दीक्षा देणार नाही, असा मी तुला आशीर्वाद देतो." गुरूंच्या या अनुग्रहामुळं, आचार्य वेदमित्र, या य:कश्चीताला काही ज्ञानकण प्राप्त झाले आहेत."
वेदमित्र ऋषींच्या शिष्यांना चेहरा लपवण्यास जागा सापडेना, परंतु या आपत्तीतून सुदैवाने त्यांची सुटका झाली. कारण इतक्यात भेरी-तुतारीचा नाद हवेत घुमला आणि राजसभेतील वातावरण गंभीर झाले. जमलेल्या जनसंमर्दावर हलकीच फुंकर पडल्याप्रमाणे सारे शांत झाले आणि फक्त स्त्रिया तेवढ्या दबलेल्या आवाजात कुजबुजत राहिल्या. रक्ताक्षीच्या मंदिराचे भव्य महाद्वार उघडले, आतून आठ वर्तुळपताका भोवती असलेली धर्मगुरूंची भरजरी वस्त्रांतील आकृती स्वस्थानसुसंगत अशा गतीने पाय-या उतरू लागली. सर्व राजसभा उभी राहून नतमस्तक झाली. धर्मगुरूंच्या आगमनानंतर सेवकांच्या हातातील चव-या जास्त जलद गतीने हलू लागल्या. धर्मगुरूंनी हातातील रत्नजडीत कमंडलू समोरील वेदिकेवर ठेवला आणि ते पिठावर आसनस्थ झाले. त्यांनी सुवर्णमुद्रीकांनी सुशोभित झालेली बोटे उचलून राजसभेस स्थानापन्न होण्याची अनुज्ञा दिली. त्यांच्या मागोमाग अभयराज, पीत कौपिनधारी वज्राचार्य आपल्या हितचिंतकांसह सभेत आले.
विजयराज एकाकी पावले टाकत आला व विदूषकापाशी उभा राहिला. त्यामागोमाग मंदिरातून नारीगणांनी सभेत प्रवेश केला. प्रधान अमात्यकन्या चंचला, रक्ताक्षीच्या अर्चना दासीची कन्या धृवशीला, आणि युवती रंगीत पुष्पगुच्छाप्रमाणे एकत्र आल्या व पिठाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न झाल्या, आणि त्यांनी धारण केलेल्या विविध पुष्पांच्या धुंद संमिश्र गंधामुळे राजसभा प्रसन्न झाली. आमात्यकन्येने कृष्णप्रपातासारख्या केशांत जाईची फुले खोवली होती, तर धृवाशिलेने वलयावलयांची केशरचना करून त्यावर सुरुंगीच्या फुलांचा साज चढवला होता. ती येताच धर्मगुरूंनी तिच्याकडे पहिले. तिने आपल्या दासीकडून पुष्पहार घेतला व तो धर्मगुरूंच्या गळ्यात घालून, त्यांच्या भालप्रदेशावर केशराचा तिलक लावला. तिने त्यांच्या पायाखालील लाल रेशमी पादपीठ सरकवलं व नम्रपणे अंगावरील उत्तरीय वस्त्र काढून त्यांच्या पायावर पसरले. त्या वस्त्राची जवनिका दूर होताच तिच्या अंगावरील चांदण्या जडवलेली मखमली वस्त्रे स्वच्छ झालेल्या रात्रीच्या आभाळाच्या तुकड्यासारखी चमकली आणि त्यातून रेखीव डौलाने उमटलेल्या तिच्या गौर यौवनाकडे पाहताना विदूषकाचे मन देखील लालसेने क्षणभर धुंद झाले. आपल्या स्थानाकडे जात असता अभयराज विदूषकाकडे पाहत किंचित थांबला तेंव्हा विदूषक नम्रपणे म्हणाला,
"अभयराज, आजच्या निर्णयात आपल्याला पूर्ण यश लाभो!" त्याचे शब्द संपताच बाजूला उभा असलेला विजयराज त्याच्यासमोर आला व विदूषकाची वस्त्रे पाहतच त्याच्या मुद्रेवर स्मित दिसले.
"विजयराज, आजच्या निर्णयात आपणाला पूर्ण यश लाभो!" त्यालाही तितक्याच नम्रतेने अभिवादन करत विदूषक म्हणाला.
विजयराज म्हणाला, "पंडित, राजमुकुटासाठी आम्हा दोघांपैकी कोणा एकाचीच निवड होणार हे आपणाला अज्ञात नाही. तेंव्हा आम्हा उभयतांनाही
पूर्ण यश कसं लाभणार?"
विदूषकाने गंभीरपणे उत्तर दिले, "एका ज्ञानहीनाला क्षमा असावी. परंतु राज्यव्यवहारात एकनिष्ठा समूळ नाशाला कारणीभूत ठरते. पण्याङनेचे नाव पंचकन्यांत येत नसेल, पण निदान वनवास, शिलावस्था असले भोग तरी त्यांच्या वाट्याला येत नाहीत. या व्यवहारी जगात आपली निष्ठा याशानुयायी ठेवण्यात हित असते. शिवाय राजसत्तेचा एक विशेष आहे आणि त्यामुळं सर्वच जनांना तिचं अमर्याद आकर्षण असतं. तिच्या प्राप्तीचा योग्यता अथवा गुणांशी फारसा संबंध नसतो, त्यामुळं ती पूर्णपणे आपल्या देखील आवाक्यात आहे असं प्रत्येकाला वाटतं. ती आपल्याला वारेल अशी एखाद्या खाटकालासुद्धा--क्षमस्व, विजयराज, प्रमाद घडला--एखाद्या अजापुत्रबलीदात्यालाही आशा वाटते. एखाद्या त्रैलोक्यसुंदरीकडे पाहताना ती आपल्या मर्यादेपलीकडची आहे हे एखाद्या मूढाला देखील समजतं आणि म्हणूनच एखादी पण्याङना ती केवळ प्राप्त असते म्हणून जास्त मोहक वाटते. त्यासाठी राजसत्तेची स्पर्धा असता असता प्रत्येक पंक्तीत आपले म्हणून एक पान मांडून ठेवावं लागतं. अंगठा कुठं दाबावा याचा विसर न पडू देता सगळी बोटं सर्वत्र स्पर्शून ठेवावी लागतात!"
"वा पंडितराज, आपण तर नव्या तत्वज्ञानाचं मंदिरच निर्माण केलं!" अभयराज हसून म्हणाला.
"नाही, गुणनिधी, यात नवीन काही नाही. आणि तत्वज्ञानाविषयी सांगायचं म्हणजे तो दुर्बलांचाच एकमेव छंद आहे. नाही तर सामर्थ्यशाली करतात तो धर्म आणि आणि कुटील जी आचरतात ती नीती, हीच स्थिती असते. दुर्बलांच्या वाट्याला राहता राहिलं ते तत्वज्ञान--धान्योल्लास संपल्यावर उरलेले कणजीवी क्षुद्र व्यवहार!"
"काही वेळा तत्वज्ञानाखेरीज आणखी काहीतरी विदूषकांच्या वाट्याला येण्याची शक्यता असते!" धर्मगुरूंनी त्यास कठोरपणे म्हटले. "शिथिल जीभ जेंव्हा मनोरंजन करते, तेंव्हा तिला क्षमा केली जाते; परंतु ती जर बंधमुक्त अश्वाप्रमाणे स्वैर झाली, तर तिला डोंबाकडून असुडांचे प्रहार भोगावे लागतात!"
विदूषक एकदम भानावर आला व त्याने धरणीवर अंग टाकून धर्मगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. धृवशिलेच्या वस्त्राच्या स्पर्शाने त्यास पुन्हा एकदा त्या वस्त्राने स्पर्शलेल्या तिच्या तारूण्योनन्त शरीराची जाणीव झाली, पण तिला बाजूला सारत तो म्हणाला, "धर्मभास्कर, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. कोणाच्या हाती सत्तेचा प्रतोद येईल हे सांगता येत नाही, म्हणून काही क्षणापूर्वीच मी डोंबाला साष्टांग नमस्कार घालून पूर्वतयारी करून ठेवली आहे!"
धर्मगुरूंच्या मुद्रेवरही किंचित स्मित दिसले व त्यांनी विदूषकास जाण्याची आज्ञा दिली. विदूषक नम्रतेने उठला, पण तेवढ्यात त्याने खाली पडलेली सुरंगीची दोन फुले उचलली व तो परत आपल्या जागी आला.
धर्मगुरूंनी हात उचलताच सभेत सर्वत्र शांतता पसरली. ते म्हणाले, "प्रजाजन आणि अमात्यमंत्री, आज आपण एका अत्यंत गंभीर आणि पवित्र कार्यासाठी राजसभेत आलो आहोत. आपल्या मागे महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिरावर साम्राज्यचिन्ह हंसध्वज सामर्थ्यानं शोभत आहे. आज या साम्राज्याचा अधिपती निवडण्याचं परम कर्तव्य आमच्या स्वर्गीय पितृदेवांनी केलं असतं, तर आम्हाला हर्ष झाला असता. परंतु एखाद्या पाषाणहृदयी शर्विलकाप्रमाणे मृत्युनं त्यांचे प्राण हरण केले व ऐन तारुण्यातच आमच्यावर ही महान धुरा पडली.-"
प्रधान अमात्यांच्या कंठात काही तरी क्षुब्ध घडले व त्यांना कंठोद्रेकाचा थोडा ताप झाला. त्या आवाजामुळे धर्मगुरूंच्या बोलण्यात व्यत्यय आला. त्यांनी प्रधान अमात्यांकडे रोखून पाहिलं. "क्षमस्व गुरुदेव," प्रधान अमात्यांनी नम्रपणे म्हटले; पण दृष्टी मात्र धर्मगुरुंवर तशीच रोखून ठेवली. अखेर धर्मगुरू नमले व मध्यंतरी काही घडलेच नाही अशा त-हेने ते पुढे म्हणाले,
"दिवंगत पुण्यश्लोक सम्राटांना पुत्रसुख लाभलं नाही. परंतु आपल्या अपरोक्ष हे स्वपराक्रमानं प्राप्त केलेलं विशाल साम्राज्य याचकाच्या अंजलीत अमूल्य रत्नाप्रमानं जाऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. सम्राट होणारी व्यक्ती धैर्यशाली, उदारमन, बुद्धिवान व धर्माचरणी असावी एवढ्यासाठी निवड करताना काही दिव्यं मांडावी अशी त्यांनी आम्हास आज्ञा केली होती. प्राथमिक दिव्यं ही प्रजाजनांच्या वतीनं मांडलेली असतात. त्यातून पार पडलेल्या दोन वीरांनी नंतर एकमेकांस दोन दिव्यं सांगायची असतात आणि पट्टाभिषेकापुर्वीच अंत्य दिव्यं हंसध्वज रक्ताक्षीच्या वतीनं धर्मपीठाकडून सांगितलं जाईल.
पुण्यश्लोकांनी मान्यता दिलेल्या प्राथमिक दिव्यांचा काळ एक मासापुर्वी संपला. विविध आकारांची, तीक्ष्ण दंत असलेली चक्रं, आणि अनेक खड्गं अति वेगानं फिरत आहेत अशा एका शस्त्रागारात एका कक्षेतून दुस-या कक्षेत जाणं; उग्र संतप्त अशा वन्य अश्वसमुहात जाऊन शामकर्णास मुखबंध घालणं; एका पर्वतशिखरावरून दुस-या शिखराकडे लोहरज्जुमार्गानं गमन करणं, आणि मत्त गजाच्या दंतावर दोन्ही पक्षी सुवर्णवलयं चढवून येणं अशी ती दिव्यं होती. सम्राटपदासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या द्विदश राजपुत्रांपैकी काहींचा खड्गानी शिरच्छेद झाला, काही अश्वसमूहात चूर्ण झाले, आणि काहींना उन्मत्त गजाच्या शुंडाप्रहाराखाली प्राणदान करावं लागलं. या सा-यातून विजयी झालेले दोन राजकुमार अभयराज आणि विजयराज यांची सुखकारक संगती आज राजसभेस प्राप्त झाली आहे. यापुढील दिव्यं त्यांनी एकमेकांस सांगायची आहेत. दिव्यं सांगताना अथवा स्वीकार करताना त्यांना एक उपदेशकाचं अथवा मार्गदर्शकाचं सहाय्य घेण्याची अनुज्ञा पुण्यश्लोकांनी देऊन ठेवली आहे. याप्रसंगी एकच एक वीर राहीपर्यंत दिव्यं स्वीकारावी लागतील. जर अंत्य दिव्यात कोणीच विजयी झालं नाही, तर हे साम्राज्य त्रिसंवत्सर कालखंडापर्यंत आमच्या अधिपत्याखाली पीठाच्या नामं चालावं, अशी पुण्यश्लोकांची इच्छा होती. परंतु आम्हाला राजसत्तेचा लोभ नाही की तिचं आकर्षण नाही. म्हणून या द्वयातून एकाची नियुक्ती होऊन आम्हाला मुक्तता प्राप्त व्हावी, अशी महादेवीपुढं आमची अत्यंत नम्र याचना आहे. अक्षरावलीनुसार प्रथम अभयराजांनी दिव्यं सांगावीत. अभयराज!"
अभयराज व त्याच्याबरोबर भव्य यष्टीचे वज्राचार्य उभे राहताच त्यांच्या हितचिंतकांनी जयजयकार केला. अभयराजने सभेला अभिवादन केले व वज्राचार्याकडे निर्देश करत म्हटले, "हे वज्राचार्य; यांच्या ज्ञानाचं मार्गदर्शन मला लाभणार आहे.
विजयराज नम्रपणे उभा राहिला, पण त्याचा कोणी जयजयकार केला नाही. तो शांतपणे पुढे आला व विदुषकासमोर उभा राहिला, "पंडितराज, या प्रसंगी आपण माझे मार्गदर्शक व्हाल का?"
विदुषक विस्मयाने आवाक झाला, परंतु सा-या सभेत उपहासाचे ध्वनी उमटले, आणि याच क्षणी अभयराजच्या मुद्रेवर विजयाचा संतोष दिसला. पण विदुषकाने स्वतःला सावरले व तो प्रौढपणे उभा राहिला.
"जर आपली इच्छा असेल, तर आपल्या सन्निध राहण्यात मला फार अभिमान वाटेल." तो म्हणाला
"मी राजकुमार आहे, परंतु मला इतरांप्रमाणे राज्य नाही. माझे पिता दिवंगत पुण्यश्लोकांच्या कारावासात कालवश झाले. मला मित्रपरिवार नाही की संपत्तीचं वैभव नाही. अशा स्थितीत नि:पक्षपाती मार्गदर्शन प्राप्त होईल ते दोघांकडूनच : रक्ताक्षी देवीकडून अथवा विदूषकाकडून! प्रत्यक्ष महादेवींचं मार्गदर्शन लाभण्याइतका मी पुण्यात्मा नाही. म्हणून माझा विश्वास पूर्णपणे आपल्यावर आहे."
सभेतील उपहास शमला आणि राजसभेचे डोळे अभयराजकडे वळले. राजसभेच्या पाय-या उतरल्यावर समोर विस्तीर्ण क्षेत्र होते. त्याच्या मध्यभागी तटासारख्या दुर्गम भिंतींचा कोट होता. त्या वास्तूला तीन प्रवेशद्वारे होती, आणि त्यांच्यावर तीन अंक चित्रित केले होते. अभयराजने तिकडे हात केला व म्हटले, "राजद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी या कारागृहाचा उपयोग केला जात असे. धर्मगुरूंच्या अनुग्रहामुळे ते आम्हास या दिव्यासाठी प्राप्त झालं आहे. वज्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यात काही परिवर्तनं घडवून आणली आहेत. या तीनपैकी एका द्वारानं प्रवेश केल्यास हिंस्त्र वन्य सिंहाशी गाठ पडते. दुस-या द्वारानं प्रवेश केल्यास क्रूर जलचरांनी भरलेल्या जलाशयात तोल जातो. आणि उरलेला मार्ग पूर्ण सुरक्षित आहे. तिन्ही मार्गांवर संपूर्ण अंधार आहे. पण पहिल्या दोन मार्गांवर मृत्युच्या मुखातून सुटण्यासाठी एकेक उपाय ठेवला आहे. सिहांच्या विभागात एक उपद्वार आहे. जलाशयावर एक दोर लोंबकळत ठेवला आहे. विजयराजांनी एका द्वारानं प्रवेश करून मागील द्वारानं बाहेर यावं अशी आमची इच्छा आहे."
त्या कारागृहाचा उल्लेख होताच आरशावर मंद अशी आर्दता दिसावी तशी भीषण स्मृतीमुळे भीतीची छाया सभेवर पसरली व दिव्याचे वर्णन ऐकताच तर नारीजनांच्या समूहातून दचकलेले श्वास स्पष्ट ऐकू आले.
विदूषकासह विजयराज पाय-यांकडे वळू लागताच धर्मगुरुंचे शब्द त्यांच्या कानावर पडले, "थांबा कुमार, आणखी एक संस्कार राहिला आहे. देवी रक्ताक्षी आणि साम्राज्य यांच्या वतीनं आपल्याला यश चिंतणारं प्रतीकं द्यायचं आहे. दिव्यं सांगण्याचा अधिकार अभयराजना प्रथम प्राप्त झाला. म्हणून आपल्याला प्रतीकं मिळतील ती प्रधानअमात्यकन्या आणि अर्चनाप्रमुखकन्या यांच्याकडून. अभयराजचा क्रम आला की त्यांना उपअमात्यकन्या, उपअर्चनाप्रमुखकन्या यांच्याकडून अभिवादन मिळेल."
धर्मगुरूंनी चंचला व धृवाशीला यांना डोळ्यांनी खूण केली. लवलवणा-या कलीकेप्रमाणे धृवशीला त्यांना सन्मुख आली. तिने विजयराजकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. तिने सहजपणे दोन कोमल बोटं दाखवली व 'होय' या अर्थी किंचित मान हलवून त्याच्या ओंजळीत सुरंगीची फुले व तिच्या बोटासारखेच दिसणारे कोमल केतकीपत्र टाकले.
ती डौलाने पाठमोरी झाली तेंव्हा ती समोरून जास्त आकर्षक दिसते की पाठमोरी याचा विदुषकाला संभ्रम पडला. परंतु तोच नुपूरांचा मंद झंकार करत विनयशील नजरेने चंचला आली व तिने विजयराजच्या ओंजळीत जाईची फुले व बेलाचे पान टाकले आणि तीन बोटे उभारत मध्यमेने त्याच्या कपाळी कुंकुम-तिलक लावला. त्यावेळी तिने दृष्टी वर करून त्यांच्याकडे पाहिले व ती तिथून निघून गेली.
विस्मित होऊन विजयराज क्षणभर खिळल्यासारखा झाला. पण विदुषकाने त्याच्या हाताला स्पर्श करताच तो भानावर आला. त्याने धर्मगुरूंना व सभेला अभिवादन केले व तो
विदुषकासह पाय-या उतरू लागला.
ते त्या भीषण दिसणा-या कारागृहापासून काही अंतरावर थांबले. राजसभेतील जनांचा शब्द आता पार मागे राहिला होता व समोर निद्रिस्त श्वापदांच्या डोळ्याप्रमाणे वाटणारे तीन प्रवेशद्वार मात्र दिसत होते. विदुषकाने निरखून पाहिले. तीनही प्रवेशद्वारे अगदी काटेकोर सारखीच होती, फक्त त्यांवरील अंक मात्र निरनिराळे होते. प्रत्येक द्वारावर ज्या ठिकाणी ती अजस्त्र भिंत संपत होती, त्या ठिकाणी रक्षकांसाठी एकेक शिखरस्तंभ होता. विदूषक व विजयराज निरीक्षणात व्यग्र असता आभाळातून एक गिधाड घिरट्या घालत शांतपणे पहिल्या शिखर-स्तंभावर उतरले व मान आवळून स्तब्धपणे स्थिर झाले.
विदूषक म्हणाला, "विजयराज, आत एकदा प्रवेश केल्यावर बाहेर पडण्यास एका घटीकेचाही अवधी लागणार नाही, पण तो प्रवेश तुमचं सारं भवितव्य ठरवणार आहे. एवढंच नाही, तर हा तुमच्या प्राणाचाही प्रश्न आहे. तेंव्हा पाऊल उचलण्यापूर्वीच विचार करावा."
"विदूषक, माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे त्रिदल बेलाचं पान पाहिलंस? चंचलेनं तीन बोटांनी तिलक लावून ते ओंजळीत टाकलं आहे. पण धृवशिलेनं हे द्विपक्ष केतकीपत्र दिलं आहे व दोन बोटं दाखवली. तेंव्हा त्यातील कोणता मार्ग योग्य याचा मला बोध होत नाही."
"कुमार, या प्रसंगी जर मी स्पष्ट बोललो नाही तर मी अधम ठरेन." विदूषक म्हणाला, "तुम्ही विचार करून पहा. चंचला विनयानं वागते, शालीनतेनं वस्त्रं परिधान करते, धृवशीला स्त्रीसुलभ आसक्तीनं प्रसाधन करते, म्हणून तुम्ही या जालात सापडू नका. शांत सागरात हिंस्त्र जलचर असतात आणि वा-याच्या कल्लोळात हंस प्रवास करतो. बाह्य स्वरूपावरून अंतरसत्या कयास बांधत राहणं हा आम्हा पुरुषांचा फार प्राचीन कालापासून चालत आलेला बुद्धीप्रमाद आहे. त्याशिवाय त्यांची नावं पहा, कुमार! शब्द म्हणजे स्वर-व्यंजनांचा क्षुद्र शृंगार नव्हे. परमेश्वराप्रमाणं प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य शब्दांमध्ये असतं. चंचलासारखं नाव इतकी वर्ष धारण करून ती स्थिरमना कधी तरी असू शकेल का? उलट धृवशीला या शब्दांची मुद्रा घेऊन तिला त्या गुणाच्या अल्प स्पर्शापासून तरी अलिप्त राहता येईल का? आणखी असं पहा, काही झालं तरी धृवशीला मंदिरातील प्रमुख सेविकेची कन्या आहे, आणि या साम्राज्यात सेविकांना विवाहाचा अधिकार प्राप्त झालेला नाही. त्यांना कुबेराची संपत्ती असेल, सम्राटांची सत्ता असेल. अनेक विशेष निर्णय रक्ताक्षी मंदिरातच ठरवले जातात याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु विवाहसुख मात्र त्यांच्या वाट्याला नाही, हे मात्र सत्य आहे. तेंव्हा तुमच्याशी विवाहबद्ध होऊन राज्ञीपद मिळवण्याची आकांक्षा तिच्यात नि:संशय नसणार. जर तिला सत्तेचाच मोह असेल, तर ती तिला तुमच्यापासूनच प्राप्त होईल असं नाही. अभयराजकडून देखील तिला ती मिळवता येईल. म्हणून विजयराज, तिची सूचना अत्यंत निरपेक्षपणे आली आहे यात तिळमात्र संशय नाही.
"उलट चंचला पहा. ती प्रधान अमात्यांची कन्या आहे. राज्ञीपद तिला अशक्य नाही; नव्हे, तिच्या बाबतीत तीच एक महत्वाकांक्षा असणं अगदी अनिवार्य आहे. तुमचं आगमन होऊन षण्मासाचा देखील कालावधी झालं नाही, पण त्याच्या पूर्वार्धातच तिनं दुती पाठवून आपली सारस उद्यानात भेट घेतली व प्रेमयाचना केली--"
त्या शब्दांनी विजयराज एकदम चमकला व त्याचा चेहरा गोंधळून गेला. ते पाहून विदूषक हसला. तो म्हणाला, "कुमार, इतरांना अज्ञात अशा अनेक घटना मला माझ्या या वस्त्रांमुळे सहज ज्ञात होतात. आपण गोंधळण्याचं कारण नाही. पण तेंव्हापासून तिनं तुमच्यावर जाळं टाकायला सुरुवात केली होती. आणि तुम्ही तिचा अव्हेर केलात."
"मी तिचा अव्हेर केला नाही,-विदुषक, मी माझी असहायता व्यक्त केली. ती अमात्यकन्या, मी राज्यहीन कुलाती राजकुमार! तेंव्हा या क्षणी तरी या असल्या स्वीकाराला काहीच अर्थ नाही. या दिव्यातून मी सुटलो नाही तर चिंताच नाही, आणि भविष्यकाली जर सम्राट झालो तर माझी निवड पूर्वीच झाली आहे."
"परंतु विजयराज, एक विशेष ध्यानात असू द्या. अव्हेरलेल्या स्त्रीसारखी भीषण वैरशक्ती कोणती नाही. तिच्या बाबतीत तिचे निशिगंध पुष्पासारखे ओठ तक्षकमुख होतात. कमलतंतूसारखे बहु खड्ग होतात, आणि अश्रुसारखे कोमल प्रणयास्त्र सर्वनाशी नारायणास्त्रासारखे होत असते. कुमार, आपल्या एका शब्दानं तुम्हाला मृत्युच्या मुखात पाठवण्याची संधी ती घालवणार नाही, याचा तुम्ही विश्वास बाळगा. कारण वैरपूर्तीच्या आनंदासारखा तृप्त हर्ष दुसरा कोणता नसतो. तेंव्हा तीन अंक असलेलं प्रवेशद्वार तुम्ही पूर्णपणे बंदच ठेवलं पाहिजे."
"मग मी धुवशिलेच्या सूचनेनुसार दुस-या द्वारानं प्रवेश करू का?" विजयाराजने अधीरपणे विचारले.
"हि इतकी अधीरता नको." विदूषक शांतपणे म्हणाला, " या जगात ज्ञानप्राप्तीचं आणखी एक पथ्य असतं. ज्ञानाचं विविध चिन्हांकडे सूक्ष्म ध्यान असावं हे तर असावंच; पण आपल्या मार्गात सत्य अंशाअंशाने प्रकट होत असतं, याची विस्मृती होता कामा नये. संपूर्ण सत्य पाहण्याचं भाग्य मानवाच्या दोन नेत्रांना कधीही लाभणार नाही, परंतु त्याला विविध अंश एकत्रित करता येतील, विविध खंड बुद्धीच्या सहाय्यानं सांधता येतील;
आणि एका खंडापेक्षा दोन साधित खंड जास्त सत्य असतात. धृवशीलेची सूचना चंचलेच्या दुष्ट सुचनेपेक्षा जास्त नि:स्वार्थी आहे, हे मान्य आहे, पण आपल्यापुढं आणखी एक सत्यांश असल्यामुळं ती देखील आम्हाला स्विकारणीय नाही. विस्तृत सत्याचा लाभ झाला कि संकुचित सत्याचा त्याग करावाच लागतो. कारण हे संकुचित सत्य त्या विस्तृत सत्यात सामावलेलं तरी असतं किंवा त्याच्याशी विसंगत तरी असतं. आपण नि:शंकपणे पहिल्या द्वारातून प्रवेश करावा."
"पहिल्या द्वारातून?" अविश्वासाने विजयाराजने विचारले, "पण त्याच शिखरस्तंभावर तर गिधाड उतरलं. गिधाडासारखा अशुभ पक्षी नाही!"
"ते गिधाड माझ्या निरीक्षणातून सुटलं नाही." विदूषक म्हणाला, "कुमार, गिधाड मृत्यूस्थळी मांसखंड तरी तोडत असतं किंवा जर ते वाट पाहत असेल तर ते नेहमी त्या स्थळापासून काही अंतरावर बसतं, त्याच स्थळी कधी नाही हे आपल्या नजरेस आलं असेलच. आता हे गिधाड पहिल्या शिखरस्तंभावर आहे खरं, पण त्याची दृष्टी मात्र दुस-या विभागावर आहे."
विजयराजची मुद्रा आत्मविश्वासानं उजळली. तो निश्चयी पावलांनी निघाला व त्याने पहिल्या द्वारातून प्रवेश केला. विदूषक काही काळ श्वास रोखून स्तब्ध उभा राहिला. एकेक क्षण अति मंद गतीने सरकू लागला. त्याला मनावरच्या चिंतेचा भार असह्य होऊ लागला व त्याने डोळे मिटून घेतले. थोड्या वेळाने मागील बाजूने जयजयकाराचे अस्पष्ट शब्द ऐकू येताच त्याने डोळे उघडले, तेंव्हा त्याला विजयराज धावत येताना दिसला. त्याने विदूषकाला दृढालिंगन दिले व हर्षाने म्हटले, "विदूषक, आपल्या बुद्धीनं आपण माझा प्राण वाचवलात!"
विदूषक काही बोलला नाही, पण हे स्तुतीचे शब्द आपल्या न्याय्य अधिकाराचेच आहेत, अशा त-हेचा भाव त्याच्या मुद्रेवर दिसला. त्यांनी परस्परांकडे अर्थपूर्ण दृष्टीनं पाहिलं, व धर्मगुरूंना अभिवादन केले.
अभयराजचा चेहरा मात्र नैराश्याने विषण्ण झाला. वज्राचार्यांनी त्याच्या बाजूने दुसरे दिव्य सांगण्यास सुरुवात केली तेंव्हा पुन्हा शांतता पसरली. खालील क्षेत्राच्या दुस-या भागात दोन रथ उभे केले होते. इकडे वज्राचार्यांनी अंगुलीनिर्देश केला. ते म्हणाले,
"या दोन रथांच्या अश्वसमूहापैकी एकास अत्यंत अंमली द्रव्यं भक्षणार्थ दिली आहेत, आणि त्यास प्रतोदस्पर्श होताच ते वायुवेगानं धावू लागतील. मग त्यांना रोखण्यास मृत्यूखेरीज इतर शक्ती या जगात नाहीत. दुस-या रथाचे अश्व सामान्य आहेत. पण विजयराज, रथात पदार्पण करण्यापूर्वी विचार करा. कारण या दिव्याची विशेष प्रतिज्ञा अशी आहे की, एकदा पदस्पर्श झाला की रथातून मागं येता येणार नाही."
विजयाराजच्या चालण्यात आता आत्मविश्वास आला होता, पण विदूषकाची मुद्रा मात्र जास्तच चिंताक्रांत झाली होती. तो विजयराजसह जाण्यास निघाला, त्या वेळी धर्मगुरूंनी इतस्तत: पाहीले व किंचित रोषाने विचारले, "धृवशीला कुठं आहे?"
भोवतालच्या युवतीवर्गात थोडी हालचाल झाली व चंचला पुढं आली, परंतु धृवशिला कुठे दिसली नाही. तिचा शोध करण्यासाठी धर्मगुरूंनी तात्काळ एका प्रतिहारीस पाठवले व ती येईपर्यंत त्यांनी चंचलेला खूण केली.
चंचला पुन्हा एकदा विजयराजसमोर आली, परंतु तिच्या संथ मुद्रेवर कसल्याच भावनेची छटा नव्हती. तिने कांही चंपकपुष्पे त्याच्या ओंजळीत टाकली व उजव्या गालावर केशराचे बोट ओढले. विजयराज आणि विदूषक धर्मगुरुंस सामोरे गेले व त्यांनी अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. ते परत वळून पाय-यांजवळ येतात-न येतात तोच धृवशिला प्रतीहारीसह त्या स्थळी आली. वेगाने आल्यामुळे तिचा श्वासोच्छवास जलद होत होता. तिने विजयराजच्या ओंजळीत दोनचार लाल रक्तपुष्पे टाकली, उजव्या गालावर कृष्णागरुचे बोट ओढले व ती परतली.
विजयराज व विदूषक रथांजवळ आले व त्यांनी दोन्ही रथांच्या घोड्याचे सूक्ष्म निरीक्षण केले. आठही घोडे काळ्याकभिन्न पहाडातून कोरल्याप्रमाणे सामर्थ्यशाली, निश्चल होते. दोन्ही रथांच्या रचनेत तिळाचा देखील फरक नव्हता. विदूषकाने प्रश्नार्थक मुद्रेने विजयराजकडे पाहताच तो उत्साहाने म्हणाला, "या क्रमात तरी मला कसलीच साशंकता नाही. धृवशिला व चंचला उभयतांनी उजव्या बाजूच्याच रथाची निवड करण्यास सुचवलं आहे. तेंव्हा आता निर्णयास कालावधी नको."
विदूषक किंचित हसला व म्हणाला, "राजकुमार, इतकी अधीरता नको. या मूढाच्या धार्ष्ट्याची क्षमा असावी. सूक्ष्म विचार करण्याचे परिश्रम वाचावेत म्हणून मानव, शक्य तर प्रथमदर्शनी सूचनांमधूनच आपले समाधान होईल असा आशय शोधून काढत असतो. धृवाशिलेनं आपल्या डोळ्यांखाली काजळरेखा रेखल्या आहेत, तिच्या नखाग्रांवर रक्तरंगी नवं प्रसाधन झालं आहे, हे आपण पाहिलंत? मृगयेच्या समयी व्याध सदैवच सारा देह ताणून सावध असतो हे सत्य आहे, पण शरसंधानाच्या क्षणी सा-या देहातील प्राण शराग्रावर एकबिंदू होतात. मृगयेतील हा खरा अंगारक्षण! विजयराज, तीन चीन्हांविषयी मानवानं सदैव जागृत असावं-- स्त्री नेत्रातील काजळ, पर्वतशिखरावरील अग्निजिव्हा, आणि कृष्णनागाच्या मुखावरील शुभ्र फेनरेषा! स्त्रीच्या डोळ्यात काजळ दिसलं की ओळखावं, हा तिच्या अतिसुखाचा क्षण आहे--अथवा अतिवैराचा! प्रथम तिनं अत्यंत नि:स्वार्थीपणे दिलेला, पण अल्प ज्ञानावर आधारलेला आदेश आपण मनाला नाही. तिच्या हृदयात आता ज्वलंत द्वेष उफाळलेला आहे. त्यासाठी आपणास कठोर प्रायश्चित्त देण्यासाठी तिनं हि सूचना केली नसेल म्हणून कशावरून?
"मग तर डाव्या बाजूच्या रथाची निवड निश्चितच झाली तर!" विजयराज म्हणाला.
"अद्याप धीर धरा, कुमार, सत्य इतक्या सहजतेनं प्राप्त होत नाही. सत्य दिसतं ते अंशा
अंशानंच नव्हे, तर ते अनेकदा सूक्ष्म, सूचक चिन्हं धारण करून येतं, आणि त्याचा अर्थ लावणं हे बुद्धीचं कर्तव्य आहे. उलट असं पहा, आपल्या नि:स्वार्थी सूचनेकडे दुर्लक्ष करूनही तुम्ही सुरक्षित राहिलात खरे, पण ते निव्वळ दैवयोगाने; परंतु आता मात्र तुमचं प्राणरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून धृवाशिलेनं ती सूचना केली नसेल का? आपल्या गालावर रेषा काढताना तिनं मानेनं होय असा काही विक्षेप केला नाही. परंतु कृष्णगरूचा कृष्णवर्ण हा अशुभ, निषेधात्मक आहे. तेंव्हा उजवा रथ नको, असा तिचा आशय असणं अशक्य नाही.
"म्हणजे विजयराज, तिच्या सूचनेकडे दुर्लक्ष नको, पण ती पूर्ण सत्यवाचक आहे असाही भ्रम नको. आपल्या सुदैवानं आणखी सत्यांशाचा लाभ आपणाला होत आहे. कुमार, आता घोड्यांकडे न पाहता त्यांच्या सेवकांकडे पहा. एक सेवक अत्यंत शांत, निश्चल आहे आणि हातात चर्मरज्जू घेऊन अनुभवी सेवकासारखा उभा आहे; तर दुसरा सेवक रज्जू एका हातातून दुस-या हातात नाचवत आहे व त्याचा चेहरा अत्यंत अस्वस्थ व भयभीत आहे. कुमार, उग्र अंमली द्रव्यं भक्षिलेल्या उन्मत्त अश्वांचे रज्जू हातात असता कोणता सेवक निर्भयपणे, शांत उभा राहील?"
विजयराजचा चेहरा विस्मयानं उजळला व त्याने विदूषकाकडे कृतज्ञतेने पाहत म्हटले, "आपली बुद्धिमत्ता अमर्याद आहे. मी तत्काळ दुस-या सेवकाच्या रथात पाऊल टाकतो." परंतु विदूषकाने त्याच्या हाताला स्पर्श करत त्यास थांबवले व म्हटले, "सत्य अंशाअंशाने प्रकट होतं, ते प्रसंगी चिन्हयुक्त असतं एवढंच नाही; काही प्रसंगी ते स्पष्टपणे न येता मायावी रूप धारण करतं. आत्ताच पहा, हे सारे अश्व अगदी समान दिसत आहेत. रथांची रचना देखील अश्विनीकुमारांसारखी आहे. विरोध आहे तो सेवकांमध्ये! आणि तोही एखाद्या प्रतीहारीलासुद्धा जाणवेल इतका उघड, स्पष्ट आहे. वज्राचार्य आपल्या दिव्याची मांडणी इतक्या सहजपणे करतील हे संभवत नाही. प्रतिपक्षाला निदान आपल्याइतकी बुद्धिमत्ता आहे असं समजणं हे ज्ञानाचं एक अंग आहे. हा सेवाकांमधला उघडा दिसणारा विरोध आपल्या दृष्टीस मुद्दाम पडावा असाच त्यांचा व्यूह आहे, विजयराज, हे मायाजाल आहे आणि आपण त्यात सापडू असा त्यांचा विश्वास आहे. सत्य जेंव्हा अगदी उघड याचकाप्रमाणे समोर येतं, त्या वेळी राजकुमार, आपण अत्यंत सावध राहण्याचा क्षण असतो. तेंव्हा आपण नि:संदेह त्या भयभीत सेवकाच्या रथातच प्रवेश करावा."
विजयराजच्या चेह-यावरील आदर द्विगुणीत झालं व त्याने अभिवादन करत रथात उडी घेतली, आणि आसुडाचा प्रहार केला. तो प्रहार ऐकताच जणू काही वीज पाहिल्याप्रमाणे दुस-या रथाचे घोडे घोर वादळाप्रमाणे उधळले आणि असावध असलेल्या सेवकास ओढत धावत निघाले. थोड्याच वेळात ते क्षेत्रमर्यादेबाहेर गेले आणि पलीकडल्या दरीत रथ शतश: विदीर्ण करत नाहीसे झाले. एवढ्यात विजयराजचा रथ रक्ताक्षीच्या मंदिरास प्रदक्षिणा करून समोर आला होता. त्याने रथातून उडी टाकून विदुषकाला पुन्हा आलिंगन दिले व गद्गदित स्वरात म्हटले, "तुम्ही माझे मित्र होता, आता आपण माझे गुरु झालात!"
राजसभेतून पुन्हा जयजयकार झाला. परंतु अभयराजची मुद्रा वर झाली नाही. वज्राचार्यांनी विषादाने कपाळावरील भव्य त्रिपुंड्र पुसला व हातातील दंड मोडून फेकून दिला.
"आता क्रम विजयराजचा आहे, आणि पूर्वतयारीसाठी त्यांना एक प्रहराचा अवधी दिला आहे." धर्मगुरूंनी घोषणा केली, "आणि त्या अवधीत सभेच्या मनोरंजनासाठी नृत्यसंगीताचा उत्सव होईल."
त्यांचे शब्द संपताच रक्ताक्षीच्या मंदिरातून वाद्यसंगीताचे स्वर-झंकार आले व त्यामागोमाग जणू ते स्वरच सुस्वरूप, रंगशोभित आकार घेऊन प्रकट झाल्याप्रमाणे कलावतींची माला दोन रेषेत बाहेर आली, आणि मंडपाच्या शुभ्र शिलास्तरावर त्याची नृत्यवलये लयबद्ध संगीताच्या लहरींवर फिरू लागली. प्रहरांचा काल सुकुमार पावलांच्या गतीने संगीतरूप होऊन नाहीसा झाला आणि राजसभेवर पुन्हा स्तब्धता पसरली. धर्मगुरूंच्या वेदिकेसमोर एका चौरंगावर विदूषकाने अगदी समान दिसणारे तीन वेत्र-करंडक आणून ठेवले. त्यांच्याशेजारी एका रुंद भांड्यात पाणी भरून त्याने त्यात घटिकापात्र टाकले व त्याने विजयराजला इशारा केला. विजयराज उभा राहिला व त्या सभेस उद्देशून त्याने म्हटले, "धर्मभूषण आणि सभाजन, या तीन करंडकांपैकी दोन करंडकात अत्यंत विषपूर्ण असे कृष्णसर्प आहेत; आणि या जलात घटिकापात्र आहे. अभयराजनी एका करंडकात हात घालून तो घटिकापात्र भरेपर्यंत करंडकात ठेवावा."
अभयराजची मुद्रा विषण्ण भयाने किंचित थरथरली व त्याने वज्राचार्यांच्या वृद्ध हातांस स्पर्श केला. वज्राचार्यांनी तीनही करंडकांचे निरीक्षण केले व अभयराजला मंद स्वरात सूचना केली. त्याच वेळी कलावतींच्या समूहामधून कृष्णकमळाच्या कळीसारखी दिसणारी एक शामा पुढे आली आणि तिने अभयराजच्या ओंजळीत सदाफुलीची फुले व आम्रमोहोर टाकला. तिच्या मागून येवून उप-अमात्यांच्या कन्येने त्याच्या ओंजळीत मेंदीची कोवळी पाने आणि तुळशीच्या मंजी-या टाकल्या. धर्मगुरूंनी मान डोलावली व अभयराजला अनुज्ञा दिली.
"पहिलीचं जीवन तृप्त आणि सफल आहे, तर दुसरी अद्याप मुग्धा आहे." विदूषक हलक्या स्वरात विजयराजला म्हणाला.
अभयराजची मुद्रा अद्याप विषादपूर्ण होती. परंतु तो निश्चयाने पुढे आला व मधल्या करंडकावरील वस्त्र बाजूला करीत त्याने आत हात घातला. आत हातास थंड वेटोळी लागताच त्याला विलक्षण आघात झाल्यासारखे वाटले. त्याचा चेहरा निस्तेज झाला आणि करंडकातील सर्प जणू त्या हस्तमार्गाने वर चढून मुद्रेवर उमटल्याप्रमाणे त्याच्या कपाळावरील शीर ताठ झाली. घटिकापात्रात क्षणाक्षाने पाणी शिरू लागले आणि थोड्याच अवधीत ते तळाशी गेले. अभयराजने झटक्याने हात बाहेर काढला व आता हर्षाने फुललेल्या वज्राचार्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले.
"हा दास अभयराजचं अभिनंदन करतो!" विदूषकाने नम्रपणे म्हटले, "त्याने आपल्या सेवकास तात्काळ तीनही करंडक नेण्यास सांगितले व तो विजयराजसह किंचित अंतरावर गेला.
"विदूषक, याही दिव्यातून अभयराज मुक्त झाला, तर मला पुन्हा दोन दिव्यं भोगावी लागतील! आमच्यापैकी एकच उरल्याखेरीज गत्यंतर नाही. मग आता आपली काय योजना आहे?" विजयराजने सचिंत होऊन विचारले.
"त्याची आपणास चिंता नको!" गूढपणे हसत विदूषकाने म्हटले व दुस-या सेवकास खूण केली.
त्याने चौरंगावर भरजरी वस्त्राने आच्छादित एक सुवर्णपात्र ठेवले. विजयराजने वस्त्र बाजूला केले. पात्रात दोन अत्यंत रसरशीत आकर्षक फळे ठेवली होती. त्याने अभयराजला म्हटले, "आमच्या देशात निर्माण होणारी ही अमृतफळे आहेत, परंतु यातील एक पूर्ण विषमय आहे. आपण त्यातील एक भक्षण करावं."
ती शामा पुन्हा सन्मुख आली व तिने त्याच्या ओंजळीत गोकर्णाची फुले व तृणांकुर टाकले. उप-अमात्यकन्येने नत दृष्टीने केशरपुष्पाचा बालकंद आणि नागलतेचे कोवळे पण त्याच्या ओंजळीत टाकले व स्वतःला मिटून घेतल्याप्रमाणे ती नारीजनांत मिसळून गेली.
अभयराजसह वज्राचार्य पुढे आले व त्यांनी स्तब्धपणे त्या कांचनवर्णी पक्व फलांचे निरीक्षण केले. अभयराजच्या मुद्रेवर आता आत्मविश्वास ओसंडत होता. वज्राचार्यानी एक शब्द उच्चारताच अभयराजने एक फळ उचलले व त्यात दात रोवले.
ते फलांश कंठाखाली उतरला असेल-नसेल, तोच त्याच्या हातातील फळ गळून पडले, आणि काळ्यानिळ्या भीषण चेह-याचा अभयराज खाली कोसळला. त्याचे मित्रगण आवेगाने त्याच्याभोवती जमा झाले. चौरंगावरील सुवर्णपात्र नेण्यास विदूषकाने सेवकास आज्ञा केली, आणि सेवक निघून गेल्यावर तो विजयराजकडे वळला. स्वतःच्या यशात देखील विजयराजला फार विषण्णता वाटली व तो काही अंतरावर जाऊन एकाकी उभा राहिला. मागून विदूषक आला. पण त्याचे विजयराजच्या मुद्रेकडे अवधान नव्हते.
"आता राजमुकुट आणि आपण यात फक्त एका पायरीचंच अंतर आहे!" तो संतोषाने म्हणाला, "करंडकाच्या दिव्यातून अभयराज मुक्त झाले यात आश्चर्य नाही; कारण मी कोणत्याच करंडकात सर्प ठेवला नव्हता. सगळ्याच करंडकात मी कमळाची देठं ठेवली होती!" विजयराजने त्याच्याकडे आश्चर्याने पाहताच विदूषकाचा उत्साह वाढला. व तो पुढे म्हणाला, "त्यानं त्यातून सहजपणे मुक्त व्हावं अशीच माझी योजना होती. विजयाच्या क्षणीच असावध होण्याचा शाप बहुसंख्य मानवांना असतो. उलट, ज्ञानी मानव यशान जास्त सावध होत जातो. परंतु फळांच्या बाबतीत द्यूत खेळण्याची माझी इच्छा नव्हती. विजयराज, कदाचित तुमच्या दृष्टीला तो विशेष आला नसेल, पण मला वज्राचार्यांच्या बुद्धीची परीक्षा पहायची होती. फळ विषपूर्ण करण्याआधी मी त्या फळाचा अगदी सूक्ष्म अंश काढला होता व फळाच्या बाजूला दातांच्या खुणा उमटवल्या होत्या. इतक्या उघड चिन्हांकडे पाहताच
वज्राचार्यांनी सावध व्हायला हवं होतं. परंतु आपण जो प्रमाद टाळला, तोच नेमका त्यांच्या हातून घडला. अभयराजने तेच फळ उचललं, पण प्रमाद काय, सत्कर्म काय--परिणाम एकाच होणार होता. कुमार, मी दोन्ही फळं पूर्ण विषमय करून ठेवली होती!"
विजयराज अविश्वासाने त्याच्याकडे पाहत राहिला. "विदूषक! काय हे पापकर्म! हा अधर्म आहे. उदारमन प्रतिस्पर्ध्याप्रमाणे आपण त्याला वीरोचीत अवकाश द्यायला हवा होता!" तो म्हणाला.
विदूषकाने निर्विकारपणे मान हलवली व म्हटले, "राजकुमार, भविष्यकाळात आपण सम्राट होणार आहात. त्यावेळी आपणाला या य:कश्चीताच्या शब्दाचं मूल्य समजेल! सर्व नियमांचं पालन करून युद्ध करण्याची इच्छा धरणा-यानं युद्धभूमीवर पाऊल टाकू नये. असलं रमणीय युद्ध हातात खड्ग धरण्याचा कधी प्रसंग न आलेल्या शब्दनट कवीच्या लेखनातच शोभतं! विजयराज, आपला गौड प्राकृत भाषेशी परिचय आहे?--जाऊ दे ते फारसे महत्वाचे नाही. ज्याला इंद्राणी मिळवायची आहे, त्याने पातिव्रत्याच्या कल्पना मानू नयेत; ज्याला राजसत्ता हवी आहे त्यानं धर्मकर्माची क्षिती ठेवू नये!"
विजयराज विदूषकाकडे व्यग्र नजरेने पाहत राहिला. सर्पाप्रमाणे भासणारी रज्जू खरोखरच सर्प निघाल्याप्रमाणे तो भयाने स्तिमित झाला होता. विदूषकाचे हे नवे दर्शन त्याला एखाद्या खड्गाच्या निष्ठाहीन, निर्विकार तीक्ष्णतेप्रमाणे भासू लागले आणि त्याच्या मनात अकस्मात एक विचार येऊन गेला : खड्गाच्याच तत्परतेने हा विदूषक आपल्या यशोमार्गावरील विरोध नष्ट करत चालला आहे खरा; परंतु उद्या आपण सम्राट झाल्यावर हा आपल्याशी एकनिष्ठ राहिलंच याचा आज काय विश्वास आहे? खड्ग आणि पण्याङना यांच्या निष्ठा सारख्याच सातत्याच्या असतात. उलट हा जर प्रतिपक्षाला मिळाला, तर ज्या निर्विकार सहजतेने त्याने अभयराजचा मृत्यू घडवून आणला, त्याच सहजतेने आपलाही नाश घडवण्यास त्यास किंचितही संकोच वाटणार नाही. अशा त-हेच्या व्यक्ती मित्र म्हणून शंकास्पद असतात; पण शत्रू म्हणून भयंकर ठरतात! --या विचाराने विजयराजच्या मनात कल्लोळ उडाला, आणि शिलावस्थेचे एकामागोमाग स्तर चढत गेल्याप्रमाणे त्याच्या मनाचा एक कोपरा पूर्ण कठोर होऊन गेला.
त्याच क्षणी धर्मगुरूंच्या सेवकाने येवून धर्मगुरूंची आज्ञा सांगितली. विदूषक व विजयराज समोर येताच त्यांना स्थानापन्न होण्याची अनुज्ञा मिळाली. धर्मगुरू म्हणाले, "विजयराज, धर्मपिठाच्या पक्षी आम्ही आपल्या शुभेच्छा प्रकट करतो. आता आपल्याला प्रतिस्पर्धी उरला नाही. पण सुवर्ण झालं तरी ते तप्त शुद्ध व्हावं लागतं. महामंगल मुकुटाचा आपल्या मस्तकास स्पर्श होण्यापूर्वी आपल्याला अंत्य दिव्यातून मुक्त व्हावं लागेल. राजपदाचा अनभिषिक्त याचक आणि मुकुटधारी सम्राट यांच्यात एका तप्तावस्थेचे अंतर आहे. आता आपल्याला विश्रांतीसाठी अवकाश नाही. तिथीचा अंत होण्यापूर्वी सम्राटाची निवड होणं अनिवार्य आहे."
"धर्मभूषण, या अंत्य दिव्यासाठी मी या क्षणी सज्ज आहे." विजयराज म्हणाला.
त्याच्या शब्दावर धर्मगुरूंनी संतोषाने मान हलवली. ते म्हणाले, "या दिव्याचे स्वरूप असं आहे : रक्ताक्षी मंदिराच्या परिसरात दोन प्राचीन उपमंदिर आहेत. यांत आता पूर्ण अंधार असून ती प्रजाजनांना कधी मुक्त नसतात. त्या मंदिरात हे अंतिम दिव्य घडेल. विजयराज, आमचे शब्द अवधानाने ग्रहण करा : एका मंदिरात आपल्याला अत्यंत प्रिय अशा व्यक्तीला बद्ध करून ठेवण्यात येईल. तिला कोणत्याही त-हेच्या यातना होणार नाहीत, परंतू बाहेर श्रवणी पडेल असा स्वर वा शब्द तिला निर्माण करता येणार नाही. एका मंदिरात वेदिकेवर रत्नदीपाच्या प्रकाशात राजमुकुट शोभत राहील आणि दुस-या मंदिरात राज्यपदापेक्षाही श्रेष्ठ असं प्राप्य प्राप्त होईल. विजयराज, एका मंदिरात प्रवेश केल्यास आपल्याला सर्वात अधिक प्रिय व्यक्तीच्या रक्तानं लांछित झालेला मुकुट हातात येईल, परंतु दुस-या मंदिरातील प्रवेशाने राजमुकुटाधिक श्रेयाची प्राप्ती होईल. आम्ही आणखी एका विशेषाचा निर्देश करतो. मंदिरात भूमीवर कुर्माकृती आणि कमलाकृती आहेत. यांतील एका आकृतीला आपला पदस्पर्श झाला, तर मंदिरात सूर्यप्रकाशाचा प्रवेश होईल ; परंतु दुस-या आकृतीच्या स्पर्शाने स्वतः आपला शिरच्छेद होईल.
"या दोन मंदिरांपैकी एकात आपल्याला प्रवेश करायचा आहे. राजकुमार, हे अंतिम दिव्य घोर आहे. यात आपल्याला सर्वात प्रिय व्यक्तीची हत्या, स्वतःचा शिरच्छेद यांची शक्यता आहे. अद्यापही आपल्याला अवधी आहे, आपण या दिव्यापासून निवृत्त होण्याची इच्छा धरत आहात का?"
विजयराजची मुद्रा कठोर झाली व त्याच्या स्वरात तीक्ष्णता आली. तो म्हणाला, "धर्मतेज, मी आपल्यापुढं स्पष्ट बोलत आहे याची क्षमा असावी. कदाचित तसं बोलण्यास मला पुन: अवकाशही प्राप्त होणार नाही. मला माझ्या प्राणाची क्षिती नाही. पुण्यश्लोक दिवंगत सम्राटांनी माझ्या पित्याच्या राज्याचा विध्वंस केला; माझे सारे आप्तइष्ट धारातीर्थी पतन पावले. माझ्या पित्याने कारावासात यमयातना सहन करत प्राणत्याग केला; माझी माता, माझ्या भगिनीने अग्निकाष्ठ भक्षण केले. मी त्या वेळी अज्ञान बालक होतो. परंतु ज्ञानी झाल्यावर पहिली प्रतिज्ञा केली की, मी माझं राज्य तर पुन्हा प्राप्त करून घेईनच, इतकंच नाही तर भविष्यात त्या साम्राज्याचा अधिपती होईन; आणि जिथं माझ्या पित्याचा अवमानित मृत्यू झाला, त्याच पठ्ठनगरीत त्यांच्या नावे पवित्र पुण्यदिन सुरु करीन! याच प्रतिज्ञेचं कंकण बांधून मी इथ आलो आहे. तिच्याच सामर्थ्यावर मी इतकी सारी दिव्यं निर्भयपणे जिंकली आहेत. आणि त्यानंतर अंतिम दिव्याच्या वेळी मी निवृत्त होईन अशी तिळमात्र तरी शक्यता आहे का? जर या दिव्यात मी यशस्वी झालो, तर प्रतीज्ञापुर्तीचे समाधान मिळेल, नच झालो तर माझ्या कुळातील हे अंत्य मस्तक देखील याच नगरीत नाश पावेल. धर्मरत्न, मी तयार आहे!"
सभाजन तटस्थ होऊन ऐकत राहिले, धर्मगुरूंनी शांतपणे मान डोलावली व म्हटले,"मग आपल्याला सर्वात प्रिय अशा व्यक्तीचा उल्लेख करावा. माझा शिष्योत्तम तिला मंदिरात नेऊन बद्ध करील. त्यानंतर घंटानाद श्रवणी पडला की आपल्यासह सारी सभा त्या दिशेने जाईल. तेंव्हा कालापव्यय न करता आपण आपल्या प्रियतम व्यक्तीचा निर्देश करावा."
विजयराजची मुद्रा विचारग्रस्त झाली. त्याची नजर सभेवरून फिरत नारीजनांवर क्षणभर रेंगाळली व अखेर विदूषकावर स्थिर झाली. त्याचा चेहरा एकदम उजळला व त्यावर स्मित दिसले. "शुद्धकर्म, त्याचा निर्णय घेण्यास मला किंचितही कालावधी नको. अनेक आपत्तीतून आपल्या बुद्धिसामर्थ्याने मला मुक्त करून ज्यानं मला चिरंतन ऋणी केलं आहे, त्या विदूषकापेक्षा मला या क्षणी अधिक कोणीही प्रिय नाही--"
या त्याच्या शब्दांनी सारी सभा विलक्षण विस्मयानं स्तब्ध झाली, परंतु धर्मगुरूंच्या मुद्रेवर समाधान दिसले. विदूषकाचा चेहरा मात्र विषादाने काळवंडला. त्याने विजयराजच्या नजरेला नजर भिडवली खरी, पण मृत्युच्या छायेने त्याचे मन दग्ध झाल्यासारखे झाले होते. तोच धर्मगुरूंचा शिष्योत्तम त्याच्याजवळ आला व त्याने त्याच्या हातास स्पर्श केलं. जणू मृत्युचाच स्पर्श झाल्याप्रमाणे विदूषक भयाने दचकला, परंतु त्याने स्वतःला सावरले व तो खालच्या मानेने त्याच्या मागोमाग निघून गेला.
थोड्या अवधीत घंटानादाच्या लहरी ऐकू येऊ लागल्या आणि संगमरवरी भूमीला देखील जाणवलेला कंप पावलांना स्पर्शू लागला. धर्मगुरूंच्या दोन्ही बाजूंना चालत राजसभा रक्ताक्षी मंदिराच्या मागील बाजूला आली आणि उत्कंठतेने समोर पाहू लागली.
धर्मगुरूंनी अनुज्ञा देताच विजयराज समोर निघाला. पण त्याच वेळी चंचला व धृवशिला कोणाचीही हालचाल दिसली नाही. जलपात्रात ठेवलेल्या वज्रमण्याप्रमाणे भासणा-या स्थिर निर्विकार डोळ्यांनी त्या शिल्पाकृतीप्रमाणे उभ्या होत्या. विजयराज त्या जोडमंदिरासमोर आला आणि एकाकी स्तब्ध उभा राहिला. परंतू आता त्याच्यात भीतीची छाया नव्हती. जीवनात प्रत्येकास कधी ना कधी कसला तरी चिरंतन स्वरूपाचा निर्णय घ्यावा लागतो, आणि अशा क्षणी प्रत्येक व्यक्ती सदैव एकाकीच असते, हा नवा प्रत्यय त्याला जाणवला होता. तो मंदिरासंन्निध येताच तेथील प्रतीहारींनी तुतारीचा नाद केलं व त्यास प्रणाम करून दोहो बाजूंनी रक्तश्वेत पुष्पांची वृष्टी केली.
पण भविष्याच्या स्थिर नेत्रात पाहत असल्याप्रमाणे विचारमग्न झालेल्या राजकुमाराला त्याचे भान नव्हते. आता सारे विश्व त्या दोन मंदिरात सामावलेले होते. त्यातील एकात, अगदी बाल्यापासून रात्रंदिवस, एखाद्या अस्त नसलेल्या तेजस्वी ता-याप्रमाणे डोळ्यासमोर झळाळणारा राजमुकुट होता. रक्तलांच्छित अथवा शुद्धतेज, पण तो राजमुकुट होता आणि जळजळीत वेदनेप्रमाणे जीवनात बाळगलेली प्रतिज्ञा आता त्यात सकलपणे विसर्जित होणार होती. दुस-यात राजमुकुटाधिक फल होते! राजकुमाराला वाटले, राजमुकुटापेक्षा जगात काय श्रेष्ठ वा अधिक असू शकेल? विद्वत्ता? पण ते काही एका क्षणात प्राप्त होणारे फळ नव्हे. शिवाय विद्वत्तेला कसले स्थान आले आहे? ती मान्य करण्यासही जनांत विद्वत्तेचा अंश असावा लागतो, आणि सामान्यजन हे मूढमती असतात. त्यामुळे कोणत्याही कालखंडात, अथवा देशात विद्वान हा अनिवार्यपणे निर्धन आणि सत्ताहीनच राहील. संपत्ती? ती तर राजमुकुटाच्या मागे बुभुक्षित श्वानासारखी येईल. मग एखादी त्रिभुवनसुंदरी? तिचे आपल्याला काय आकर्षण आहे? आपल्याला हव्या असणा-या स्त्रीइतके त्रिभुवनात कोणीच सुंदर नसते. मग? मग?...विजयराजने तुच्छतेने तो विचारच मनातून काढून टाकला व मंदिराचे निरीक्षण केले.
मंदिराचे शिल्प बिंब-प्रतिबिंबाप्रमाणे समान होते. एका रात्री जर राक्षसहस्ते त्यांची स्थाने परस्पर बदलली असती, तर ते परिवर्तन कोणाच्या ध्यानातही आले नसते. परंतु त्यांचे कांही विशेष विजयराजच्या संस्कारित दृष्टीतून सुटले नाहीत. :मंदिराच्या मागे उच्च स्थानी एक कृत्रिम जलाशय होता व त्यातून प्रवाह येण्यासाठी एक विशाल नलीकामार्ग असून त्याने दोन्ही मंदिरांना समान असलेल्या मधल्या भिंतीत प्रवेश केला होता. एका मंदिराच्या तोरणावरील कीर्तिमुख सहस्त्ररश्मीं सूर्याचे होते, तर दुस-यावर वालुकायंत्राची प्रतिमा होती. एका प्रतीहारीच्या गळ्याभोवती ताम्रतारेत व्याघ्रदंत होता, अग्रभागी एकावर आयाळाने सुशोभित अशी सिंहाची मुखाकृती होती, तर दुस-यावर नागफणा होता.
विजयराज थोडा वेळ स्तंभित झाला. सत्य हे अंशाअंशाने प्रकट होते; दोन अंशांचा संधी एका अंशापेक्षा जास्त सत्य असतो...सत्य हे सूक्ष्म सूचक चिन्हे धारण करत प्रकट होते...परंतु काही वेळा ते अत्यंत मायावी असते...त्याच्या मनात शब्दांचे प्रतिध्वनी घुमू लागले.
नागफणा, कपालाकृती, वालुकायंत्र! एवढ्या दैदिप्यमान साम्राज्याचा मुकुट असल्या अशुभ चिन्ह-मार्गाने कधी प्राप्त होईल का? उलट, दुस-या मार्गावर प्रतापी सूर्य, वनराजाकृती, व्याघ्रदंत अशी स्पष्ट राजचिन्हे आहेत. पण त्याच्या मनात पुन्हा प्रतिध्वनी उमटला : सत्य अगदी सहजस्पष्ट असते, त्यावेळी, राजकुमार, सावधानतेचा क्षण असतो; हे मायाजाल आहे--मायाजाल आहे....
या आंतरिक अस्वस्थतेने त्याचे मन बधीर होऊन जड होऊ लागले. या एकाकी क्षणी मनाची हि अवस्था त्याला असह्य होऊ लागली. त्याने किंचित कालावधी मिळवण्यासाठी दोन्ही मंदिरांना मंद गतीने प्रदक्षिणा सुरु केली. एका स्थानी तर त्याची मंदगती देखील थांबली. परंतू त्याने प्रदक्षिणा संपविली व तो पुन्हा मंदिरास सन्मुख झाल. आता त्याचा निर्णय झाला होता. इतक्या उघड मायाजालात सापडण्याइतका तो संस्कारहीन राहिला नव्हता. त्याने तेथूनच राजसभेला अभिवादन केले व धैर्याने पावले टाकत त्याने वालुकायंत्राचे कीर्तिमुख असलेल्या मंदिरात प्रवेश केला.
प्रतीहारींनी पुन्हा केलेला नाद हवेत विरला असेल-नसेल तोच मंदिराच्या आतील पाय-यांवरून विजयराजचे शीर गडगडत खाली आले आणि त्यामागोमाग दोन्ही हातांनी रक्तलांच्छित मुकुट धरलेले, त्याचे शिरच्छेद झालेले शरीर कोसळत येऊन मंदिराच्या द्वारपिंडीवर स्थिर झाले.
सारेच शब्द नष्ट झाल्याप्रमाणे समस्त सभा या आघाताने मूक झाली. धर्मगुरूही क्षणभर शिलाकृतीप्रमाणे भासले. पण काही अवधीनंतर त्यांनी संज्ञा केली. त्यांचा शिष्योत्तम दुस-या मंदिराकडे गेला व मागील दाराने प्रवेश करून त्याने विदूषकाला बंधमुक्त केले. परंतु या अल्पकाळात जणू यमयात्रा केल्याप्रमाणे त्याचा चेहरा रक्तहीन झाला होता व पायातील बळ ओसरले होते. त्याने विजयराजच्या अवशेषांकडे विषण्ण दृष्टी टाकली व आपले काळे-पांढरे वस्त्र सावरत, तो अवेळी संचारत असलेल्या पिशाचाप्रमाणे चालू लागला आणि थोड्याच बाजूला विस्तार पसरलेल्या, एखाद्या भव्य पण पाळीव सिंहाप्रमाणे वाटणा-या वनकुंजात तो दिसेनासा झाला.
आता मंदिरासमोरील विशाल लोहद्वारे पुन्हा मिटली. धर्मगुरू म्हणाले, "विधीलीखीतापुढं मानव असहाय आहे. आज चंद्रोदयापासून साम्राज्याचे शासन धर्मगुरूंच्या नावे चालेल. आम्हाला राज्यतृष्णा नाही, सत्तालोभ नाही; परंतु कर्तव्याची धुरा स्वीकारण्याचा क्षण येताच ती नम्रपणे स्वीकारणे हा धर्म आहे. भविष्यकालीन त्रीसंवत्सरानंतर जर सम्राटांची निवड झाली, तर हा विश्वासनिधी त्यांना देण्यास आमच्याइतका हर्ष कोणासच होणार नाही. पण त्या काळापर्यंत आपले कर्तव्य आम्हाला निरिच्छपणे पार पडले पाहिजे. प्रधानअमात्य, यापुढील योजनांचे मार्गदर्शन आपले कर्तव्य आहे."
सभा मुक्त झाल्यावर सारे जन बाधा झाल्याप्रमाणे शुन्यपणे विखुरले. प्रजाजनांचा समूह खालच्या स्वरात बोलत नाहीसा झाला, आणि रक्ताक्षी मंदिराभोवतालाचे विस्तीर्ण क्षेत्र वादळ अनुभवून स्वच्छ झालेल्या आभाळासारखे भासले.
वनकुंजात एका वृक्षाखाली विदूषक अंतर्यामी शतश: विच्छिन्न झाल्याप्रमाणे बसला होता. परंतु भोवतालची नि:शब्दता पावलांखाली दुमडत असल्याच्या स्वराने तो भानावर आला व त्याने मागे वळून पहिले. अंगावर उत्तरीयहीन घेतलेली, अमात्यकन्या असूनही अनवाणी असलेली चंचला येत होती. तिच्या गतीतला मंद नुपूरझंकार विरला होता, आणि मेखलेखेरीज ती अनलंकृत होती. तिने आरक्त वर्णाचे वस्त्र परिधान केले होते, व त्यावरील तिचे शांत मुख किंचित उघडलेल्या शिंपल्यातील मौक्तीकाप्रमाने दिसत होते. ती आली व विदूषकासमोर एका वृक्षाला टेकून उभी राहत तिने त्याच्याकडे शून्य दृष्टीने पहिले.
"तुमचे सारे प्रयत्न कालांतराने निष्फळ होऊन विधीलीखीताप्रमाणे सारे घडून आले!" ती म्हणाली.
विदुषकाने तिच्याकडे विषण्णतापूर्ण नजरेने पहिले व म्हटले, "अमात्यकन्ये, कालांतराने का होईना, तुझ्या प्रयत्नांना फळ आलं! तुझी वैरभावना आता तरी तृप्त झाली ना?"
"माझी वैरभावना?म्हणजे आपण काय म्हणता?पंडित विष्णुशर्मा?" तिने विस्मयाने विचारले.
पण विष्णुशर्मा हे नाव ऐकताच अकस्मात प्रहर झाल्याप्रमाणे विदुषक उभा राहिला, व त्याचे हात थरथर कापू लागले. "विष्णुशर्मा? कोणाला उद्देशून तू हे संबोधतेस?" निस्तेज मुद्रेने त्याने विचारले.
"पंडितराज, मला तो सारा वृत्तांत परिचित आहे," चंचला म्हणाली. "ज्ञानश्री मंगलनारायणांचे सुपुत्र! द्वादश वर्षे अध्ययन झाल्यावर तुम्ही श्रीशैल मंदिरात आपल्या बुद्धीतेजाने सभा जिंकलीत. पण आपण विरवर्मा राजाकडे राजपंडिताच्या वस्त्रांची सूचना करताच भर सभेत तुमची अहवेलना झाली. त्याचवेळी आपल्या पत्नीने एका क्षुद्र सेवकाच्या संगतीत केलेला द्रोह आपल्याला ज्ञात झाला. मग उद्वेगाने देशत्याग करून परीयात्रा करत कालिंदीच्या पैलतीरावरील कनिष्क देशात आलात. मग एका निर्जनसमयी तुम्ही तीरावर आपली वस्त्रे ठेवलीत व नदीच्या पाण्यात प्रवेश करून या साम्राज्यात येऊन ही विदुषकाची वस्त्रे धारण केलीत. आपण प्रथमत: विदूषकाचा वेश परिधान केलात, त्यास मी साक्ष होते."
विदूषकाचे डोळे विस्फारित झाले. त्याने विचारले, "पण अमात्यकन्ये, हा सारा वृतांत्त तुला कसा ज्ञात झाला?"
"मी त्या दिवशी पर्वतेश्वराच्या उत्सवासाठी प्रात:पूजनासाठी गेले होते. कालिंदी ओलांडून येऊन येथे विदुषकाची वस्त्रे घालणारे जन प्रतिदिनी सहस्त्रांनी दिसतात असे नाही. मग मी एका मातुलतुल्य, वृद्ध आजीवकाला सारा वृत्तान्त शोधण्याची प्रार्थना केली."
"सारा आवेग ओसरल्याप्रमाणे विदुषक खाली बसला. "म्हणजे तुझ्यासह आणखी एका व्यक्तीला ही माझी भूतकथा ज्ञात आहे तर! आणि कथा तिघांना ज्ञात असली कि सा-या पृथ्वीवर तिच्या शाखा पसरत जातात."
"त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. ती व्यक्ती चार महिन्यातच वार्धक्याने कालवश झाली. आता याक्षणी चंचलेखेरीज इतरांना हा वृत्तांत अज्ञात आहे. पण पंडित, माझ्या वैरभावनेचा आपण निर्देश केलात त्याचा हेतू काय?"
ती छद्मीपणाने बोलत आहे कि काय हे विदुषकाने पाहिले. तिच्या हताश डोळ्यांत विषाद होता, परंतु व्यंगाचा तिरस्कार नव्हता. "चंचले, उद्यानातील भेटीत विजयराजनी तुझ्या प्रेमाचा अव्हेर केला--" विदूषक सांगू लागताच चंचलेची मुद्रा वेदनेने आरक्त झाली ती दचकली. विदूषक कटूपणे हसला.
"--तुला जसे वृतांत्त समजतात तसे मलाही समजतात! --त्याच वेळी तुझ्या मनात वैराचा वडवानल जागृत झाला. अव्हेरलेली स्त्री तक्षकासमान असते. आपल्या एका मायावी शब्दाने विजयराजना मृत्युमुखात बळी देण्याची संधी तू दवडणार नाहीस, असा माझा नि:संशय विश्वास होता.
पण धृवशीला काही झाले तरी दासिकन्या आहे. विवाहाचा पवित्र अधिकार आपणाला कधी प्राप्त होणार नाही याची तिला पूर्ण जाणीव आहे. म्हणून तू तिस-या प्रवेशद्वाराची सूचना करताच मी ती प्रथम वर्ज्य केली. निवड होती ती पहिल्या आणि दुस-या दारांत! परंतु मानवाच्या जीवनात संपूर्ण सत्य कधी दर्शन देत नाही. ते अंशाअंशाने सूक्ष्म लक्षणाने दृश्यमान होते. ते पाहण्याची प्रखर बुद्धी मात्र हवी याच वेळी एक गिधाड पहिल्या शिखरस्तंभावर स्थिर झाले. गिधाडे मृत्युस्थलापासून कांही अंतरावर प्रतीक्षा करत असतात,म्हणून मी विजयराजना पाहिले प्रवेशद्वार सांगितले. तुझी कुटील योजना असफल झाली आणि य:कश्चीताच्या बुद्धीमुळे विजयराज त्या दिव्यातून पार पडले."
वेगवान प्रपाताकडे भयभीत पण आकृष्ट होऊन अनिमिष पाहत राहावे त्याप्रमाणे अमात्यकन्या विदूषकाकडे पाहत राहिली.
"तीच कथा दुस-या दिव्याची.विदूषक उत्तेजित स्वरात म्हणाला, " तू पुन्हा प्रयत्न केलास व उजवीकडच्या रथाची सूचना दिलीस. तुझ्या मागून आलेल्या धृवशिलेने तीच सूचना केली. कारण ती आपण निव्वळ दासीकन्या म्हणून आपल्या निरपेक्ष सहाय्याची अहवेलना झाल्याने संतप्त झालेली स्त्री होती. पण सत्य काही वेळा फार मायावी स्वरूपात प्रकट होते. सारे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ वाटते, त्याचवेळी चंचले, सावध राहण्याचा क्षण असतो. रथाचा रज्जू धरलेला एक सेवक अत्यंत अस्वस्थ, भयभीत होता, तर दुसरा शांत होता. निव्वळ बाह्य तंत्राने पाहणा-याने दुस-या रथाची निवड केली असती. परंतु हे मायाजाल मी जाणलं व पहिल्याच रथाची मी निवड केली. विजयराजना मी माझ्या बुद्धीने वाचवलं, इतकंच नाही, तर प्रतिपक्षाला पराभूत करण्यातही मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. तीनही करंडकात मी एक सर्प ठेवला नाही. एका फळांचा अल्पांश काढून मी त्या ठिकाणी दातांच्या खुणा उमटवल्या. खुणा असलेलं फळ नेमकं त्यानं उचललं व त्याचा मृत्यू ओढवला.
"परंतु विजयराजच्या अंत:करणाचा एक भाग कुटीलकृष्ण होता हे ज्ञान मला नंतर झालं. पहिल्या दोन उज्वल यशानंतर त्याच्या मनात कृतघ्नता निर्माण झाली, आणि अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणून छद्मीपणाने त्यांनी माझा निर्देश केला. हे त्यांनी निष्पापपणे, सरळ केलं असतं, तर मला धन्य वाटलं असतं. मला माझ्या विषयुक्त पूर्वायुष्याचा विसर पडला असता. परंतू माझी उपयुक्तता संपल्याचा भास होऊन जणू माझा त्याग करण्याचा एक क्षुद्र मार्ग, म्हणून त्यांनी माझा नामोल्लेख केला. चंचले, ज्या स्त्रीसाठी त्यांनी तुझा अव्हेर केला, ती या प्रसंगी त्यांच्यासमवेत या नगरीत आली नसेल असं का तुला वाटतं? त्यांन नारीजनांवर नजर फिरवली, त्या वेळी एका क्षणी त्यांच्या डोळ्यांत ओळखीची चमक दिसली, हा विषय इतरांना अज्ञात राहिला तरी तो माझ्या निरीक्षणातून सुटला नाही. पण सत्यज्ञानाचे सारे मार्ग आपल्याला हस्तगत झाले आहेत, असं त्याला भ्रम झाला व त्याने स्वतःच्या अल्प ज्ञावर अमर्याद विश्वास ठेवला. परंतु चंचले, एक गोष्ट ध्यानात ठेव. अत्यंत निरपेक्ष गुरूने आपली सारी विद्या जरी शिष्यास दिली, तरी एक ज्ञानविशेष मात्र तो कधी देऊ शकत नाही. शिष्याला विद्यादान करत असतानाचा तो जो अनुभव असतो, त्याचे ज्ञान मात्र शिष्यास कधीच मिळत नाही. आता विजयराजला आपल्या कृतघ्नतेचे पूर्ण प्रायश्चित्त मिळालं. मी त्याच्या शेजारी असतो, तर मी माझ्या तेजस्वी बुद्धीमत्तेने त्याला राजमुकुट प्राप्त करून दिला असता. एका बाजूला प्रतापी सूर्य, सिंहमुख, व्याघ्रदंत आहे' तर दुस-या बाजूला वालुकायंत्र, सर्पमुख, कपालाकृती अशी अशुभ चिन्हे आहेत. त्याने दुस-या मंदिरात प्रवेश केला, याचे कारण त्याचा रथदिव्याचा अनुभव! तेंव्हाचे माझे मार्गदर्शन आठवून त्याला हे सारे मायाजाल वाटले. पण सत्यशोधनात असे निश्चित नियम, सूत्रकुंचीका नसतात. नव्या सूर्याकडे पाहावे, तद्वत प्रत्येक नव्या अनुभवाकडे तो असामान्य असल्याप्रमाणे पाहावे लागते. सत्य खंडश: दृश्यमान होते, ते अनेकदा मायावी असते हे खरे; परंतु मायावी दर्शन देऊन मानवाला वंचित केल्यावर ते अनेकदा सरळ, दैदीप्यमान स्वरूपात प्रकट होते. पण वंचित झालेला मानव त्यालाही आभास समजून असत्याकडे वळतो. आभास व सत्य यातील विरोध ओळखणे हा खरा ज्ञानमार्ग आहे. या ठिकाणी सत्य सरलस्पष्ट होते, परंतु विजयराजची बुद्धी नियमविद्ध चक्रांतून गेली, आणि त्याचा शिरच्छेद झाला. तुला त्याचा शिरच्छेद हवा होता. पण तो तुझ्या प्रयत्नांनी घडला नाही, माझ्या बुद्धिमत्तेने तो थांबला नाही; तो विजयराजनी स्वतःच्याच कृतघ्न मंदबुद्धीने घडवून आणला!"
एकाग्रतेने सारे ऐकत असता चंचलेची तन्मयता भंग पावली; पण एखाद्या अकस्मात मुक्त झालेल्या जलप्रवाहाप्रमाणे खळाळत ती डोळे विस्फारत करत हसत राहिली. विदूषकाची विषण्ण मुद्रा किंचित संतप्त झाली व त्याने कठोरपणे विचारले, "अमात्यकन्ये, तुला भ्रम झाला आहे, की तू माझ्या बुद्धीसामर्थ्याचा अधिक्षेप करत आहेस?
चंचला तशीच हसत राहिली. परंतु नंतर एखाद्या तेजस्वी वज्रमण्यावरील तलम आवरणे मागोमाग नाहीशी होऊन त्याचा प्राण असलेली कठोर, स्थिर, वज्रकलिका स्पष्ट व्हावी, त्याप्रमाणे ती शांत, संयत झाली आणि नम्रपणे विदूषकाच्या पायांशी बसली.
"पंडितराज, एका अज्ञ कन्येच्या औद्वत्याची क्षमा असावी." ती सांगू लागली, "मी ज्ञानाच्या उपासनेत शरीर झिजवले नाही, की तत्वज्ञानाच्या काठीण्याचा अनुभव घेतला नाही. सत्य हे खंडश: येत राहते, की ते मायावी स्वरूपात दिसते, की एखाद्या दिव्य दर्शनाप्रमाणे सरळ प्रकट होते याची मला काहीच कल्पना नाही. मी वर्तमानाच्या क्षणिक निरंतन लहरीवर जगणारी एक य:क्वश्चीत युवती आहे. भविष्यकाळाचे विविध, तलम तरंग माझ्यामधून संक्रांत होतात आणि भूतकाळात मिळून जातात. आणि मग मला माझे सत्य त्या भूतकाळात दिसते, भविष्यकाळात नव्हे. चालत असता पावलांची खूण उमटून त्यात पाणी साचावं, आणि मागे वळून पाहताना त्यात चंद्राचे किंचित प्रतिबिंब दिसावं, तसं मला सत्य दिसतं. हे सत्य माझंच, माझ्यापुरतंच असतं, कारण त्यावर माझ्या जीवनाची रक्तमुद्रा असते. त्याचं दान करता येत नाही, की इतरांकडून त्याचं स्वीकार करता येत नाही. प्रत्येकानं आपापलं सत्य स्वतःच्या रक्ताच्या स्पंदनावर पारखून घ्यावं लागतं. ज्या सत्याची देवाणघेवाण होऊ शकते, किंवा ज्यांबाबत विविध प्रकृतींच्या जनांचे एकमत होते, ती सत्ये क्षुद्रमोलाची असतात, किंवा अप्रस्तुत, निर्जीव घटीते तरी असतात. वारा वाहतो, वृक्षांना पाने येतात, शिलाखंड पाण्यात बुडतात ही निव्वळ घटीते आहेत. त्यांच्यावर माझ्या भोगांची, हर्षाची मुद्रा नाही. म्हणून ती घटीते म्हणजे माझी सत्ये नव्हेत, हे एवढेच अद्याप माहित असलेली मी एक अज्ञ आहे. म्हणून पंडितराज, संतप्त होऊ नका. मी तुमच्या निवेदनाचे स्पष्ट रूप सांगणार आहे. पण एक आधी सांगा. ते खंडश: प्रकट होणारे सत्य, मायावी सत्य इत्यादींविषयी ज्ञान देणारी जी बुद्धी, तिलाच मार्गदर्शन करणारी आपली कोणती शक्ति आहे?"
"अमात्यकन्ये, हा प्रश्नच अर्थहीन आहे. जी दुस-याला मार्गदर्शन करते तिला कोण मार्गदर्शन करणार? जिच्या प्रकाशात सत्य आढळते तिला परप्रकाश कशाला? ती अविनाशी, सामर्थ्यशाली, अस्खलित आहे."
"वाचस्पती, पुन्हा औद्वात्याची क्षमा असावी." चंचला म्हणाली. "तिचे अस्खलित स्वरूप आपण पारखून घेऊ. तुम्ही माझ्या वैरभावनेचा निर्देश केलात. विष्णुशर्मा, जर ती सारी दिव्ये पार करून विजयराजना साम्राज्य मिळाले असते, तर मी कोणत्याही दिव्यास विवाहवेदीवर चढण्याच्या आनंदाने संमती दिली असती, उगारलेल्या खड्गाखाली मी प्राणार्पण केलं असतं,--- त्या विजयराजच्या नाशासाठी मी प्रयत्न करीन? पारिजातक आपल्या दारी लागला नाही म्हणून मी त्याच्यावर कुठ्प्रहार करणार नाही. की त्याची प्रभा आपल्या नेत्रात साठवता येत नाही म्हणून मी रत्नदीप फुंकणार नाही. उलट ध्रुवशिलेच्या बाबतीत आपलं मापन असंच सदोष झालं. रक्ताक्षी मंदिरात गुप्तपणे तिचा अभयराजशी गांधर्वविवाह झाला होता ही घटना आपल्याला ज्ञात दिसत नाही!"
"अशक्य! केवळ अशक्य!" अस्वस्थपणे विदूषक म्हणाला, "दासीकन्येला विवाहाचा अधिकार नाही, हे अभयराज आणि धृवशीला या उभयतांना देखील ज्ञात असलं पाहिजे."
"होय, आणि असल्या विवाहसंस्कारांना कांही अर्थ नाही, हे माहित असल्यामुळेच स्वतःच्या स्वतंत्र वैयक्तिक स्वार्थासाठी तो स्वीकारायला उभायतांनाही किंचित क्षिती वाटली नाही ! पण तेवढ्यासाठी तिनं विजयराजचा मृत्यू घडवण्यासाठी दुस-या प्रवेशद्वाराची सूचना केली होती."
"पण चंचले, तू स्वतः तीस-या प्रवेशद्वाराची सूचना केली होतीस. मी माझ्या प्रखर बुद्धीनं विजयराजना पहिल्या द्वारातून प्रवेश करण्यास सांगितलं व त्यांचं प्राणरक्षण केलं."
"पंडितराज, वज्राचार्यांनी कारागृहाला चक्रव्युहाचे स्वरूप दिले होते. तीस-या प्रवेशद्वाराचा मार्ग पहिल्या कक्षेत जातो व तेथून निर्भयपणे बाहेर पडता येतं. दुस-या प्रवेशद्वाराचा मार्ग तीस-या कक्षेत आहे. आणि त्या ठिकाणी तो मृत्यूचा जलाशय आहे. आणि पहिल्या द्वाराचा मार्ग दुस-या कक्षेत आहे व तेथे संतप्त, उग्र सिंह मुक्तावस्थेत आहे."
"ते सर्वस्वी अशक्य आहे. त्या पहिल्या द्वारातूनच आत जाऊन विजयराज सुरक्षित बाहेर आले." विदूषकाने निश्चयाने म्हटले.
"ते सत्य आहे. परंतु आज सकाळी मांसान्न नेणा-या सेवकाला मी नवरत्नयुक्त सुवर्णमुद्रिका दिली व त्या अन्नात मादक द्रव्य मिसळली. तो सिंह आता अष्टप्रहर तरी निचेष्ट होऊन राहिला आहे."
विदूषकाचा चेहरा कळाहीन झाला व त्याची दृष्टी खाली वळली. "पण चंचले, जर त्यानं दुस-या प्रवेशद्वाराने प्रवेश केला असता, तर तुझी काय योजना होती?" त्याने विचारले.
"काहीही नव्हती. जी घटना अंत्य दिव्याच्या समयी घडली, ती त्याच वेळी घडून गेली असती." चंचला शांतपणे म्हणाली, "मी दोनच हातांची, अल्प सामर्थ्याची स्त्री आहे. मानवाच्या जीवनातील अनंत यमद्वारे रक्षण करण्याचे सामर्थ्य सहस्त्रभुजा रक्ताक्षीमध्ये असेल, माझ्यात नाही. आणखी एक विशेष म्हणजे जीवनाशी द्यूत खेळत असताना अनेकदा नियती देखील अक्षयदान टाकत असतेच, याची पूर्ण जाणीव असल्याशिवाय जीवन सुसह्य होणारच नाही!"
"पण चंचले, ते अशुभ गिधाड--त्याला मी प्रकट केलेला काहीच अर्थ नव्हता का?"विदूषकाने गोंधळत विचारले.
"पंडित, तुमच्या सूक्तासूक्तात ते लिहिलेलं नसेल, म्हणून तुम्हाला ते माहित नसेल." चंचला किंचित क्षुब्ध होऊन म्हणाली, "पण जगातले सारे पशुपक्षी तुमच्या कल्पनांचा शकूनपट पाहत आपल्या हालचाली करत असतात, अशी का तुमची समजूत आहे? ते गिधाड उडत असता श्रांत झाले असेल आणि शिखरस्तंभावर उतरले असेल. त्यावेळी त्यास्थानी मंदिर, विवाहमंडप किंवा स्मशानातील वृक्ष असता, तरी ते उतरलं असतंच! आणि पंडितराज, गिधाड हे अशुभ आहे हे प्रथम ठरवलं तरी कोणी? आणि प्रथम त्यास अशुभ ठरवून नंतर त्याचं आगमन वा अस्तित्व अरिष्टसूचक ठरवणं, हे कोणतं तर्कशास्त्र आहे? शिवाय, ईशान्येकडील राज्यात भव्य गृधराज-मंदिर आहेत याची तुम्हाला कल्पना आहे? आणि तेथील गृधराजाच्या मूर्ती आपण इथं ज्या मूर्तींचे पूजन करतो, त्यापेक्षा अनेक पटीने भव्य आहेत याची आपल्याला पुसटही जाणीव नसेल! आपल्या सारख्या विद्वानांनी
असले मूढ विचार जवळ करावेत हि अत्यंत विषादाची गोष्ट आहे. तरी बरं, माझं नाव चंचला म्हणून मी अस्थिर मनाची आणि तिचं नाव धृवशीला, म्हणून ती ध्रुवासारखी अढळ शिलाची, अशी कल्पना तुम्ही करून घेतली नाहीत--"
चंचलेच्या तीक्ष्ण शब्दांनी विदूषकाच्या मुद्रेवर लालसर छटा दिसली व त्याला मान वर करण्याचे धैर्य होईना; परंतु त्याची अस्मिता व्यथित झाली होती व ती वेदना त्याला मूक राहू देईना. तो म्हणाला, "परंतू रथदिव्याच्या समयी तर माझी बुद्धिमत्ता स्पष्ट झाली ना? त्या सेवकांच्या बाह्य स्वरूपाच्या मायाजालात माझ्या बुद्धीमत्तेमुळेच विजयराज विद्ध झाला नाही!"
"आपल्या जीवनात नियतीची गुप्त क्रीडा असते, असं मी म्हटलं, ते नेमकं याच कारणासाठी." चंचला म्हणाली, "उजव्या बाजूचा रथच पूर्ण सुरक्षित होता; पण अभिवादनासाठी तुम्ही धर्मगुरूंच्या सानिध्यात वळलात, त्यावेळी दुस-या रथाच्या सेवकाने आपल्या रथाचे स्थान अकारण बदलून तो या बाजूला घेतला. माझ्यामागून आलेल्या धृवशिलेला हा बदल पाहता आला व म्हणून तिचाही संकेत उजव्या रथाचाच झाला."
विदूषक मूढासारखा पाहत राहिला. पण त्याने अट्टहसाने म्हटले, "परंतु तरी मी त्या सेवकाच्या बाह्यस्वरूपाच्या जाळ्यात सापडलो नाही, याचा तरी तुला आदर वाटत नाही? माझ्या बुद्धीचं मार्गदर्शन नसतं, तर विजयराज त्या शांत निर्भय सेवकाच्याच रथात चढले असते."
चंचलेच्या ओठांवर नाजूक स्मिताची रेषा दिसली न दिसली; ती म्हणाली, "रथान जागा बदलली त्याच वेळी सेवकांनी देखील आपलं परस्परस्थान बदललं. विशेष म्हणजे या दोन्ही सेवकांना त्या अश्वसमूहांविषयी काहीच माहिती नव्हती. एक भयभीत, अस्वस्थ होता कारण कांही काळापूर्वीच एका घोड्याने त्यास जखमी केलं होतं. दुस-यानं सारी रात्र द्यूत आणि मद्यपान यांत घालवली होती व त्याच्या डोळ्यांवर अद्याप निद्रेचा स्पर्श होता, इतकंच."
"म्हणजे एकंदरीन चंचले, मी ज्या बुद्धिमत्तेचा गर्व वाहिला, ती सारी दैवाची क्षणिक क्रीडाच होती तर!" विदूषक उद्वेगानं म्हणाला, "पण निदान अंतिम दिव्यात मी विजयराजना नि:संशय रक्षण देऊ शकलो असतो. सिंहमुख, व्याघ्रदंत, सहस्त्ररश्मी सूर्य हि स्पष्ट राजचिन्ह आहेत. हा सत्याचा आभास नसून सरळ स्वरूपाचं सत्य आहे हे जाणून मी त्यांना दुस-या मंदिरातच पाठवलं असतं. चंचले, धर्मगुरूंनी दोन्ही मंदिरात एकेक राजमुकुट ठेवला होता, आणि या मंदिरात विजयराजना प्रियव्यक्ती आणि मुकुट यांची प्राप्ती झाली असती."
"विष्णुशर्मा, मी तुमचा अखेरचा भ्रमनिरास करत आहे म्हणून तुम्ही माझा द्वेष कराल. तुम्ही ज्यांना राजचिन्ह समजता, ती राजचिन्ह शुभलक्षणं नाहीतच. ती मुखाकृती सिंहाची नाही, तर सिंहासुराची आहे. कालिंदी-तीरावर रक्ताक्षीनं सहस्त्रबाहूंनी सिंहासुराचा वध केला, हे तुम्हाला स्मरत नाही? मंदिरात त्याचे कबंध तिच्या आसनाखाली आहे हे तुम्ही कधी पाहिलं नाही? प्रतीहारीच्या गळ्यातील व्याघ्रदंत म्हणजे तर दिवाभिताची धातुबद्ध चंचू आहे. तो सेवक वन्यजनांतील आहे आणि त्यांना निशाचर पशुपक्षी पूजनीय आहेत. त्याप्रमाणं ती प्रतिमा सहस्त्ररश्मी सावित्याची नाही; तर ते अघोरपंथीयांचे यमचक्र आहे, आणि त्यातून निघालेले किरण सर्पमुखी रेषा आहेत. --आणि अशा चिन्हांच्या मांङल्याधारे तुम्ही विजयराजना त्या मंदिरात पाठवणार होता! उलट, दुसरी मालिका पहा. वाद्याच्या अग्रभागी असलेला नागफणा अभयसूचक हस्तमुद्रा आहे. सेवकाच्या गळ्यातील कपालाकृती वास्तविक सुवर्णकदंब वृक्षाचं बीज आहे, आणि त्या वृक्षाची पानं रक्ताक्षीला अतिप्रिय आहेत. किर्तीमुखातील वालुकायंत्र म्हणजे डमरू आहे. रक्ताक्षीच्या प्रमुख हस्तद्वयात खड्ग व डमरू हि चिन्हे तुम्ही कधी पहिली नाहीत?----पण विचारप्रमादानं का होईना , तुम्ही विजयराजना दुस-या मंदिराकडे पाठवलं असतं, तर त्या क्षणी त्यांचे प्राण तरी सुरक्षित राहिले असते."
विदूषक पराभूत झाल्याप्रमाणे विगलित झाला. त्याने विषण्ण मुद्रेने चंचलेकडे पहिले व म्हटले, "अमात्यकन्ये, या अल्प कालावधीत तू माझा सारा अहंभाव हरण केसास, माझ्या बुद्धीचं मलीन जीर्ण वस्त्र करून टाकलस. मी माझ्या प्रखर बुद्धिमत्तेचा जो विजय समाजात होतो, ती सारी नियतीची अगम्य भ्रमलीला होती. माझे पांडित्य तू क्षुद्र करून टाकलास!"
"आपल्या पांडित्याचा असा अधिक्षेप करू नका. माझ्यासारखी अज्ञ युवती आपल्या पासंगाला देखील पुरणार नाही. पांडित्य अपुरं ठरतं म्हणून ते निष्फळ ठरत नाही. माझं ज्ञान तर केवळ उपेक्षणीयच आहे. मात्र सत्याची स्वरूपं आपण आधीच स्वीकारलेल्या निर्णयाच्या लयीत गमनागमन करतात, असं मात्र मी कधी मानलं नाही, एवढंच माझ्या ज्ञानाचं अकरणात्मक स्वरूप आहे. आता माझी एकच प्रार्थना आहे,--तुम्ही विजयराजना कृतघ्न म्हटलात, ते अति अन्यायाचं नाही का?" 

"नाही, पूर्णपणे नाही!" विदूषक निश्चयी स्वरात म्हणाला, "चंचले, मी मंदिरात बद्ध असता मला शब्द वा स्वर निर्माण करता येणं अशक्य होतं; परंतु माझ्या रक्तानं लांछित झालेला मुकुट विजयराज स्वीकारणार नाहीत अशी अद्यापही मला आशा होती. म्हणून मी कोणत्या मंदिरात आहे हे दर्शवण्यासाठी मी प्रबल उच्छ्वास करण्यास प्रारंभ केला. विजयराज प्रदक्षिणा करत असता त्यांनी तो ध्वनी नि:संशय ऐकला; कारण त्याक्षणी त्यांची गती खंडित झाली. पण हा माझा अक्षम्य प्रमाद घडला. का की
त्यांनी हेतुपूर्वक त्याच मंदिरात प्रवेश केला. "प्रिय व्यक्तीच्या रक्ताने लांछित" हे शब्द त्यांना आठवले, मी ज्या मंदिरात आहे, त्याच मंदिरात मुकुट आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला व माझ्या बलिदानाची तमा न बाळगता, नव्हे, त्याचसाठी त्या मंदिरात त्यांनी प्रवेश केला."
"पण पंडितराज, हा विचार मला तर अति विसंगत वाटतो." चंचला म्हणाली, "आपण असलेल्या मंदिरात त्यांनी प्रवेश केलाच नाही. प्रतिपक्षी, तुम्ही त्या मंदिरात आहात हे ज्ञात झाल्यावर राजमुकुटाचाही लोभ सोडून, तुमचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी दुस-या मंदिरात प्रवेश केला. मृत्यूपुर्वीचे त्यांचं हे अत्यंत उदात्त आणि नि:स्वार्थी कृत्य, परंतु त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर कृतघ्नतेचा दोष लादत आहात, हे एक दुष्ट आश्चर्यच आहे!"

विदूषक क्षणभर स्तब्ध झाला व त्याने चंचलेकडे निरखून पहिले. मन प्रक्षुब्ध झाले. परंतु नंतर त्याची मुद्रा निश्चयी झाली आणि तो म्हणाला, "चंचले, माझ्या भूतकाळाचं विषमय सत्य अंत:करणात लपवत, अत्यंत कष्टानं मी आतापर्यंत जीवन भोगत आलो. आता पुन्हा आणखी एका कटू सत्याचा भार वाहण्याचं सामर्थ्य माझ्यात उरलं नाही. म्हणूनच तुला हे मी सांगत आहे. विजयराज त्या उदात्त हेतूने त्या मंदिरात गेले नाहीत; माझ्या रक्तसिंचनाने का होईना, मुकुटप्राप्ती व्हावी, असाच त्याचा एकमेव कृतघ्न हेतू होता, असा माझा पूर्ण विश्वास आहे. अमात्यकन्ये, त्या दोन मंदिरांची रचना ध्यानात घे. जलाशयातील प्रवाह मंदिरात यावा म्हणून एक विशाल नलिका समान भिंतीजवळ आली आहे, हे तू देखील पहिले असेल; परंतु अंतर्भागातील रचनेची तुला कल्पना नसेल. या नलिकेला आडवी अशी आणखी एक धातुनालिका आहे. तिच्यातून सतत प्रवाह जावून दोन्ही मंदिरातील अभिषेकपात्रात सतत जलसंचय राहावा, अशी ती कुशल योजना आहे. आता ती मंदिरं निषिद्ध असल्यानं ती नलिका पूर्ण निर्जल आहे. मला आत ज्याठिकाणी बद्ध करण्यात आलं होतं, तिथं माझं मुख त्या नलीकेच्या एका द्वारापाशी येत होतं, मी उछ्वासांचा ध्वनी केला; पण चंचले, ध्यानात घे, तो प्रकट झाला तो माझ्या मंदिरात नव्हे-- तर दुस-या मंदिरात! हि विलक्षण स्थिती पाहताच मी स्तब्ध झालो, पण विजयराजनी तो ध्वनी आधीच ऐकला होतं, आणि प्रिय व्यक्तीच्या रक्ताने लांछित का होईना, राजमुकुट त्याच मंदिरात आहे, या कृतघ्न विश्वासाने त्यांनी तिथे प्रवेश केला. अमात्यकन्ये, माझ्या ललाटी बुद्धिमत्ता असेल, पण निष्ठा हा एक शब्द मात्र लिहायचे कष्ट विधात्यानं घेतले नाहीत!  अन्य स्त्रीकारिता विजयराजनी तुझा अव्हेर केला असेल; परंतु त्याची खरी प्रिया एकाच एक होती ----राजसत्ता!"
चंचलेची मुद्रा अति व्यथित झाली व तिचा आवाज निष्प्राण शुष्क झाला. ती म्हणाली, "मी माझ्या शब्दांनी तुमचा बुद्धीगर्व नष्ट केला, तुम्ही आपल्या शब्दांनी माझ्या मनातील प्रतिमेचा भंग केलात! म्हणजे एकंदरीत तुम्ही काय, मी काय, जीवनात रिक्त अंजलीनेच राहिलो." परंतु तिचा आवाज एकदम खंडित झाला व तिने बोटांनी आपला चेहरा झाकून घेतला.
संपूर्णपणे अपहॄत झाल्याप्रमाणे विदूषक स्तब्ध होता. त्याच्या मनातील विषण्ण अस्वस्थता मुद्रेवर जड होऊन राहिली होती. पण नंतर त्याच्या दृष्टीत मंद चमक दिसली व त्याची मुद्रा किंचित उजळली. "चंचले, मी त्या मंदिरात बद्ध झालो तरी, मला मृत्यूची क्षणिकही भीती वाटली नव्हती." तो म्हणाला.
परंतु मंदिरातून मुक्त झाल्यावर त्याची शिलाखंडाखाली कष्टानं क्षीण वाढलेल्या तृणपर्णासारखी दुर्बल भयग्रस्त आकृती चंचलेला आठवली आणि आपल्या विषण्णतेतही कटू स्मित लपवण्यास तिला फार प्रयास पडले. तिने विचारले, "होय? पण ते कसं घडलं?"
"माझ्यावर मृत्यूची छाया नाही, हे मी बुद्धीसामर्थ्यानेच जाणलं. तुज्या दाहक शब्दांच्या स्पर्शातही अदग्ध राहिलेला तो माझ्या बुद्धीचा अंतिम अवशेष आहे. परंतु तो मात्र तुझ्याकडून नष्ट होणार नाही. सतीचे ऐहिक वैभव नष्ट झाल्यावरदेखील वज्राप्रमाणे अभंग राहणाऱ्या तिच्या पातिव्रत्याप्रमाणे माझ्या बुद्धीचा तो तेज:कण अमर आहे. चंचले, धर्मगुरूंच्या शब्दरचनेत अंतिम दिव्याचं स्वरूप खरं स्पष्ट होतं, म्हणून तू ते पुन्हा आठव : 'एका मंदिरात आपल्याला अत्यंत प्रिय व्यक्तीला बद्ध करण्यात येईल...एका मंदिरात प्रवेश केल्यास आपल्याला सर्वात अधिक प्रिय व्यक्तीच्या रक्ताने लांछित असा राजमुकुट प्राप्त होईल....दुस-या मंदिरात राज्यपदापेक्षाही श्रेष्ठ असं प्राप्त होईल...' अमात्यकन्ये, धर्मगुरूंच्या शब्दांत सूक्ष्म अर्थछटा ध्यानात येताच मी विस्मयाने कंपित झालो. विजयराजनी जर ख-या प्रिय व्यक्तीला मंदिरात बद्ध होण्यासाठी पाठवलं  असतं, तर या शब्दांचा सत्यार्थ मी त्यांना सांगितला असता.मी मंदिराच्या स्थापत्याचा विशेष अभ्यास केला असता, कोणत्या मंदिरात ती प्रियव्यक्ती बद्ध आहे याचा शोध घेतला असता, आणि त्याच मंदिरात नि:शंक प्रवेश करण्यास मी विजयराजना सांगितलं असतं. तिथं त्यांना राजमुकुट, अत्यंत प्रियव्यक्ती, या क्षणी एक बुद्धिवान मित्र आणि त्यांच्या सम्राटपदानंतर एक तेजस्वी अमात्य, या सा-यांची त्यांना प्राप्ती झाली असती. आणि धर्मगुरूंच्याच शब्दांतील सत्याप्रमाणे केवळ राजमुकुटापेक्षाही--राजमुकुट, प्रिया आणि मित्र अमात्य, हे नि:संशय अधिकच आहेत. धर्मगुरूंनी दोन्ही मंदिरात राजमुकुट ठेवले होते हे आता तुला ज्ञात असेलच; परंतु त्यांनी 'अत्यंत प्रियव्यक्ती' हा शब्दसमूह दोन निरनिराळ्या अर्थांनी वापरला हे मात्र तुला उमगलं नसेल. बद्ध झालेली प्रियव्यक्ती निराळी, राजमुकुटावर रक्तसिंचन करणारी प्रियव्यक्ती निराळी. पहिल्या वाक्यात लौकिक सुलभ अर्थ आहे, तर दुस-या वाक्यातील अर्थाची छटा जास्त सूक्ष्म आहे. परंतु विजयराजना हाच सूक्ष्म अर्थ समजला नाही. कृतज्ञता जाणवली नाही. माझ्या रक्तानं लांछित होणा-या राजमुकुटाकडे ते अमर्याद तृष्णेने गेले, आणि स्वतःच्याच रक्तानं माखलेला मुकुट घेतलेलं त्यांचं शिरविहीन शरीर मंदिराच्या द्वारपिंडीवर कोसळलं. अशा रीतीनं धर्मगुरुंचे शब्द मात्र संपूर्णतया सत्य ठरले. अमात्यकन्ये जीवनावरची सर्व मोहक वस्त्राभरणं बाजूला सारली की अखेर एकाच कठोर--नग्न सत्य राहतं! प्रत्येक मानवाला सर्वात प्रिय वाटणारी व्यक्ती म्हणजे तो स्वतःच! स्वतःपेक्षाही अधिक प्रिय अशी कोणी अन्य व्यक्ती कधी असू शकेल का?"
चंचला उभी राहिली व अपार अनुकंपेने मृदू झालेल्या दृष्टीने तिने विदूषकाकडे पहिले. उद्रेक झाल्याप्रमाणे ती पुन्हा एकदम हसू लागली. परंतु तिचे हास्य विरल्यावर इतका वेळ घडत असलेली शिलावस्था पूर्ण झाल्याप्रमाणे ताठ झाली आणि तिचे डोळे कठोर, निर्विकार झाले. ती म्हणाली, "डिंपत विष्णुशर्मा,तुमच्या या प्रश्नाला मात्र माझ्याजवळ उत्तर नाही. सारं जीवन पणाला लाऊन सा-या पृथ्वीवर मला एकच एक प्रिय हवं होतं; ते म्हणजे विजयराज--, आणि नेमकं तेच अप्राप्य होवून नष्ट झालं; इतकंच नाही, तर मनातील सुकुमार प्रतीमादेखील भंगून गेली. ही नियतीची आणखी एक ललितक्रीडा होऊन गेली. धनुष्याहून शर सोडणे एवढेच आपल्या हातात असते; परंतु एकदा त्याचा प्रवास सुरु झाला की, त्याच्या लक्ष्यापर्यंत त्याला पोचवण्याचं सामर्थ्य मात्र आपल्याला लाभलं नाही. त्यातही नियतीच्या अदृश्य उछ्वासांनी त्याचा गतीमार्गही अनेकदा दुष्ट होऊन जातो. ही तर जीवनाची एक प्रतिज्ञाच आहे; आणि एकदा जीवनात पदार्पण केल्यावर त्याबाबत विलाप करण्यात अर्थ नाही. मला इतर कसली लालसा नव्हती. काहीही अधिक प्रिय नव्हतं. विदूषक, एवढंच नाही तर मी ही, माझी देखील मला तेवढी प्रिय वाटत नाही--"
द्विधा मनाने विदूषक सारे ऐकत होता व प्रत्यक्ष काय घडत आहे हे त्याला एकाग्रतेने जाणवले नाही. चंचलेने मेखलेखालच्या वस्त्रामधून झटकन कृपानिका काढली. तिचे तेजस्वी पाते यमजिव्हेप्रमाणे झळकले आणि चंचलेने तत्काळ ते आपल्या कंठमुलात रुतवले! संगमरवरी सुंदर मूर्तीत रक्तरेषा उमटावी त्याप्रमाणे रक्ताचा कोमल प्रवाह वेगाने खाली उतरला व पर्णाच्छादित वनभूमीवर ती अचेतन होवून राहिली.
प्राणभयाने विदूषक तेथून अस्ताव्यस्त धावला. वनकुंजातील वृक्षांचे समूह जास्त गर्द होऊ लागले. आणि धावता धावता त्याच्या अंगातील त्राण ओसरू लागले. तो अंधपणे एके ठिकाणी थांबला व त्याने एका वृक्षाच्या आधारे स्वतःस सावरले. आता सभोवार त्या वनकुंजाचा रंगगंधपूर्ण असं रक्षित विभाग होता; परंतु काही अंतरावर दोन आकृती पाहून त्याचे शरीर बधीरल्यासारखे निर्जीव झाले आणि जीर्ण तृणपर्णाप्रमाणे तो अंग चोरून उभा राहिला.
समोर एका वाटिकेत मूल्यवान केशरी वस्त्रांत धर्मगुरू होते व त्यांच्या हस्तस्पर्श अंतरावर धृवशीला सविलास अंगस्थितीत उभी होती. तिने एक पुष्पमाला धर्मगुरूंना दिली व म्हटले, "तीन वर्षांच्या कालापर्यंत साम्राज्यवैभव आपल्याला प्राप्त झाल्यामुळे दासी आपलं अभिनंदन करते."
धर्मगुरूंनी स्मित करून पुष्प्मालेचा गंध अनुभवला व लालीत्याने त्यांनी ती धृवशिलेच्या गळ्यात टाकली. ते म्हणाले, "तीन वर्षांचा कालावधी पुनरावृत्त करणे अशक्य नाही आणि त्या अवधीत रूपरत्ने, तुझ्या वैभवाला मर्यादा नाही. महत्वाकांक्षा ही अशी एक मोहलता आहे की, जी कसलीही आर्दता नसतानाच मुक्तपणे वृद्धींगत होते. या सत्तेसाठी मी पितृनिष्ठ मानली नाही, ती एका य:क्वश्चीत्त, अकिंचन, राज्यहीन, बलहीन, दाळीन राजकुमाराच्या बाबतीत मानीन हे केवळ अशक्य आहे.

त्यानं कोणत्याही मंदिरात प्रवेश केला असता तरी त्याचा शिरच्छेद झाला असता, अशीच मी योजना केली होती. मात्र दुस-या मंदिरात प्रवेश केला असता तर त्याच्याबरोबर त्या मूर्ख, वाचाल विदूषक अमात्याचाही शिरच्छेद झाला असता, इतकेच. मंदिराच्या भूमीवरील कुर्माकृती, कमलाकृती इत्यादी सारं शब्दजाल होतं. धृवशिले, ती मंदिर अति प्राचीन आहेत. भविष्यकाली अनेक शतकानंतर त्या ठिकाणी असं एखादं दिव्य घडणार, म्हणून का दूरदृष्टीने त्यांनी आधीच मंदिराची रचना करून ठेवली होती?"
"पण धर्मभूषण, हा अन्यायच नव्हे का?" मधुर स्वरात धृवाशिलेने विचारले.
"तुम्हा मृगनयनांना हे समजायचं नाही. सारे नीतीनियम सांभाळून युद्ध करण्याची इच्छा असणा-यांनी युद्धभूमीवर पदार्पण करू नये!"
"धर्मरत्न, आता एकच प्रश्न. राजमुकुटापेक्षाही अधिक काही तरी प्राप्त होईल असं आपण म्हणालात. राजसत्तेपेक्षा अधिक काय असू शकतं?"
क्षणभर विचार करत असल्याचे नाट्य करून धर्मगुरू हसले व म्हणाले, "बिंबाधरे, तू एक महान अतिप्रश्न विचारलास; परंतु मला तरी अद्याप त्याचं ज्ञान नाही. पण राजमुकुटापेक्षाही काही तरी अधिक असू शकतं ही भावनाच कदाचित राजमुकुटापेक्षा जास्त मूल्यवान असू शकेल. यौवनकलिके, मला आता जाण प्राप्त आहे; परंतु चंद्रिकेला राजपुष्पांचा गंध येऊ लागला की मी दूताकडून आज्ञा कळवीन."
"दासी आपल्या सेवेस सदैव सज्ज आहे." अत्यंत नम्रपणे धृवशीला म्हणाली.
धर्मगुरू प्रमत्तपणे निघून जात असता ती त्यांच्याकडे पाहत राहिली व ते दृष्टीआड होताच ती स्वतःशीच हसली व निघून गेली.
भयानक प्रतिध्वनी ऐकल्याप्रमाणे विदूषक स्तंभित झाला होता. त्याने पिशाच्चबाधा झाल्याप्रमाणे केश विस्कटून टाकले, गळयाभोवतालची स्वरहीन घंटा व प्रकाशहीन दीप बाजूला फेकून दिली व द्विरंगी वस्त्र ताणून विदीर्ण केले. त्याने ओंजळभर माती उचलली व सा-या चेह-यावर माखून घेतली.
बाजूला कोणीतरी कर्कश हसल्याचा आवाजामुळे तो दचकला व त्याने त्या दिशेने पाहिले. एखाद्या वन्य घनदाट छायेप्रमाणे समोर डोंब उभा होता आणि आपले वराहदंत दाखवत होता.
"आपण हे काय चालवलं आहे?" त्याने विचारले.
"डोंबा, ही माझी वस्त्रं घेऊन जा. विदूषक भग्न स्वरात म्हणाला, "का की, मला त्यांचा कांही उपयोग नाही. ती वस्त्रे अधिकारानं धारण करण्यास जी ज्ञानसिद्धी हस्तगत व्हावी लागते, ती मला कदापि साध्य झाली नाही. इतकं अध्ययन केलं--, इतकं गहिल--, इतकं उपभोगलं--, आणि इतकं भोगलही; पण त्या सा-या कोलाहलात मी एक सामान्य क्षुद्र जंतूच राहिलो.
त्यातून एखादं सुसंगत आकारपुर्ण वस्त्र निर्माण करण्याचं ज्ञान मला सदैव अज्ञातच राहिलं व मी लक्तरांचे भार वाहत निर्बुद्धपणे जगणारा भारवाहकच उरलो. ही वस्त्रे तू घेऊन जा--"
त्याने विदूषकाची वस्त्रे उतरवली व डोंबाकडे फेकली, आणि तो पराभूत, अवमानित, मूढगतीने निघून गेला.
तो वळून जाईपर्यंत डोंब त्याच्याकडे पाहत राहिला. नंतर त्याने ती विदीर्ण वस्त्रे उचलून बाजूला फेकून दिली व एका वृक्षाआड राहून त्याने हलक्या स्वरात, पण लोहतंतूप्रमाणे रेखीव शीळ घातली.
ती ऐकताच वाटिकेजवळील अरुंद पथमार्गावरून अंगावर कृष्णवर्णीय उत्तरीय वस्त्र घेतलेली युवती धावत आली. डोंबाजवळ येताच तिने अर्ध  अंगावरील आवरण बाजूला केले. व ती त्याला भिडली. त्वरित गतीने आल्यामुळे तिच्या तारुण्यरेषा कंपित झाल्या होत्या, तिच्या वक्ष:स्थलावर जणू वासना तप्त झाल्याप्रमाणे भासणारा रक्तमणी होता आणि जणू त्याची दाहकता क्षणभरच सुसह्य असल्याप्रमाणे प्रकाशकण त्यास स्पर्श करताच परावर्तीत होत होते. धृवशीला समीप येताच डोंबाने तिला आपल्या बलवान, सावळ्या हातांनी वेटाळले.
आणि मग ती दोघे वृक्षांच्या निबिड हिरव्या अंधारात विरून गेली!काजळमाया  

संकलक:प्रवीण कुलकर्णी 
 

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....