Wednesday, 27 October 2010

09/06/2010

सध्या उत्तरांची अपेक्षाही नाही तेंव्हा हे सहज सुचलं या सदरात लिहित आहे कारण यावेळी नुसतं बसून काय करणार? असो. आज सारंग सरांचे टर्निंग पॉइन्ट मध्ये शेअरिंग ऐकलं, छान वाटलं. नंतर सहज एका कागदावरचा लेख चिवडा खाताना वाचला..तो काहीतरी 'सकाळ' ला 'करियर' नावाची कसलीशी पुरवणी येते त्या संदर्भात होता. त्यात आजच्या स्पर्धात्मक युगात काम करायचे, तर कसे करावे याविषयी लिहिले होते, त्यात एक उदाहरण देखील दिले होते..ते असे की, दोन मित्र (एकाच व्यवसायातील) एकदा जंगलात जातात. जंगलात त्यांचा रस्ता चुकतो. ते आणखीनच घनदाट जंगलात शिरतात. तेंव्हा त्यांना सिंहाची डरकाळी ऐकू येते. लांबून ती ऐकून एक मित्र आपल्या बगेतून धावण्याचे बूट काढू लागतो. ते पाहून दुसरा विचारतो, हे बूट घालून तुला काय वाटतं? की तू सिंहापेक्षा वेगाने पळू शकशील ? यावर दुसरा सांगतो की, मला सिंहाला मागे टाकायचे नाहीच. मला फक्त तुला मागे टाकायचेय!
वाचून कागद रद्दीत टाकून दिला. (माझ्या मते तीच योग्य जागा आहे.) मी असले वाचून खरेच अस्वस्थ होतो कारण मी कितीही स्वार्थी, आत्मकेंद्रित असलो तरी असा विचार दारू पिताना देखील माझ्या मनाला शिवला नव्हता! माझा स्वार्थ निव्वळ बाटली भोवती फिरत असे.
शिवाय याच संदर्भात मला आणखी प्रश पडतात की, दुस-याला झाडावर चढण्याची कला अवगत नसेल कशावरून? असो. हे आपल्या(माझ्या) तरी डोक्यापलीकडे आहे! मी आजच्या इनपुट च्या अनुषंगाने माझ्या दिवास्वप्नांबाबत विचार करू लागतो तेंव्हा व्यसनकाळात (हा शब्द इथे प्रत्येकजण वापरतो :जसे व्यसन सोडून दहा बारा वर्षे झालीत!) काय काय दिवास्वप्न पाहायचो? तर मी जेंव्हा जेंव्हा दवाखान्यात दाखल होऊन घरी यायचो तेंव्हा क्षणिक पश्चातापाने दारू दोन/तीन दिवस बंद करायचो तेंव्हा घरचे आणि ओळखीचे चार लोक म्हणायचे, बाळ्या, एक तर तू चोवीस तास दारू पितोस, आणि नाही पीत तेंव्हा सतत दारूबद्दल बोलतोस!  
तर 'शराबी' सिनेमात बच्चन जेंव्हा 'बोलबच्चन' करून घर सोडून जायला निघतो तेंव्हा प्राण (त्याचा बाप ) त्याला सुनावतो की, 'लगता है तुमने घटिया शराब पीनी शुरू कर दि है."
त्याचप्रमाणे शराब घटिया असो वा चांगली पण 'सोच' नक्कीच 'घटिया' होते. हे नक्की.
सतत दारू या संदर्भात त्यावेळी हर्षद मेहताचा शेअर घोटाळा प्रसिद्ध होता तेंव्हा, या पैशांचे तीस हजार कोटी (अजूनही तीसवर किती शून्य बारा की अकरा? असा प्रश्न पडतो म्हणून अक्षरी लिहिले!) तुला मिळाले तर तू काय करशील? मी सांगायचो, घरावर एक मोठी टाकी बसवेन आणि ती हातभट्टीने भरून टाकीन! वास्तविक इतक्या पैशात दारूच भरायची तर किमान शिवास रिगल वगैरे तर भरायची! पण नाही! हातभट्टीच भरायची तर त्याला तीस हजार कोटी कशाला? आता तरी किमान हि घटिया सोच दिवास्वप्नात तरी बदलावी म्हणतो! 

नमस्कार,
तुमचा स्वतःबद्दलचा awareness
खूप amazing आहे. मी तुम्हाला काय सांगावे?...
गोष्ट खूप भारी आहे लक्षात राहील. 
regarding future  तुमचा जो self talk आहे तो बदलावा असं मला वाटतं. एका गोष्टीत तुमची clarity खूप आहे की, काय नसावं किंवा काय करू नये. यापुढे नक्की ठरवा की मला काय करणं शक्य आहे व त्यातलं मला काय भावेल? मग आपण त्यावर बोलू.
विसंगती हा विनोदाचा भाग आहे हे तुम्ही म्हणता पण आयुष्यात आपलं बोलणं व वागणं यामध्ये विसंगती येऊ लागली तर फार अवघड जातं. (specially interpersonal relationship
मध्ये) तुम्ही जे म्हणता की दारू एक तर आयुष्यात नाहीतर विचारांत असायची आता काय परिस्थिती आहे? त्याला स्थान दुय्यम आहे का , अजून खालचं? हे प्रश्न स्वतःला विचारा...
तुम्हाला खूप जवळचे काय आहे?
तुम्हाला खूप जवळचे कोण आहे?
आयुष्यात सर्वच गोष्टींबद्दल indifference 
जाणवतो. त्याबद्दल काय stand  आहे? आपण बोलू.

वैशाली मॅडम

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....