Thursday, 16 December 2010

बेस्ट एवर रजनीकांत जोक ....

बेस्ट एवर रजनीकांत जोक ...........................
रजनीचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खरं तर आपण जमिनीवरच झोपतो, अजूनही जुनाच ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल वापरतो, साधी कार वापरतो एवढंच नाही तर इतर कलाकारांसारखे विग लावून हिंडत नाही. तरी सुद्धा आपण एवढे अस्वस्थ का हे काही त्याला कळलं नाही. तरी बरं त्यानं झोपण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा इन्फिनिटीला झिरोनं डिव्हाईड करून बघितलं होतं आणि दोन्हीवेळा उत्तर सारखंच आलं होतं!
काय बरं झालं असेल? की काही शतकांपूर्वी आपण एका घोड्यावर रागवून त्याच्या तोंडावर खालून एक बॉक्सिंग पंच मारला होता आणि नंतर त्याच्या पुढच्या पिढ्या स्वत:ला जिराफ म्हणवून घेऊ लागल्या होत्या. त्यांचे तळतळाट तर नसतील? पण आपल्याला कुणाचे तळतळाट लागणार आहेत? आपल्या दिशेनं आलेल्या निगेटिव वेव्जना तर आपण नुस्त्या नजरेनं पॉझिटिव करून टाकतो आणि पुढच्या येणा-या निगेटिव वेव्जच्या दिशेनं पाठवतो. नंतर त्या दोन्ही वेव्जची टक्कर होऊन प्रकाश आणि आवाज तयार होतो, काही मूर्ख लोक त्यालाच ‘विजांचा कडकडाट’ असंही म्हणतात, त्याला आता आपण काय करणार? त्यामुळे या शक्यतेलाही काही अर्थ नव्हता. पण झोप येत का नाहीये याचं उत्तर त्याला काही केल्या उत्तर सापडेना.
तेवढ्यात त्याचा फोन वाजला. (आपण तर मिस्ड कॉल्सनाही उत्तर देऊ शकतो, त्यानं मनात विचार केला!) त्यानं डाव्या हातानं फोन उचलला आणि आणि उजव्या हातात फेकला. फेकतानाचा त्याचा अँगल एवढा नेमका होता की हवेच्या प्रेशरमुळे त्याची ‘आन्सर की’ बरोब्बर प्रेस झाली आणि पलिकडला ‘हलो’ ऐकायला आला. एवढ्या रात्रीच्या त्या ‘हलो-हलो’ला हलकट उत्तर द्यावं, असं त्याला वाटलं पण त्याने नुस्ताच हुंकार दिला.
“सायेब, एक मराठी पिच्चर प्रोडूस करतुय त्याबाबद तुमच्याशी बोलता यील ना आत्ता?”

“मला कोणत्याही वेळी बोलता येतं. मी व्हॅक्यूम मध्ये सुद्धा बोलू शकतो.”

“नायी, वाल्युम मोठाच आहे इकडं. पन रागावू नका जरा रातच्याला फोन केला. नाईट कालिंग हाफ रेट मध्ये पडतं ना. आमी प्रायोगिक निर्माते आहोत सायेब, पिच्चर करायचा म्हन्जे पैसे
वाचवावे लागतात सर्वीकडे. तुमी मराठी पिच्चरमदी काम करायचं म्हनला म्हनून फोन केला.”
"ते माहित्येय मला. काय स्टोरी आहे तुमची?”
“ष्टोरी तुमी म्हनाल ती.”
“पण तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना?”
“गरीबाला कसली आलीय ष्टोरी न् बिरी सायेब. गावाकडची मान्सं, एक चांगला शेतकरी आन् त्याच्या चांगल्या बायकोचा हात धरनारा बाराचा सरपंच. घरात म्हातारी सासू आन् तमाशाला
जानारा दीर आसलं कायतरी जुगाड असतं सायेब आमचं. तुमी आमच्या पिच्चरमदी काम करा तुमाला पायजे तो रोल करा, हवं तर समदे रोल तुमीच करा पन तुमची ती ष्टाईल आमच्या गावाकडं लई आवडते पब्लिकला तेवडं जमवा सायेब.”
“डिरेक्टर कोण आहे?”
“शंकर.”
“शंकर? त्याच्यासोबत मी लेटेस्ट रोबो केला तो पण मराठी सिनेमा करतोय?”
“न्हाई तो तुमचा शंकर न्हायी सायेब, आमचा शंकर, शंकर विसपुते. ‘सडा निळ्या कुंकवाचा’ला
असिश्टन होता तो सायेब, सातवा. पन तेवडं गागलवाल्या ष्टाईलचं जमवा.”
“बरं.”
“आन् त्या गागलवाल्या ष्टाईलमदे सायेब तुमी गागल वर फेकून डोळ्यावर बशिवता तेवा वरून खाली पडताना तो मोडत आसंल ना कदीमदी?”
“हो मोडतो बरेचदा. त्याचा रिटेक घेतो मग आम्ही.”
“आन् मग गागल तुमी आन्ता का आमाला द्यावा लागंल? न्हायी, रागवू नका सायेब पन आसले रेबानचे चार गागल तुमी मोडले तर बसला का चार चोक सोळा हजाराला बांबू आमाला?"
“अरे पण प्रॉपर्टी तर तुम्हालाच द्यावी लागेल ना?”
“आमी फार तर तुमच्या बिडी फेकन्याच्या ष्टाईलसाठी शिवाजी बिडीचं एक बंडल देऊ. हवं तर माचिसचा आख्खा बॉक्स आनू नवा कोरा. पन काय सायेब आमालाबी परवडलं पायजेल ना? आनि काश्चूम तुमचा तुमाला आनावा लागेल.”
“कमाल झाली तुमची.”
“तसं नाय सायेब, पन अशोक शिंदेसाठी शिवलेली कापडं तुमाला नाई बसली तर कम्परटेबल वाटनार नाई तुमालाच. आपली कापडं आपल्याबरोबर आसलेली बरी, कसं म्हंता?”

“जेवायला तरी घालाल की घरून डबा आणावा लागेल?”
“काय सायेब गरीबाची थट्टा करता? जेवायला घालू की आमी. काय पांढरा म्हना, तांबडा म्हना,
पेशल रस्सा करू रोज. झालंच तर मोर, ससे काय पायजेल ते देऊ की. जेवनात मागंपुडं बघत नाई आम्ही सायेब. शेवटी तुमी काय नि आमी काय, जे काय पैसे कमावतो ते दोन वेळच्या जेवनासाठीच ना? मग त्यात कसली कंजूशी करायची सायेब?”
“आणि पेमेंटचं काय?”
“पेमेंट कॅश करतो की रोजच्या रोज आमी.”
“नशीब माझं. पण किती देणार?”
“मोट्या हिरोला जेऊनखाऊन बारा देतो आमी रोजचे, तुमाला साडेबारा देऊ सायेब.”

“रोजचे साडेबारा लाख फक्त?”
“लाख नायी, हजार सायेब. साडेबारा लाखात तर आमचा पिच्चर कंप्लेट होतो सायेब.”
एवढं ऐकल्यावर रजनीनं एवढ्या रागानं मोबाईलवरचं लाल बटन दाबलं की त्या प्रेशरमुळे पलिकडच्या मोबाईलवर बोलणा-या निर्मात्याचे डोळे आले! गावात डोळ्याची साथ नसतानाही फक्त आपल्या एकट्याचेच डोळे कसे आले या शंकेनं पुढे अनेक दिवस तो बेजार होता म्हणतात. (हे वाचतानासुद्धा काही कमजोर वाचकांचे डोळे येऊ शकतात त्याला रजनी किंवा आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.)
फोन झाल्यावर रजनीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. (त्याच्या डोक्यात एकदा प्रकाश पडला की आसपासच्या सतरा जिल्ह्यांचं लोडशेडींग एक महिन्यासाठी बंद होतं!) त्याला एकदम झोप न
लागण्याचं कारण लक्षात आलं. ‘रोबो’च्या प्रमोशनच्या नादात आपण बाळासाहेबांना भेटलो आणि मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं जाहीर केलं तेव्हापासून त्याला असल्या ऑफर्स येत होत्या आणि त्याची झोप उडाली होती, अस्वस्थ वाटत होतं. (परिणामत: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला) त्याला वाटलं मराठी सिनेमांची एवढी लाट आली, ऑस्करला मराठी सिनेमे जाताहेत, राष्ट्रीय पुरस्कार पटकावताहेत तेव्हा असेल त्याला मार्केट. पण
निर्मात्यांच्या बजेटचे आकडे ऐकल्यावर त्याला दरदरून घाम फुटला. (...आणि हवामान खात्याच्या
मेधा खोले म्हणतात परतीचा मान्सून!)
मराठी सिनेमाचं एकूण बजेट जेवढं असतं तेवढा खर्च आपल्या सिनेमात फक्त मेक-अप वर होतो आणि आपल्या सिनेमातल्या मेक-अप वर आपण जेवढा वेळ घालवतो साधारण तेवढ्या वेळात अख्खा मराठी सिनेमा पूर्ण होतो हे सूत्र त्याच्या लगेच लक्षात आलं. (एका निर्मात्यानं त्याच्या ‘शिवाजी द बॉस’ हा सिनेमा मराठीत डब करायचे हक्क मागितले होते. त्यानं तो चित्रपट बघितलाही नव्हता पण तो म्हणाला आमच्याकडे केवळ नावावर हा सिनेमा चालेल!)
मग तो हे आठवायला लागला की बाळासाहेबांच्या भेटीनंतर ‘मराठी सिनेमात काम करायची इच्छा आहे’ हे बोलायची आयडिया आपल्याला दिली कुणी? कदाचित असं झालं असेल की पत्रकार परिषदेत प्रश्न वगैरे विचारायचे असतात, असल्या जुनाट कल्पना डोक्यात घेऊन जर्नालिझम स्कूलमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या एखाद्या अतिउत्साही पत्रकारानं किंवा आपल्या हातात काळं कणीस आहे तेव्हा आपण कुणालाही काहीही विचारू शकतो अशा अतिआत्मविश्वासू पत्रकारिणीनं आपल्याला ‘तुम्ही मराठी चित्रपटात काम करणार का?’ असा प्रश्न विचारला असेल आणि मुंबईत राहून या प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर देता येत नाही एवढं कळण्याचा कॉमन सेन्स आपल्याला असल्यामुळे आपण ‘हो’ असं उत्तर दिलं असेल आणि मग लगेच त्याची ‘रजनी करणार मराठी चित्रपटात काम’ अशी ब्रेकींग न्यूज झाली असेल.
...की हे आपणच आपणहून बोललो? कुणी बरं असं बोलायची आयडिया आपल्याला दिली असेल? रजनी विचार करू लागला. त्याच्या साध्या चालण्याचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जास्त असतो (आईन्स्टाईन आणि त्याचं याच विषयावर वाजलं होतं. रजनीच्या ऑर्ग्युमेंटनं आईन्स्टाईनच्या डोक्यावरचे केसही विस्कटले होते. ते नंतर कधीच सरळ झाले नाहीत. आज आईन्स्टाईन आपल्यात नाहीत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!)
त्यामुळे त्याचा विचार करण्याचा वेग एवढा प्रचंड होता की पहिला विचार इष्ट स्थळी
पोचायच्या आत मागचा विचार त्याला येऊन भिडत होता. आणि ही प्रक्रिया एवढी प्रचंड वेगात
चालू होती की स्टीफन हॉकिंग्ज तिथे असते तर बिग बँगचं गूढ सहज उकलता आलं असतं. पण रजनीच्या दृष्टीनं त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याला गाढ झोप लागली. अगदी गाढ.

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....