Wednesday 22 December 2010

06/10/2010

एक वीस-बावीस वर्षाची  तरुणी. तिचे एका तरुणावर प्रेम. हा तरुण कमी शिकलेला,  बेरोजगार. त्या मुलीचे वडील त्याला घरी बोलावतात. पण अपमान करून घालवतात. तो जातो.
त्यानंतर एक पावसाळी रात्र. ती मुलगी त्या रात्री पावसात नावेने नदी ओलांडून त्या मुलाकडे जाते. नावाडी मुलीच्या निरुपायाचा फायदा घेऊन तिच्याकडून अंगठी, चैन घेतो..मात्र तिला पैलतीरी पोचवतो.
ती मुलगी त्या मुलाकडे येते. मात्र..तो तिला नाकारतो आणि येथून निघून जा असे सांगतो.
त्याचवेळी तिथे एक दुसरा मुलगा उपस्थित होतो. तो तिला सांगतो, की त्याचे तिच्यावर खूप-खूप प्रेम आहे..मात्र ती दुस-याशीच प्रेम करत असल्याने आणि हे त्याला ठावूक असल्याने तो काही बोलला नव्हता. तेंव्हा आता तू माझ्याशी लग्न करशील का? असे तो दुसरा मुलगा विचारतो.
यावर ती मुलगी चटकन तयार होते. आणि ती मुलगी त्या दुस-या मुलाशी लग्न करते. 
हि झाली आजची रेणूताई गावसकर यांची कथा. त्यांनी हि कथा सांगितल्या नंतर त्या कथेतील पाच पात्रांच्या भूमिकेत जाण्यास सांगितले. तेंव्हा त्यांचे मूल्यमापन न करता ते त्यांच्या भूमिकेत साजेशे वागले असे थोडक्यात म्हणू शकतो. कारण कोणताही बाप आपल्या मुलीला बेरोजगार वगैरे माणसाच्या पदरी बांधणार नाही. तिथे ते बापाचे प्रेमच असते. त्याने प्रथम मुलीला रागावयास हवे हे म्हणणे ठीक आहे, मात्र जसे इतरत्र ते घडते तसे इथे घडले नाही, इतकेच.
दुसरा मुद्दा म्हणजे तो नावाडी. तो प्रसंगानुरूप वागला म्हणावा लागेल कारण जरी त्याने अंगठी, हार वगैरे घेतला तरी दुसरा गैरफायदा घेतला नाही हि सुदैवाने चांगलीच बाजू.
आता ज्या मुलावर 'त्या' मुलीचे प्रेम होते तो असा का वागला? तर कदाचित प्रेमापेक्षा त्याला आपला 'इगो' महत्वाचा वाटला असेल. तो इथल्या भाषेत स्वतःपेक्षा 'द अदर्स' ला महत्व देत असावा. 
दुसरा मुलगा संधिसाधू जरी वाटला तरी त्याने पहिल्याने त्या मुलीला नाकारेपावेतो कुठेही मध्ये लुडबूड केली नव्हती.
मुलीला जेंव्हा त्याने हे सांगितले की त्याला तिच्याविषयी प्रीती वाटते, आणि तो तिच्याशी लग्न करू इच्छितो, तेंव्हा मुलीकडे बापाकडे वापस येण्याचा अथवा स्वतःचे आयुष्य एकटे, नव्याने सुरवात करण्याचा आणि लग्नास 'नाही' म्हणण्याचा देखील पर्याय होता.
मात्र...मात्र असे कोणतेही पर्याय न निवडता, तिने 'त्या' दुस-या मुलाशीच की, ज्याच्याविषयी तिला काडीमात्र माहिती नाही, अशा अनोळखी मुलाशीच लग्नाचा का निर्णय घेतला? हा कळीचा मुद्दा आणि मुलगी कथेची केंद्रबिंदू असल्याने महत्वाचा आहे. 
तिने दुस-या मुलाशी लग्न करणे हा पर्याय निवडताना नाकारण्याचा (पहिल्याने) हा एक भाग असू शकेल किंवा दुसरा कुणी माझ्यासाठी जीव टाकायला तयार आहे, हि तात्कालिक पण सुखावणारी सुखद मात्र क्षणिक भावना आहे.
या विषयावर 'आदर्श' काय असायला हवे होते?
प्रत्येकाचा दृष्टीकोन कसा हवा होता?
आणि आवश्यक जरी नसले तरी चूक/बरोबर काय?
याविषयी एखाद्या कादंबरी इतका लेख तयार होऊ शकतो. पण आज तो विषय नाही आणि हे स्थळ देखील नाही.
'त्या मुलीच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते?' या उत्तरादाखल मी हात वर देखील केला मात्र, नेहमीप्रमाणे माझ्या 'मुखदौर्बल्याने' उत्तर दिले नाही.(दारू पिल्यानंतर हे
'मुखदौर्बल्य' कोठे जाते कुणास ठावूक!) पण त्यामागे empathize  करताना मी 'स्त्रीमन' 'तिच्या भावना' 'तिची त्याक्षणीची मन:स्थिती' इ.इ.गोष्टींचा उगाच भाकड तर्काने,  अनुमानाने अंदाज न बांधता, फक्त 'ती' म्हणजे 'मी' असे ठरवूनच निर्णय घेईन आणि तो निर्णय नक्कीच असेल की त्या 'दुस-या मुलाशी लग्न करण्याचा!
याचे सबळ कारण मला ती नाकारण्याची भावना (feeling of rejection) इतकी तीव्र आणि जिव्हारी लागेल की, मी केवळ पहिल्याचा सूड म्हणून देखील की, 'बघ, तू नाहीस तर, माझ्यावर मारणारे अजून कितीतरी आहेत..!' म्हणून मग तो दुसरा दारुडा असू देत किंवा जुगारी असू देत किंवा चोर, खुनी असू देत!
मी त्या पहिल्याला धडा शिकवणे किंवा त्याला पश्चाताप व्हावा म्हणून मुद्दाम लग्न करेन!
वास्तविक ret ची परिभाषा येथे लावता येते.
१.महत्वाच्या व्यक्तीच्या प्रेमाव्यतिरिक्त देखील आपण स्वतंत्र व्यक्तिमत्वाने जगू शकतो.
२ सर्वांनाच धडा शिकवणे आपले काम नाही.
३ स्वहित प्रथम जपले पाहिजे.  इ. इ.
मात्र इथे सर्व विवेकी कल्पनावर अविवेकी कल्पना मात करतील.
त्यामुळे मी अद्याप पुरेसा विचार करू शकत नाही त्यामुळे विवेकी अथवा अविवेकी असे सदा सर्वदा काही नसते याचे भान धरून देखील मी वारंवार स्लीप होते हे प्रमाण मानले तर,
मी त्या दुस-या मुलाशी ताबडतोब लग्न करेन हे निश्चित!
शेवटी जाता जाता त्याचा एक असाही शेवट मनात आलाच की, 
ती मुलगी दुस-याशी लग्न करते. पहिला मुलगा नंतर पश्चातापाने दग्ध होतो आणि दारूच्या आहारी जातो. मुलीला नंतर आपली चूक समजते आणि तिच्या मनात आता लग्नानंतर पहिल्याचेच विचार सुरु होतात. त्यामुळे दोघांत वारंवार खटके उडतात...त्याला कंटाळून दुसरा देखील मद्यपान सुरु करतो.
आणि शेवटी पहिला 'मुक्तांगण' आणि दुसरा 'कृपा' मध्ये दाखल होतो!(हो, कारण उगाच हा नसता त्रिकोण आपल्या इथे इतरवेळी मिटिंग मध्ये वगैरे नको!)असो.
हे सर्व डोके दुखावणारे कथानक एकदा रोहिणी निनावे यांना दिले पाहिजे! मग त्या यावर नक्कीच पाच ते सहा हजार भागांची महामालिका लिहितील. नंतर प्रत्यक्षात टीव्हीवर आणायला एकता कपूर आहेच!..आणि बघायला?...अर्थातच सर्व रिकामटेकड्या स्त्रिया....




No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....