Monday, 16 August 2010

माणूस वाचणारा कवी


वेगवेगळे ग्रंथ वाचून विचारवंत होण्यापेक्षा माणूस वाचायला शिकणे आवश्यक आहे. कारण माणूस या शब्दाइतका पवित्र शब्द नाही. वास्तवाशी संवाद म्हणजे संघर्ष आणि संघर्षाचा संबंध संस्कृतीशी आहे. या संस्कृतीचा निर्माता माणूस आहे म्हणूनच माणूस प्रथम वाचला पाहिजे मगच ग्रंथ वाचले तरी चालतील,‘ या वास्तवतेची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक कवितेतून सभोवतालच्या माणसांचे अंतरंग, त्यांच्या व्यथा, वेदना आणि कथादेखील आपल्या कवितेतून मांडणारा कवी म्हणजे नारायण सुर्वे!
असा हा आधुनिक लोककवी! लोककवी तुकाराम अनेक विद्वानांच्या प्रबंधांचा विषय बनतो तसाच हा लोककवी अनेकांच्या प्रबंधांचा आणि माहितीपटाचा विषय बनला आहे. आयुष्यात कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने जगणार्‍या नारायण सुर्वे यांच्या जीवनावरील माहितीपट फोर्ड फाऊंडेशनने २३ लाख रुपये ख्रर्च करून तयार करावा हाही एक चमत्कारच म्हणावा लागेल.
फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि ख्याल ट्रस्टने ‘नारायण गंगाधर सुर्वे‘ या नावाने सुमारे ४५ मिनिटांचा एक माहितीपट तयार केला आहे. शांता गोखले यांची पटकथा, अरुण खोपकर यांचे दिग्दर्शन आणि किशोर कदम यांनी अभिनय केलेला हा चित्रपट म्हणजे सुर्वे यांच्या एकूण कवितेच्या प्रवासाचा धावता आढावा घेण्याचा केलेला एक असफल प्रयत्न म्हणावा लागेल.
आपला जन्म नेमका कधी, कुठे आणि कोणत्या आईच्या पोटी झाला याची कोणतीही जाणीव नसलेला आणि तरीही या जगातून गेल्यावर आपले नाव राहणारच या सार्थ अभिमानाने काव्यामध्ये आपल्या हृदयाचा पीळ उलगडवून त्यात जीव ओतणारा कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा आपल्याला परिचय होतो. गिरणीच्या दारावर गंगाराम सुर्वे यांना सापडलेला बेवारशी पोर त्याच्या अज्ञात मातेने नाळ कापून जगाच्या पाठीवर अंधारात भिरकावून दिल्यावर गिरणीच्या संस्कृतीशी त्याच ओल्या नाळेने जोडला गेला, वाढला आणि गिरण संस्कृतीशी नाव जोडून मोकळा झाला. कळू लागले त्याच वयात हातात डबा घेऊन गिरणीत हरकाम्या म्हणून जाऊ लागलेल्या नारायणला या गिरणगावातील संस्कृतीनेच मोठे केले. साधा गिरणीतील हरकाम्या पोरगा सभोवतालच्या वातावरणात मोठा होत असतानाच कधी राजकीय चळवळीत उतरला हे त्याला देखील कळले नाही. त्याच्या कवितेत हेच सतत जाणवत राहिलं आणि जाणवत राहिलं ते सध्या हरवत चाललेलं संवेदनक्षम माणसाचं जीवन!
‘प्रत्येकवेळी कोणतीही गोष्ट ठरवून झाली नाही पण दरवेळी प्रत्येक गोष्ट जमत गेली बुवा‘ अशी प्रांजळपणे कबुली देत आपल्या आयुष्याची ओळख करून देणार्‍या नारायण गंगाराम सुर्वे यांना तरी कुठे ठावूक होतं की आपण इतके ‘ग्रेट‘ होऊ. गिरणी कामगार ते शाळेतला शिपाई आणि त्या शिपायापासून शिक्षक अशी स्थित्यंतरे जीवनात आलेल्या नारायणच्या कविता अनेक प्रस्थापितांनी धुडकावून लावल्या होत्या. जीवनातल्या प्रत्येक स्थित्यंतरात तो आजूबाजूचा माणूस वाचायचा प्रयत्न करीत होता. कधी त्याला डोंगरावर शेत असलेल्या आणि डोक्यावर कवळाचा भारा घेऊन जाणारी कातकरी बाई दिसली तर कधी मास्तरांना त्यांचंच नाव आपल्या पोराच्या बापाच्या जागी लिहिण्याची गळ घालणारी पण मुलाला मोठं करण्याची, चार बुकं शिकविण्याची जिद्द उराशी बाळगणारी शरीरविक्रय करणारी महिला भेटली. कधी त्याला विदेशात पैसा कमविण्यासाठी गेलेल्या आपल्या धन्याला ‘तेव्हढं पत्रात लिवा‘ सांगून त्याचा आपल्यावर असणारा विश्वास सार्थ ठरविणारी गृहिणीही भेटली. स्वतः केवळ व्ह. फा. म्हणजेच व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकलेल्या कवीच्या कविता विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट होतात हा चमत्कार केवळ नारायण सुर्वे यांच्याच बाबतीत घडू शकतो.
जीवनातील असा चमत्कार सुर्वे यांच्या आयुष्यात नेहमीच घडत आला आहे. ‘डोंगरी शेत माझं गं‘ हे काव्य त्यांनी लिहिले खरे पण या काव्याचा जनक तेच आहेत हे सार्‍या महाराष्ट्राला कळण्यासाठी बराच काळ जावा लागला. डाव्या चळवळीमध्ये शाहीर अमरशेख यांनी हे गाणं जेव्हा ओठात खेळवलं आणि त्यांच्या कलापथकातील सुबल सरकार यांनी ते नृत्याद्वारे सादर केले तेव्हा नारायण सुर्वे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. त्या काळी गाजलेल्या या गाण्यावर जेव्हा ध्वनिमुद्रिका निघाली तेव्हा अनेक प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या.
अर्थात सुर्वे यांना पद्‌मश्री पुरस्कार मिळाला तेव्हादेखील याचीच पुनरावृत्ती झाली होती आणि तोही चमत्कार त्यांनी अनुभवला आहे. त्यांचे समकालीन असणार्‍या एका ज्येष्ठ नाटककाराने सांगितलेली आठवण अशी की, नारायण सुर्वे तेव्हा आपल्या कविता घेऊन प्रस्थापितांकडे जात असत, तेव्हा त्यांच्या अपुर्‍या शिक्षणाकडे आणि साध्या राहणीमानामुळे नाक मुरडणार्‍यांची संख्या काही कमी नव्हती. कै. विनायक भावे यांच्याकडेही सुर्वे अनेकदा आपल्या कविता घेऊन येत असत, पण मानवी स्वभाव कधीही न वाचलेल्या आणि इतरांच्या लिखाणाचे अनुकरण करण्यातच धन्यता मानणार्‍या भाव्यांना सुर्वे यांची कविता म्हणजे उघड्या गटारातील घाण वाटायची. भावे तेथेच राहिले आणि सुर्वे यांची कविता मोठी झाली, असे त्या नाटककाराचे म्हणणे आहे. सुर्वे यांनी प्रस्थापितांशी दोन हात केले ते आपल्या कवितेच्या माध्यमातून. त्याकाळी कविता ही केवळ कल्पनेवरच असायची त्याला सुर्वे यांनी छेद दिला. मर्ढेकरांना उद्देशून त्यांनी लिहिलेल्या कवितेमधून त्यांनी या कल्पनाविष्काराला छेद दिला. प्रस्थापितांच्या घरी आणि त्यांच्या मेळाव्यात जाऊन आपली कविता सादर करण्याचे धार्ष्ट्य त्यांनी दाखविले. सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला अभिनव प्रकाशन या डाव्या चळवळीशी संबंधित असलेल्या प्रकाशन संस्थेने. ‘ऐसा गा मी ब्रह्म‘ या पुस्तकासाठी त्यांच्या हितचिंतकांनी वर्गणी जमवून अभिनवच्या वा. वि. भट यांना प्रकाशनासाठी लागणारे पैसे दिले. हाही या प्रांतातला एक चमत्कार म्हणावा लागेल. अर्थात कवी म्हणून मान्यता मिळाल्यावर सुर्वे यांनी प्रस्थापितांच्या अन्य प्रकाशन संस्थांकडे आपली दुसरी पुस्तके सोपवली हा भाग व्यवहाराचा झाला.
सुर्वे यांचे बालपण ज्या वस्तीत गेले ती वस्ती, तो गिरणगाव आता नामशेष झाला आहे. त्यांची कविता ज्या संस्कृतीशी जोडली गेली ती संस्कृतीही हळूहळू लोप पावू लागली आहे. ‘मी कामगार आहे, एक तळपती तलवार आहे,‘ असे सांगणार्‍या सुर्वे यांनी मुंबईच्या गिरणीची लावणी पेश करून गिरणी कामगाराच्या जीवनाचा क्रम सादर केला आहे. मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात व्यग्र असलेल्या चाकरमान्याची व्यथा ‘माझी मैना गावावर राहिली‘ ही छक्कड सादर करून कष्टकर्‍यांचे जीवन स्वतः जगलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मांडली तर कळू लागल्यापासून धागा कसा धरायचा आणि बॉबीन कशी भरायची हे शिकलेल्या नारायण सुर्वे यांनी ‘सात वाजता सकाळी, भोंगा वाजवी भूपाळी‘ ही लावणी सादर करून गिरणगावाचे यथार्थ दर्शन घडविले आहे. आजही अनेक वयोवृध्द गिरणी कामगारांच्या ओठावर ही लावणी आपसूक येते आणि त्यांचे पाण्याने भरलेले डोळे बंद गिरण्यांच्या दाराकडे वळतात. आता भोंगा बंद झाला आणि कामगारांच्या पाळ्यादेखील बंद पडल्या पण सुर्वे यांची ही लावणी इतिहासात गाजून गेली.
याच गिरणीच्या आयुष्यात त्यांना त्यांची जीवनसाथी मिळाली आणि तिथेच त्यांना मार्क्सही भेटला.
‘असाच एकदा मोर्चात मार्क्स मला भेटला‘ असे सांगत आपण कम्युनिस्ट चळवळीशी कसे बांधले गेलो याचे वर्णन करणार्‍या सुर्वे यांना याच कम्युनिस्ट चळवळीने सांस्कृतिक चळवळीची उपेक्षा केली याचे वैषम्य वाटते. या देशातील सांस्कृतिक जडणघडणीकडे कम्युनिस्ट चळवळीने म्हणावे तेव्हढे लक्ष दिले नाही अन्यथा नारायण सुर्वे यांच्यासारखे अनेक कवी-कलावंत आजही डावी चळवळ फोफावण्यासाठी धडपडले असते. त्यांच्या ‘मार्क्स‘ कवितेत अखेरीस ते म्हणतात, ‘मला गर्दीत पाहून मार्क्स म्हणाला काय कविता-बिविता करतोस वाटते. मलादेखील गटे आवडायचा.‘ या वाक्यातच चळवळीकडून होणारी सांस्कृतिक उपेक्षा लक्षात येते. सुर्वे यांच्या ‘माझी आई‘ ही कवितादेखील अशीच नोंद घेणारी आहे. आपल्या जन्मदात्रीचा पत्ता माहीत नाही पण बेवारशी असलेल्या एका अनाथाला पोटच्या पोराच्या मायेने उराशी घेऊन नंतर त्याचा प्रतिपाळ करणार्‍या त्या मायेचे वर्णन करणारी कविता सुर्वे जेव्हा सादर करतात तेव्हा डोळ्यातून पाणी न येणारा हृदयशून्य माणूस सापडणे कठीण! शिक्षकाच्या भूमिकेत असतानाही केवळ मुलांवर पाठ्यपुस्तकी संस्कार करण्यापेक्षा त्यांना माणूस वाचायला लावणारे सुर्वे आपल्या जीवनाचे सार कशात आहे, हेही मुलांना शिकवितात तेव्हा त्यांच्यातील माणूस म्हणून असणार्‍या संवेदना मनाला भिडल्याखेरीज राहत नाहीत.
प्रसाद मोकाशी

No comments:

Post a Comment

हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....