आज व्हॉलीबॉल खेळल्यानंतर सचिनने मनस्थितीबद्दल विचारले, मी म्हणालो, मी मॅडमशी बोललो त्यामुळे आता थोडा आत्मविश्वास आला आहे. आमचे हे बोलणे चालू असताना एक पेशंट अचानक तिथे आला व त्याने ऐकून दचकून विचारले, "अशा विषयावर मॅडम बोलतात?" मी म्हणालो, हे विषय त्यांच्यासाठी क्षुल्लक असतात. आपल्यासारखे शेकडो पेशंट दरवर्षी, वर्षाकाठी ते पाहत असतात, आपणच घाबरतो! 'मुक्तांगण' मध्ये तर यासाठी एक खास मॅडम आहेत. असो.
तर आज स्ट्रेस कमी झाल्यामुळे व विषय निघाल्याने मी मुक्तांगण मधील एक किस्सा लिहिणार आहे.
मुक्तांगण मध्ये मी तीस-या वेळी दाखल झालो तेंव्हा, पहिल्या आठवड्यात, दुस-या की तीस-या दिवशी जेवण करून येत असताना रमण देशपांडे यांनी मला, प्रवीण, तुला कुलकर्णी मॅडमनी बोलावले आहे. असे सांगितले. मी पहिल्याच आठवड्यात होतो. (तिकडे आठवडे असतात.) त्यामुळे साहजिकच जेवण करून {अनलिमिटेड!} करून झोपायच्या तयारीत होतो. डोळ्यांवर झोप खूप होती. मी नापसंती व्यक्त करत मॅडमच्या केबिनमध्ये गेलो. तिथे त्यांच्यासमोर कांही फाईल्स होत्या. त्यांनी मान वर न करताच, {अगदी बसा देखील न म्हणता} विचारले, तुम्ही मी विचारेन त्याला पटपट उतारे द्या. मला आकाशवाणीवर इंटरव्युला जायचे आहे.
मी म्हणालो, हुं...
त्यांनी पहिल्यांदा विचारले, "मी तुम्हाला मागील अॅडमिशनमध्ये भेटले होते ना?"
मी म्हणालो, "नाही"
त्यावर त्यांनी कांहीतरी नोटआउट करत ठामपणे सांगितले, हे काय? मी तुम्हाला कांही सांगितले देखील होते. विसरलात का?
मी म्हणालो, "असेल कदाचित.."
त्यावर त्यांनी पटापट विचारण्यास सुरुवात केली, पहिला प्रश्न : तुम्ही गेल्या महिन्यात मिसेसना पुन्हा शिवीगाळ केलीत...
मी फाईलवर नजर फिरवली..त्यावर प्रवीण आकोसकर असे नाव होते! मी मॅडमची फिरकी घ्यायचे ठरवले. (मनातल्या मनात रमण देशपांडेवर चरफडत) मी म्हणालो, चुकलेच..
त्यावर त्यांनी सांगितले की, तुम्ही मिसेसना फक्त संध्याकाळी बीचवर नेण्याचे कबूल केले होते ना? सहकारी मिटिंग मध्ये बोलल्या त्या!
मी म्हणालो, "मला नाही कधी बोलली ती..बोलली तर नेत जाईन..!"
आता त्यांनी मला नीट निरखून (मान वर करून) पहिले!..
फाईलवर नाव पहिले..
व विचारले, "तुम्ही कुलकर्णी ना?" मी म्हणालो हो!
त्यावर त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता..पण मॅडम तिथे 'अँगर मॅनेजमेंट' शिकवतात!
त्यांना 'फ्लॅश फोर ए' चा चांगला सराव असावा!
flash four "A"
A=accept
A=aware
A= analysis
A=action !!
मग त्यांनी शांतपणे फाईल्स जमवल्या. आणि मला सांगितले, "त्या प्रवीण अकोसकरला सांगा..पटकन येऊन जा म्हणून..
मी अजून कांही ऐकण्याच्या आधी उठून आलो!
नंतर बरेच दिवस माझे स्वतःशीच हसण्यात गेले. कारण आता कुणाची बायको?...मला कशाला बीचवर फिरायला घेऊन जायला सांगेल?सांगा पाहू? पण नावात साधर्म्य आणि एकंदर कामाचा व्याप आणि पसारा यामुळे कदाचित आणि रमणची चूक यामुळे मॅडमची गफलत झाली असावी!
No comments:
Post a Comment