Sunday, 31 October 2010

14/06/2010

आज भेटायला आई आल्यावर आनंद देखिल वाटला पण.. एकीकडे विषाद देखिल वाटत होता कारण जेंव्हा तिने सांगितले की, बस मधे चढ़ता येत नाही, कारण माझ्यामुळेच तिला हा अधूपणा आला आहे हे सहज विसरता येत नाही.
तुम्ही आर्थिक प्रश्नाविषयी विचारलंत तेंव्हा आज खरेच माझ्याकडे पैसा असता तर मी निश्चितच अजूनही दारूच पीत राहिलो असतो. माझ्यात व भावाच्यात जरी सामंजस्य आहे तरी आज कामापुरता पैसा आहे म्हणून आततायी निर्णय घ्यायचे नाहीत असे ठरवले आहे. कारण त्याचे काय करायचे? अन्यथा पैसा कसा वाढवता येईल याकडे माझे निश्चितच लक्ष आहे. पण जेंव्हा लौकिकार्थाने जेंव्हा कामाचा विषय निघतो तेंव्हा मला फक्त मर्यादाच दिसतात. कारण जेमतेम बुद्धी आणि कसलाही अनुभव नाही, व्यवहारज्ञान नाही, आणि समाजाची भीती, हि ती करणे होत. दारू न पिताच राहायचे तर इथे काय किंवा मला घरात कोंडून घेऊन देखील राहता येईलकी! पण त्याला अर्थ नाही. जिथे माझा कुणावर आणि कुणाचा माझ्यावर विश्वास नव्हता तिथे आता हळूहळू बसत चालला आहे हे  देखील काही कमी नाही तेंव्हा एखाद-दोन वर्षे अवलंबित्व काही वाईट नाही. हे सर्व लिहिण्याचेही कारण आहे की, मी पटकन विसरतो. त्यासाठी कधी निवांत क्षणी वाचून ह्या जाणीवा जागृत ठेवाव्या लागतात.
आत्ता हे लिहिताना फळ्यावर इनपुटचे डिफेन्स लिहिलेले होते तिकडे नजर गेली. मी स्वतः एकेका डिफेन्सचे पूर्ण वह्या भरभरून उदाहरणे देऊ शकतो कारण तेवढी मी ती वापरली आहेत. पण आता त्याबाबत कधी कधी जागृत नसतो हेदेखील मान्य!
पण खोटं बोलणे हे पार हाडीमाशी मुरलेला डिफेन्स आहे. आता मी कणेकरी वाचत होतो तेंव्हा शिरीष कणेकरांनी थापाड्या व खोटारडा असे दोन भाग केलेले आहेत त्यापैकी मी थापाड्या या गटात निश्चित मोडतो! कसा काय? तर त्यांनीच एक उदाहरण दिले आहे की, समजा एखादा मनुष्य कुणाला भेटायला सिटीबसने आला तर ...खोटारडा माणूस सांगेल की, 'त्याचं काय झालं, आज गाडी गरेज मध्ये कामाला निघाली...टूव्हीलर भावाने नेली...आणि taxi वेळेवर मिळाली नाही...रिक्षा देखील नाही..तेंव्हा बसने यायला लागले...'यात तो खोटे बोलत असतो आणि आपल्याकडे गाडी,
.टूव्हीलर आहे, आणि taxi रिक्षाने यायची आपली ऐपत आहे, आणि आज आगदी नाईलाजाने बसने यायला लागले हे त्याला दाखवायचे असते!
२     "थापाड्या"  हा खोटं बोलायचे म्हणून बोलतो!
उदा: समजा एखाद्या मनुष्याला विचारले, 'आज टू जेवण काय केलेस?' तेंव्हा या थापाड्या व्यक्तीने जर
'वरणभात' खाल्ला असेल ते तो 'पिठलेभात' असे सांगेल! वास्तविक त्यात असा काय फरक आहे? किंवा दर्जात काय फरक आहे? पण खोटं बोलायचे म्हणून बोलणारा तो थापाड्या!
माझ्या बाबत हे होते कारण मी जर 'अलका' ला 'लालबाग परळ' सिनेमा पहिला तर मी तो 'नीलायम' ला पहिला असे सांगेन यात दर्जाचादेखील, तिकीटाचाही फरक नाही! असो.
आज पाऊस पडत होता तेंव्हा जोशी सर पेटी घेऊन आणि सचिन ढोलके घेऊन बसला असता, जोशी सरांनी दोन मिनिटे कोणकोणत्या रेल्वे लाईन वर कोणकोणती गाणी गातात हे साभिनय करून दाखवले! तेंव्हा त्यांच्याकडून हि कला शिकून घ्यावी म्हणतो!
निदान घरून काही मिळो न मिळो उपाशी तरी मरणार नाही! सरांना 'फ्री टाईम' कधी असतो ते विचारून घ्यायला लागेल एकदा!


नमस्कार,
तुम्हाला इतक्या सर्व जाणिवा आहेत, भावना वाटतात पण तुम्ही त्या स्वतः जितक्या समजू शकता पण त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोचवत नाही, तर काय उपयोग?
अजून एक सांगायचं होतं की नात्यांमध्ये जो कडवटपणा वाटतो तो जर कमी करायचा असेल तर काही काम त्यावर करायचं असल्यास बघा. empathy  हा जो प्रकार आहे, स्वतःच्या आईने त्या त्या वेळी जे decision  घेतले (जे तुम्हाला पटले नाहीत) ते कदाचित चुकीचे असतीलही! परंतु तिचे भावनिक चढ-उतार, तिच्या insecurities , तिचा एकटेपणा हा कधी समजून घेतला आहे का? तिला कुणाचा आधार आहे? मोठा मुलगा (ज्यावर आया खूप भिस्त ठेवतात) आधार देत नसेल तर तिची मानसिक अवस्था काय झाली असेल? तर if you empathize, the bitterness may so down! please give it a try!
आपण याविषयी बोलूया.
तुमचा नवीन profession चा choice खूप आवडला!!
 

वैशाली मॅडम


Saturday, 30 October 2010

11/06/2010

दारूबद्दल काय स्थान आहे हे आता निश्चित सांगू शकतो तरी यावेळी जेंव्हा येथे आलो तेंव्हा अगम्य आहे, न समजण्यासाठी आहे असे काहीजण म्हणाले पण ए.ए.चे 'बिग बुक' वाचताना सर्व उलगडा होतो कारण तेथे अगदी आम्ही कामुकतेच्या अपराधीपणातून दारू पिली असे देखील सांगितले आहे. याबरोबरच तुमच्या पहिल्या रिमार्क्स मध्ये 'तुम्ही दुस-यांदा 'तिकडे' का गेला? असा प्रश्न होता ते ते वातावरण मला कांही नवीन नाही ह्या पाच सहा महिन्यात भरपूर वेळा तिकडे फिरलो मात्र विचार आले नाहीत कारण वास्तविक आवडणे आणि प्रत्यक्ष कृती यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
दुसरी बाब आशी की मी ज्या नैतिकतेच्या गप्पा आता मारतो त्यात मी म्हणतो की, संधी असून मी तसा वागत नाही (तपशीलात जाण्याची गरज नाही कारण माझे पहिले कौन्सिलर सांगतात की, माणसाने नेहमी खरे सांगावे पण खरेच सगळे सांगू नये!) तर जेंव्हा मी ज्या सामाजिक स्तरातून येतो, किंवा व्यसनकाळात जेथे राहत होतो, तेथे देखील कांही तत्वे होती पण सर्वच अनैतिक अथवा एकदम नीतिवान असे कांही नव्हते. हे सर्व तेथे देखील होते मात्र माझ्यावर काळात नकळत झालेले 'संस्कार' हे आणि अनुभव ज्यात अनैतिकतेचे खुनापर्यंत बघितलेले परिणाम या सर्वांचा आणि वाचनाचा कांही प्रभाव या सर्वांमुळे बनलेले एक मत {तत्व नव्हे} याचा परिपाक म्हणून नैतिकता यावर होतो. तेंव्हा या अनुषंगाने येणा-या चार चांगल्या गोष्टीदेखील याबरोबरच येतात. जसे : इतरांना मदत करणे इत्यादी. पण हे चांगले संस्कार उलटवण्यासाठी किंवा साधे घरात पैशाची मागणी करताना बळजोरी करताना एक जबरदस्त ताकद लागते, हे सर्व चांगुलपणा हा प्रवाहातल्या काडीसारखा असतो तो सतत माझ्यासोबत वाहत असतोच पण तो उलटवण्यासाठी जी ताकद, आणि धैर्य लागते ते दारू मला देते.
 
इथपर्यंत ठीक आहे पण जेंव्हा हेच मी दारू न पिता करतो तेंव्हा गिल्ट का? आणि असला तरी नंतर का? हे पुन्हा समर्थन वाटाते. त्यासाठी real self  आणि projected image यांत सारखीच किंवा न पटणारी न आवडणारी असते आणि त्याबाबत मात्र नंतर भयंकर गोधळ उडू लागतो. यामुळे भूतकाळाशी नेहमीच सांगड घातली जाते. याविषयी self talk विषयी बोलले पाहिजे कारण हा गोधळ थांबला पाहिजे. असे मला वाटते. आज खेळ सुरु व्हायला अवकाश होता तेंव्हा आमचा एक पेशंट मित्र त्याच्या सहा-सात वर्षाच्या गोड मुलीला घेऊन तेथे आला. आम्ही सर्वजण तेथे बसलो असता तिने मला डॉमेंट्री कडे निर्देश करून   विचारले , दादा , (हो! कारण लहान मुले अजून मला त्यांच्यातलाच समजतात!) तेथे काय आहे? मी सहज उत्तरलो आम्ही तेथे राहतो. तुझा बाबा देखील तेथेच राहत होता!' पण छोटी फारच चटपटीत होती! ती पटकन म्हणाली, "बाबा! तू मला सांगितलास की तू हैद्राबाद ला गेलास म्हणून...." मग मागून तो मित्र येऊन काहीतरी सारवासारव केली....
मागच्या वर्षी मी मुक्तांगण येथे होतो! तिथे आम्ही दिवाळीत किल्ले वगैरे बांधले होते!(आयुष्यात पहिल्यांदा आणि शुद्धीत!) तेंव्हा माझी भाची तिथे आली होती तिने मला विचारले होते, मामा, तू  इथे राहतो? हे तुझे घर आहे?
हो म्हणालो.....काय बोलणार...?


नमस्कार,
हे वाचून माझीपण पहिली reaction ह्यावर काय बोलणार? अशीच आली.
भूतकाळाची सांगड हि राहतेच विसरू म्हणून तो तो विसरता येत नाहीच पण त्याबद्दलची sensitivity कमी होईल का? आंपण याविषयी सविस्तर बोलू.

वैशाली मॅडम


हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....