Thursday, 1 April 2010

बस्तरचे अरण्यरुदन: अनिल अवचट:५


० ५ ०

पहिल्या वेळी हिरेमठाबरोबर पुढे जगदलपूरपर्यंत जावून आलो. पण सर्व गाठीभेटी होत्या त्या संबंधित अधिका-यांच्या. फोरेस्ट-अधिकारी, सध्याचे कलेक्टर परवीर कृष्ण, विभागीय कमिशनर खात्री, असे अनेक. लोकायुक्त-कमिटी येऊन गेली होती. त्यांचा अंतरीम अहवाल आला होता. त्यात नायडूंच्या पत्रातल्या प्रकरणाना जवळपास पुष्टीच मिळत होती. पुढे काय होणार, सी.बी.आय. कडे तपास सोपवला जाणार काय, अशी चर्चा चाले. हिरेमठ म्हणजे अफाट कार्यशक्तीचे कार्यकर्ते.. त्यांची कामाची शैली पाहण्याजोगी होती. कुणीही भेटले, ओळख झाली, अगदी ट्रेनमध्ये असो कि ऑफिसात, की "भाईसाब, आपका नाम? पता? टेलिफोन? रेसिडेंस का? " अशी चौकशी करून डायरीत लिहून ठेवत. कितीदा मी म्हणायचो, "आता रेल्वेतल्या त्या माणसाचा तुम्हाला काय काय उपयोग आहे?" ते म्हणाले, "होतो कधीतरी" त्यांचे हे नेट्वर्किंग पाहून चकित व्हायचो. आम्ही बस्तरमध्ये एका गावी असलो, की पुढच्या गावाला त्यांची फोनाफोनी सुरु होत असे. ओळखीच्या फारेस्ट किंवा अन्य अधिका-याला विनंती करून डाकबंगल्यात खोली मिळवायची. तिथल्या अनेकांच्या अपॉईटमेंट फिक्स करायच्या. वाहन लागत असल्यास तेही कुठून मिळवायचे. त्यामुळे त्या गावात जाण्याआधी तिथला प्रोग्राम एकदम सुरळीत व्हायचा. हे करताना धारवाडला, ओरिसाला, दिल्लीला फोन करून महिना दोन महिने नंतरच्या कुठल्या मिटींगा कुठे घ्यायच्या, कधी घ्यायच्या, कोणाला बोलवायचे, हे पक्के करत. मग त्या त्या लोकांना फोन. ते 'जनविकास आंदोलन' नावाच्या अखिल भारतीय फोरमचेही काम करत. रिक्षात बसले आणि ती सुरु झाली की रिक्षावाल्याला म्हणत, "भाई, रस्तेमे एक फोन करना है" ते एकदा एस.टी.डी. बूथमध्ये शिरले की आम्ही बाहेर कंटाळून जात असू. परत आल्यावर आमची माफी मागत आणि रिक्षा चालू होई. त्यांना झेरॉक्सचेही खूप आकर्षण. त्यांनी 'आतून' मिळवलेली सरकारी पत्रे, कमिट्याचे रिपोर्ट असे काय काय ते नेहमी झेरॉक्सला टाकत. जाताना टाकायचे, येताना कलेक्ट करायचे. कुठल्याही अधिका-याशी बोलताना ते लगेच पिशवीतून संबंधित कागद पुढे करत. तो माणूसही या कार्यक्षमतेपुढे चकित होत असे. मी त्यांना म्हटले, "गांधीजींचा जसा चरखा, तसं तुमचं एस.टी.डी.बूथ आणि झेरॉक्स मशीन हे सिम्बॉल आहे." या दोन साधनांचा त्यांनी चळवळीसाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे; पण या सगळ्या गाठीभेटीतून मी लोकांपर्यंत जाऊ शकत नव्हतो. हिरेमठांची वावटळ पाहता 'मला खेड्यात जायचंय' असे म्हणूही शकत नव्हतो. म्हणून जसे जाईल तसे जाउद्या. हे नंतर बघू.असे म्हणून तो प्रवास पूर्ण केला.
पुढच्या वेळी मात्र मी आणि मधुकर देशपांडे निघालो. ते हिरेमठाच्या अगदी दुस-या टोकाचे. शांत, सौम्य, कमी पण छान बोलणारे. आम्ही नागपूरपासूनच "ट्रक्स' ठरवली. [खर्च अर्थात मधूकरांचा!] आणि बस्तरभर फिरलो. कांकेरमध्ये गेलो तेंव्हा रत्नेश्वर नसणार होता; पण त्याने शिवराणींवर सोपवले होते. शिवराणींनी शिवचरण नेताम नावाच्या तरून कार्यकर्त्यास बरोबर दिले. काळा तुकतुकीत रंग, उंच, शिडशिडीत. दाढी राखलेली. सुशिक्षित कार्यकर्ता. याच्या अनेक गावात ओळखी. याला वेगवेगळ्या आदिवासी बोलीही येतात, त्यामुळे अगदी योग्य माणूस.
कांकेरच्याच जवळ भानप्रतापपूर रस्त्यावर डोंगरकट्टा गाव आहे. जाताना रस्त्यावर 'माकडी धाबा' असा मोठा धाबा होता. मी विचारले, "इथं आल्यापासून 'माकडी' हे नाव बघतोय : माकडी ग्राम, माकडी धाबा. हे कसलं नाव आहे?
"ते आमच्या देवीचं नाव आहे. माकडी दंतेश्वरी ही या भागातील सगळ्या आदिवासींची देवी आहे."
जसे डोंगर दगडगोट्यांचे, तसे ते गोटे शेतामध्ये, रस्त्याच्या कडेला आलेलेही दिसत. आपण जसे इकडे रस्त्याच्या कडेने झाडांना पांढरा-तांबड्या रंगाचे पट्टे मारतो तसे तिकडे वाहनाना लक्षात यावे म्हणून त्या दगडांवर आडवे पट्टे ओढलेले. त्या दहा-वीस फूट उंचीच्या प्रचंड गोटयावरच्या त्या रेघा पाहून शंकरांच्या पिंडीना भस्म लावल्यासारखे वाटे. काही ठिकाणी दगड फोडून लोक त्यांचे आठ-नऊ इंच लांबी -रुंदीचे ठोकळे बनवताना दिसत.
अशाच दगडगोट्यातून गेलेल्या रस्त्यातून डोंगरकट्टा गावात गेलो. पंचवीस-तीस घरांचे गाव असेल. शिवचरणला पाहून काही लोक थांबले. त्यावेळी वस्तीत असलेल्या पाच-दहा लोकांना जमवले. चट्टेरीपट्टेरी शर्ट, खाली गुडघ्यापर्यंत लुंगी घातलेला एक तरून मुलगा सरपंच होता. आम्ही सर्व जण कोरेने घेतलेल्या जागेकडे निघालो. शेतावरच्या बांधातून गावाच्या थोडे दूर गेलो. एका बाजूला चांगले जंगल असलेला भाग आणि त्याच्यासमोर हा विस्तृत साडेनऊ एकरांचा जमिनीचा प्लॉट होता. त्या जागेतून फिरू लागलो. मोठमोठी झाडे जमिनीपासून वीत-दोन वीत अंतरावर कापलेली होती. असे खुंट जागोजाग दिसत होते. शेजारचे जंगल पाहताना वाटले, एके काळी इथे असेच असणार. हे मोठे मोठे वृक्ष फांद्या पसरून उभे असणार. त्यांच्या खाली छोटी झाडे, त्याखाली झुडुपे, अशी छान 'इको सिस्टीम' असणार. आता सर्व काही उजाड झाले होते.
काही खुंट पूर्णपणे मृत झालेले. काहींमधून करंगळीच्या जाडीचे छोटे कोंब आलेले. हे जगलेच तर मूळ झाड व्हायला किती वर्षे लागणार? पन्नास...शंभर? तेही आसपास जंगल नसताना? त्या खुंटाचा परीघ पाच-पाच, आठ-आठ फूट असावा. झाड खालच्या बाजूला रुंद होते म्हटले तरी पाच-सहा फूट व्यासाची तरी झाडे असणार. या राधेलाल कोरेला उभे जंगल पाहून ते तसेच राहावे, असे का वाटले नसावे? बहुदा एकेका झाडाच्या जागी त्याला लाख लाख रुपये दिसले असणार. या कागदी नोटांच्या मोहात त्याने शेकडो-हजारो वर्षांचे निसर्गाचे आश्चर्य काही क्षणात पुसून टाकले होते.
या झाडांच्या कबरस्तानातून बराच वेळ फिरत होतो. ज्यांच्यावर या संपत्तीचे रक्षण करायला सोपवलेले, अशा सर्कल-इन्स्पेक्टरचे हे कृत्य होते. नकाशात खाडाखोड करण्याइतपत तो निर्ढावलेला होता. तरूण सरपंच आम्हाला हिंडून सर्व दाखवत होता.
गावात परत आलो. एका घराच्या आवारात इतर लोक आमची वाट बघत बसले होते. आवाजावरून आत छोटी शाळा असावी. आत डोकावले. पाच-सात छोट्या मुलांना एक बाई शिकवत होत्या. त्याही आदिवासी चेह-याच्या. जमीन पोपडे निघालेली.मागच्या खिडकीतून प्रकाश झिरपत असलेला. ती मुले उभी होती. बाईही उभ्या. बाई मोकळेपणाने हालचाली करून, थोडेसे नाचून शिकवत होत्या. मुले बाई करतील तसे करत होती.
तीन तीन तीन
आटो के चक्के तीन
असे म्हणताना हाताने टायरच्या गोल आकारासारख्या हात फिरवत बाई दोन पावले पुढे येऊन उडी मारून थांबत होत्या.
चार चार चार
घोडे के पाँव चार
असे म्हणताना दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून, तो गुडघा वाकवून, पुढे उड्या मारत जायच्या. मुलेही त्यांच्यासारखे करायची.
पाँच पाँच पाँच
हात की उंगली पाँच
म्हणून असे दोन्ही हातांची बोटे पसरून, बाईंनी मोरासारखे डोलून दाखवले.
त्या पोरांचे मळके कपडे, हातपाय पाहून वाटले, कि, हे खरे भारताचे भाग्यविधाते. कारण शहरातील उच्चभ्रूंची मुले आता अमेरिकेची भाग्यविधाती झाली आहेत! मी त्यांना काही गमती करून दाखवल्या, हे ओघाने आलेच.
बाहेर येऊन बसलो.
शिवचरणने एका म्हाता-याला सांगितले, "त्यावेळी काय काय झालं ते सांगा साहेबाना."
ते सांगू लागले, "ती जंगलची जमीन. आम्ही कधी तिथली काटकी तोडली नाही. फोरेस्टचा गार्ड येईल अंगावर, अशी भीती होती. त्या कोरेनं वस्तीतील बन्सीलाल नावाच्या हरिजनाची जमीन घेतली, हेही आम्हाला माहित नाही. नंतर कळलं. पण एक दिवशी सकाळी ट्रकर-ट्रकमधून मानसं आली, मोठमोठी झाडं आडवी करून टाकायला लागली ट्रकमध्ये, ट्रलीत माल हलवायला लागली, तसं आम्ही घाबरलो. आम्ही जाऊन त्यांना थांबवलं."
आम्ही जगदलपूरकडे जाणा-या रस्त्याला लागलो. वाटेत एक घाट लागतो. तिथले जंगल सोडले, तर फारसे कुठे जंगल दिसलेच नाही. दोन्ही बाजूना नजर पोचेपर्यंत शेतजमीन आणि त्यात असलेली तुरळक झाडे. घाटात व आसपास असलेल्या जंगलावरूनच फक्त पूर्वी इकडे कसे जंगल असेल याची कल्पना येते. इकडे खांबासारखा सरळ उभा वाढणारा साल वृक्ष ही झाडामधील प्रभावी जात दिसत होती. त्याला इकडे लोक 'सराई' म्हणतात. कांकेरला शिवराणी सांगत होत्या, "तुम्ही दक्षिणेपलीकडे जाल तसं इथल्यापेक्षा कडक थंडी लागेल. कारण तिथं सराईची जंगलं आहेत. त्यात पाणी खूप असतं." पण थंडीत वाढ व्हावी एवढी जंगलंच राहिली नाहीत ही गोष्ट वेगळी. मध्य प्रदेशातल्याच मंडला भागात साल वृक्षांची प्रचंड मोठी जंगलं आहेत. तिथे 'साल बोअरर' नावाचा किडा निघाला म्हणून लाखो वृक्ष तोडली गेली, असे ऐकले होते.
इकडे आल्यापासून वृक्षतोडीचे आकडे ऐकताना गरगरायला होत होते. मागे हिरेमठ सांगत होते, "झूलना-तेंदू नावाच्या गावी एका इलेक्ट्रिकल गुत्तेदाराने तिथल्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या लायनी टाकण्याच्या खांबासाठी आठशे एक्केचाळीस झाडं कापली. तीही सुप्रीम कोर्टानं सर्व त-हेच्या जंगलतोडीवर स्टे आणल्यानंतर. रत्नेश्वरनाथच्या कानावर हे येताच तो फोरेस्ट अधिका-याला भेटला. त्यानं त्याला कुठल्या जातीची किती झाडं पाडली, याचा अधिकृत कागदच [अनधिकृतपणे] हातात ठेवला. तो हाती मिळताच रत्नेश्वरने प्रेस-कॉनफरन्स घेतली; पण त्याचा एक शब्दही पेपरवाल्यांनी छापला नाही. हा कागद हिरेमठाना मिळताच ते रेव्हेन्यू सेक्रेटरीला भेटले. त्यांना पत्र दिले.लोकायुक्तांचे ओ.पी.दुबे म्हणून सेक्रेटरी होते, त्यांना पत्र दिले. सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलून आठशे झाडांची तोड होते, याचा अर्थ काय? या कलेक्टरला जिल्ह्यात काय चालतं, याची माहिती नाही? ते आपले भिंतीवर साक्षरतेच्या पाट्या रंगवत बसलेत. कमिट्यांच्या मिटींगा घेत बसलेत? हे सगळं भोपाळच्या इंग्लिश वर्तमानपत्रात आलं. बस्तरचे कलेक्टर परवीर कृष्ण आणि हिरेमठ यांचं बिनसलं होतंच. मागच्या वेळी मी गेलो तेंव्हातर वाकयुद्धच जुंपल. मी या युद्धातला अम्पायर म्हणून काम केलं. ती झाडं गेली याचं त्या कलेक्टरला काही दु:ख नव्हतं. आपण कसे त्याला जबाबदार नाही, हे जोरजोरात पटवायचा प्रयत्न ते करत होते."
पुढचे आमचे गाव होते बिंजोली. हे नायडूंच्या पत्रातले नव्हते. हिरेमठांनी आणखी कांही प्रकरणांची भर घालून लोकायुक्त चौकशीत घालायला लावली होती. बस्तरच्या नकाशात कांकेरवरून खाली जगदलपूरकडे जाणा-या रस्त्यावर कोंड्गाव नावाचे मोठे गाव आहे. तिथून पूर्वेकडे ओरिसा बॉर्डरकडे जाणा-या रस्त्याला लागलो. दुपारची उन्हे कलली होती. आणि हळूहळू मोठी झाडे दिसू लागली. मधून मधून शेताचे पट्टे लागत; पण नंतर परत जंगलाचा भाग सुरु होई. इतका वेळ बस्तरमध्ये आल्यापासून जंगल असे जाणवलेच नव्हते. मोठी झाडे होती; पण ती विरळ होती. ती हळूहळू दाट होत चालली. अशा अनेक झाडांच्या सावलीतल्या एका छोट्या गावात पोचलो.
तिन्हीकडून एकमजली कौलारू घरे आणि मध्ये छोटे आवार असलेली जागा होती. तिथल्या खाटेवर आम्हाला बसवले. सगळे ओट्याओट्याने खाली बसले. ओरिसात एक महाराज आहेत. त्यांचे इथे कांही शिष्य आहेत. त्यांनी भगव्या रंगात बुचकळलेले विरविरीत कपडे घातले होता. समोरच्या बाजूला कांडण चालले होते. एक बाई तांदळाची साळ कांडत होती. पण हि पद्धत मी प्रथमच पाहत होतो. एक आडवे मोठ्ठे लाकूड. त्याला मध्याच्या एका बाजूला मध्ये लाकडी फ्रेम बसवलेली. मध्ये लोखंडी एक्सल होता. ती बाई आखूड भागावर पाय देऊन उभी राहिली, की लाकडाचा तांबडा भाग वर येत असे. त्याला खाली लोखंडी छोटे मुसळ. या बाजूवरचा पाय काढून घेतला की ती बाजू खाली यायची आणि मुसळ जमिनीतल्या उखळावर आदळायचे. तिथे भाताच्या साळीचा ढीग होता. दुसरी बाई त्या उखळाच्या दिशेने ती साळ सरकवत होती. वरून येणारी कांब तिला लागेल का, अशी भीती वाटून जात होती.
समोरच्या ओट्यावर पूर्ण नागडे, धुळीने भरलेले मूल येऊन बसले. त्याने हातात मात्र प्लास्टिकचे मोठे घड्याळ घातले होते. मी या भारताच्या सुपुत्राचा फोटो काढला तेंव्हा इतरांना गंमत वाटली. शिवचरणने आमचे येण्याचे कारण सांगितले. ज्याच्या जमिनीचे प्रकरण होते तो त्या गावाचा पाटील होता. त्याला बोलावणे पाठवले; पण खूप वेळ झाला, कुणी दोनदा बोलावून आले, तरी तो येईना. मग दुस-याच म्हाता-याने हकीकत सांगितली.
त्या पाटलाकडे ध्रुव नावाचे तहसीलदार यायचे. त्यांची त्याला सरबराई करावी लागायची. एके दिवशी त्याने पाटलाच्या जमिनीतली झाडे बघितली, तसे त्याच्या तोंडाला पाणी सुटले. प्रेमलाल जैन हे व्यापारी त्याच्याबरोबर येऊ लागले. बृहस्पती हा त्यांचा दोस्त. या पाटलाला ते जमीन विकत मागू लागले. पाटील तयार होईना; पण तहसिलदारापासून सगळ्यांनी दबाव आणला: "आपकी जमीन नाही लुंगा, सिर्फ पेड चाहिये." नुसती झाडे तोडता येत नाहीत म्हणून जमीन घ्यावीच लागते. म्हणून पंचवीस हजार रुपये दिले आणि बृहस्पतीच्या नावे जमीन लिहून घेतली.
"किती झाडे असतील?"
म्हाता-याने सांगितले, "एकशे पंचाहत्तर सागवानाची झाडं."
मनात म्हटलं, म्हातारा शिकलेला दिसतोय.
"त्यांचा घेर किती होता?"
त्याने हाताने दाखवले. तीन-चार फूट व्यासाची असावीत. ती झाडे 'गर्डल' केली. [
'गर्डल करणे' हा शब्दप्रयोग अशिक्षित आदिवासीपर्यंतही गेलाय. जे झाड पडायचे ते आधी मारून टाकतात. त्याला तळात कु-हाडीने खाचा घेतात. सहा महिन्यात ते पूर्णपणे वाळले की मग ते कापतात.]
त्या भागातले एक झाड म्हणजे लाख रुपयांचे असते. म्हणजे या झाडांचे १७५ लाख आले असणार. बाप रे! अगदी निम्मे आले तरी पन्नास-साठ लाखांची लूट झाली. मालकाची फक्त २५ हजारांवर बोळवण! नंतर हि फसवणूक झाल्याची लक्षात आल्यावर 'बृहस्पती हा आदिवासी नाही. हा जमिनीचा व्यवहार रद्द व्हावा' असा कोर्टात दावा लावल्यानंतर बृहस्पतीने आपण आदिवासी असल्याचे {यांच्या मते बोगस} सर्टीफिकीट दाखल केले आहे.
शहरात जर एखादा १ कोटी ७५ लाखांचा दरोडा पडला तर केवढा गाजावाजा होईल! पोलीस-यंत्रणा राबेल. आज ना उद्या टोळी उघडकीला येईल. इथे एवढा दरोडा राजरोस, तहसिलदाराच्या मध्यस्थीने घातला जातो, तरी मालकाला कुठे तक्रार करता येत नाही. आणि असे दरोडे तर बस्तरभर चालू आहेत.
शेवटपर्यंत तो पाटील पुढंच आला नाही. त्याच्यावर त्या लोकांचे खूप दडपण आले असणार. एवढे घडूनही समोर येऊन तक्रार सांगायची हिंमत नाही. काय परिस्थिती आहे!
परत जायला निघालो.
थंडीला सुरुवात झाली होती. गाडीच्या जवळ अनेक छोटी उघडी मुले जमली होती. मोटारीचे अप्रूप होते. समोर एक हापसा होता. एक आदिवासी स्त्री हापशावर पाण्याला उभी होती. तिची छोटी मुलगी हौसेने दांड्यावर सर्वांगाचे वजन घालून पाणी काढायचा प्रयत्न करत होती. आई कौतुकाने तिला ते करू देत होती.
गाडीने वळण घेतले तसे आम्ही एका जागी थबकलोच. एका प्लॉटमध्ये अशा गर्डल केलेल्या झाडांची फौजच उभी होती. ती झाडे उंच होती. घेर तीनचार फुटांचा असेल. त्यांच्या पायाला एका बाजूने खाचा पाडलेल्या होत्या. त्या झाडांची साले, पाने कधीच गळून गेली होती. आतला उघडा पडलेला भाग पांढरट निस्तेज रंगाचा दिसत होता. मागे चीनमध्ये मृत सैनिकांचे पुतळे सापडले. त्यांचे फोटो पाहिले होते. त्यासारखेच हे वाटले. हे कोणी केले कळायला मार्ग नाही. निसर्गाने झाडांना प्रतिकार करण्याचे काही तरी अस्त्र पुरवायला हवे होते, असे वाटले.
परत कोंडागावाला आलो.
आता हायवेने पुढे जगदलपुरला.

संकलन:प्रवीण कुलकर्णी

बस्तरचे अरण्यरुदन: अनिल अवचट :६


० ६ ०
भोपाळच्या सेमिनारमध्ये दिल्लीची नलिनी सुंदर ओळखीची झाली. तिने बस्तरवर रिसर्च करून पुस्तक लिहिलंय. तिने मला जगदलपूरजवळच्या 'आसना' या गावातल्या इक्बाल व कार्यकर्त्या मित्राची गाठ घ्यायला आवर्जून सांगितले होते. आम्ही त्या रात्री त्यांचे घर शोधून काढले. दुमजली कौलारू घराचा त्रिकोणी माळा असतो ना, तशा माळ्यावर तो रहात होता. सावळा, केस वाढवून मागे रुळताहेत असा, पस्तीशी-चाळीशीतला जर्किन-पटमधला माणूस. त्याला दुस-या दिवशी
जगदलपूरमध्ये भेटायला सांगितले आणि मुक्कामाला जगदलपूरला गेलो. पुढच्या दोन गावात इक्बाल आमच्याबरोबर होता.
जगदलपूर छोटेसे शहर आहे. एक लांबच लांब मध्यवर्ती रस्ता. त्याला समांतर दोन रस्ते आणि त्यांना छेद देणारे काही आडवे रस्ते. त्या गावात पावलोपावली एस.टी.डी. बूथ आहेत. एवढे बूथ या छोट्या गावात कशाला, हा प्रश्न मी अनेकांना विचारला. एकाने हे व्यापारी गाव आहे म्हणून सांगितले. दुस-याने सांगितले, की हा आदिवासी जिल्हा आहे. इथे अग्रक्रमाने सवलतीत बूथ मिळतात म्हणून. पण एवढे खरे, की हिरेमठांची अशा गावात चंगळ होणार. विटांची लांबच लांब भिंत आणि वेशीसारखा दरवाजा, म्हणजे इथला राजवाडा. प्रविरचेंद्र भंजदेव या राजाला इथेच मारले गेले होते.
सरकारी ऑफिसच्या, पी.डब्ल्यू.डी. ने बांधलेल्या ठोकळेबाज इमारती एका बाजूला. मधून मधून पेरलेली अगदी भडक आर्टीटेक्चरची तारांकित[?] हॉटेले. मधल्या रस्त्यावर आदिवासींकडून करून घेतलेल्या कलावस्तूंची दोन-चार दुकाने. इक्बालची मैत्री व्हायला काही वेळ लागला नाही. नंदिनी हा आमच्या बोलण्यातला दुवा होताच. त्याचा इतिहास आमच्या बोलण्यातून हळूहळू समजत गेला. तो नागपूरचा. एम.ए.झालेला. मिलिटरी अकाउट्स मध्ये नोकरी होती. या भागात [बहुधा बांगला निर्वासितांच्या कामासाठी] त्याची बदली झाली. दोन वर्ष इथं होता. त्याने भूगोलाच्या वाचले होते बस्तर, तिथले आदिवासी, त्यांची संस्कृती वगैरे. इकडे आल्यावर तो नोकरीच्या वेळाव्यतिरिक्त तो बस्तरच्या आतल्या भागात भटकू लागला. तिथले बाजार बघू लागला. आदिवासी लोक चिंच, चारोळी असे काय काय विकायला आणायचे. व्यापारी मोठाल्या वजनात ते घ्यायचे. माल द्यायला नकार दिला तर अक्षरश: जबरदस्तीने ओढून न्यायचे. आदिवासींचे सर्व बाजूंनी होणारे हे शोषण पाहून त्याला इथेच राहून काही करावेसे वाटू लागले.
तो म्हणाला, "माझी १४ वर्ष सर्व्हिस झाली होती. परत बदली झाली तर नोकरी सोडून इथंच राहायचं ठरवलं. मित्र म्हणत होते, "तू करणार काय? खाणार काय? त्यापेक्षा आणखी सहा वर्ष थांब. वीस वर्षानंतर नोकरी सोडलीस तर पेन्शन सुरु होईल." पण अगर उस लालच में मैं पडता तो कभी नाही इधर आ सकता." आणि काही प्रश्न इतके तीव्र होत चालले होते, की त्या घटना तिथेच थांबवल्या नाहीत, तर कायमचं नुकसान होणार होतं. म्हणून इथं असतानाच नोकरी सोडली आणि मागचे सगळे आधार तोडून टाकले.
त्याचे तिथल्याच कलावती नावाच्या आदिवासी स्त्रीशी प्रेम जमले आणि लग्नही झाले.
"घरी नागपूरला कळवलंच नाही. नंतर मुलगी झाली तेंव्हा मुलीसह गेलो." त्याच्या लग्नाचे समजल्यावर सगळे म्हणाले, "ये तो पागल बन गया." आणि मुलगी दाखवल्यावर म्हणाले, "ये तो पुरा पागल बन गया है." मुलगी पाहून आई विरघळली आणि तिने यांना प्रथम स्वीकारले; मग बाकीच्यांनी. आता इक्बाल-कलावतीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. सुटी लागल्या लागल्या मुले नागपूरला पळतात.
इक्बाल म्हणाला, "लग्नानंतर नोकरी नव्हती. मी फ्री लान्स पत्रकार म्हणून काम करू लागलो. पण त्यात पैसे किती मिळणार? घरात अन्नाचा कण नसायचा. मी कालावतीकडून खूप शिकलो. भूक अंगावर काढायला शिकलो. घरात खायला काही नसलं की कलावती मला घेऊन जवळपासच्या जंगलात जायची. तिला जमिनीखाली कंद कुठं असतात, वरून कसं ओळखायचं, ते माहित असायचं. आम्ही कंद काढून आणायचो. पहिल्यांदा पाण्यात घालून कंद उकडला आणि त्याचा पहिला तुकडा मी खाल्ला, त्या क्षणी मला वाटलं की, मी कशाला इथं आहे? हे सगळं सोडून परत जावं नागपूरला. पण नंतर त्याची सवय होत गेली. आदिवासींकडे प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्याची कला असते, जिद्द असते. आपण ती हरवून टाकली आहे. तिच्याकडून मी खूप काही शिकलो."
नंदिनी नंतर त्याच्याबद्दल सांगत होती, की कोणी आदिवासी काही प्रश्न घेऊन आला की ही दोघे निघतात. कला आपल्या ट्रायबल ड्रेसमध्येच सायकलवर फिरत असते. ही दोघे कधी सायकलवर पन्नास-साठ किलोमीटर जाऊन आदिवासींची गा-हाणी ऐकतात. त्यांना जगदलपुरला घेऊन येतात. अधिकार-यांपुढे घेऊन जातात. प्रेस-कान्फ्रंस घेऊन ते प्रकरण मांडतात. कलावतीने जंगल कामगार सोसायट्या केल्या आहेत. सायकलवर फिरून त्यांचा कारभार बघते.
ही दोघे असे फिरत असल्याने जंगल तुटत असल्याचे त्यांना पटकन कळते. इक्बाल त्याचे फोटो काढतो. प्रसिद्धीला देतो. फारेस्टवाल्यांकडे निवेदने देतो.
एका दुपारी त्याने घरी जेवायला बोलावले होते. कलावती मागे गाठ मारलेली आदिवासी साडी नेसलेली. दोन्ही नाकपुड्यावर चांदीच्या मोठ्या नक्षीदार टिकल्या. दंडात, पायात वाक्या, जोडावी. नुसती हसत होती. माझ्याशी बोलण्याचा प्रश्नच नव्हता. काही विचारलेच तर, "हा-नाही" एवढे उत्तर देऊन छान हसायची. आमच्यासाठी डाळ-भात असे जेवण केले होते. मुले, ती दोघे, मधुकर यांच्यासह जेवताना खूप छान वाटू लागले.तो डाळ-भात म्हणजे जगातला सर्वात सुग्रास पदार्थ वाटू लागला.
नंदिनी याच घरात तिच्या रिसर्चसाठी आली तेंव्हा उतरली होती. ते आठवले. तिचे कौतुकही वाटून गेले. नंदिनीमुळे दिल्लीला आता इक्बालविषयी संबंधिताना माहित झालेय. त्यामुळे रिसर्च वर्कर्स आले, की हा त्यांना बस्तरमध्ये फिरण्यास मदत करतो. त्याचा काही मोबदला याला मिळतो. परवा 'सुरभी' च्या लोकांना आदिवासींच्या गोंदवण्यावर छोटी फिल्म करायची होती म्हणून ते आले होते. त्यानाही हा खेड्यात घेऊन गेला होता.
त्याचे कलावती-मुलांबरोबर फोटो काढले. नंतर म्हणत होता, "या मुलांविषयी मला जरा काळजीच वाटते. त्यांच्यावर नागपूरचा इफेक्ट जास्त वाढतोय. हे सुटीत गेले की सगळे त्यांचा लाड करतात. कपडे घेतात. पिक्चरला नेतात. त्या लाइफची आवड लागली, तर ते आम्हाला कसं झेपणार? परत ते त्याच चैनी संस्कृतीचे भाग होणार."
त्याच्याबरोबर दोन गावाला गेलो. एक मार्केल आणि दुसरे कुरुंदी. मार्केलमध्ये आदिवासींचा प्रश्न नव्हता. दलितांचा होता. कालू महारा, थिओ महारा अशी त्यांची नावे. वस्तीत जाऊन बसल्यावर जाणवले, की त्यांची घरे, त्यावरची नक्षी, चित्रे, तिथल्या बायकांचा वेश हे सगळे आदिवासींसारखे. ते भद्री भाषा बोलतात. मला समाजशास्त्रज्ञ एम.एन.श्रीनिवासांच्या 'संस्कृतायझेशन' या शब्दाची आठवण झाली. त्या लोकांना सरकारने पट्ट्याने जमीन दिली होती. हे लोक शेतमजूर. 'लुनिया' या जगदलपूरच्या व्यापा-याने इथल्या २६ जणाची ८१ एकर जमीन, तिची बाजारभावाप्रमाणे किंमत ५० लाख रुपये इतकी आहे. ती १८ हजारात घेतली. [ती अतिशय सुपीक जमीन आहे आणि जगदलपूरच्या जवळ आहे.] प्रत्यक्ष त्यांतले १५ हजार दिले आणि २६ जणांना लुना दिल्या. तिथला माणूस म्हणाला, "उसमे डालने को पेट्रोल कहा से लाये? सब लोंगोने बेच दिया."
नायडूंच्या पत्रात या प्रकरणाचा उल्लेख आहे. या जमिनीत लुनियांनी निलगिरीची लागवड केली आहे. निलगिरी वाढवून ओरिसातल्या पल्प फकट्रीजना विकायची, असा त्या वेळी ट्रेंड आला होता. अडिशनल कलेक्टरपुढे हे प्रकरण येताच सरकारने दलिताना दिलेली जमीन विकता येत नाही, या कायद्याप्रमाणे हे खरेदीखत रद्द ठरवले. लुनियांनी [विभागीय कमिशनर] नारायण सिंगांकडे अपील केले. त्यांनी लुनियांच्या बाजूने निकाल दिला. त्याला कारण दिले, की लुनियांनी त्यासाठी बँकलोन घेऊन झाडे लावलीत. नायडूंनी या "एक्स्ट्रा-लीगल' तकलादू कारणावर कठोर टीका केली आहे.
कुरुंदी गावापासून आम्हाला लुनियांचे, नेतामांचे दडपण जाणवू लागले. ज्यांच्यावर अन्याय झाला तेही बोलेनासे झाले. आम्ही तिथल्या लोकांसमोर बसलो. ते हुं कि चू करीनात. प्रश्न विचारला तर जेवढ्यास तेवढे उत्तर. इक्बालने, शिवचरणने खूप बोलते करायचा प्रयत्न केला; पण नाही. त्यांची अशीच मोठी जमीन लुनिया फमिलीने स्वस्तात घेतली. त्यातला वयस्क माणूस म्हणाला, "आम्ही त्यांच्याकडे दागिने गहन ठेवून पैसे आणले. आता आम्ही ते पैसे परत केलेत." एवढे वाक्यच तो परत परत बोलला. एकीकडे राग येत होता आणि एकीकडे दु:खही वाटत होते. शेवटी बडे गुड्राला जाणार होतो; पण त्याआधी जगदलपूरमधल्या शरच्चंद्र वर्मांना भेटायचे ठरवले.
पुण्याची मैत्रीण उषा पागे जगदलपूरला रेडीओ-स्टेशनची डायरेक्टर म्हणून काही काळ होती. तिने मला त्यांचा पत्ता दिला होता. त्यांचे नाव काढताच इक्बाल म्हणाला, "ते माझे इथले गुरूच आहेत. आम्ही बरोबरच काम करतो."
वर्मांनी नाश्त्यालाच बोलावले.
त्यांचा 'बस्तर सोसायटी ऑफ कान्झार्वेशन ऑफ नेचर' [बस्कान] नावाचा ग्रूप आहे. वर्मा रिटायर्ड झालेले शिडशिडीत गृहस्थ. पांढ-या बारीक कापलेल्या मिशा. त्यांनी उषाची चौकशी केली. या विषयावर आमचे बोलणे सुरु झाले. तशी त्यांच्या , मनातली या विषयातली तळमळ व्यक्त होऊ लागली.
ते म्हणाले, "बस्तरमध्ये जंगल आहे कुठे?आता फारेस्टवाले सारखे वनीकरणाच्या गोष्टी करतात.; पण मूळ जंगलाचं का रक्षण केलं नाही? जंगल ऑफिसर जंगलमे रहाताही नही! जंगल एक खुला खजाना है ऐसे बोलते है, तो फिर शहरमे क्यो बैठते है? इधर ब्रेकफास्ट लेते है, उधर चक्कर लगाकर रातमे डिनरके लिये यहां वापस. हे जे जंगलावर आक्रमण चाललाय ना, त्याला यांचंच प्रोत्साहन आहे. कोणी पैसे देतं कोणी कोंबडी देतं. या सगळ्यांची कोणी सुरुवात करून दिली? अकबराच्या काळात जबलपूरच्या दक्षिणेचा सर्व भाग म्हणजे ज्यात शिरकाव करता येणार नही असं जंगल होतं. आदिवासींचा जंगल हा सर्वात शेवटचा सहारा आहे. आणि आता केवळ वाळवंटीकरण चालू आहे. त्यांनी कुठं जायचं? शासनाची मानसं याबाबत अगदी बेफिकीर आहेत. ती ठरलेल्या रस्त्यानं जातात. आणि त्याच रस्त्यानं येतात आणि म्हणतात, 'जंगल टूट गया, अब हम क्या करेंगे?' आदिवासींच जीवन केवढं खडतर झालंय! आपण म्हणतो,की जंगल में मंगल, ये मंगल हमारे लिये, उनके लिये नही."
मी विचारलं, "साल बोअररचं जे प्रकरण झालं होतं, ते काय होतं?"
ते म्हणाले, "साल इथल्या अगदी वैनगंगेपर्यंतच्या जंगलातली प्रभावी जात आहे. आमचे फोरेस्टवाले साल वृक्षांना सवतीच्या मुलासारखं वागवतात. त्यांना साल तोडून साग किंवा निलगिरी लावायची फार घाई झालेली असते; उत्साह असतो. [वास्तविक सागाखालोखाल सालच्या झाडाचे लाकूड चांगले.] निलगिरीच का? तर त्यातला सेल्युलोज एक्स्पोर्ट करता येतो. साल बोअरर काही आज आलेला नाही, तो असतोच; पण सुप्रीम कोर्टाची स्टे ऑर्डर आली. सगळ्यांचेच हात बांधले गेले. मग हा साल बोअरर बरोबर बाहेर निघाला."
"ते असं म्हणतात, की त्यासाठी आसपासची बरीच झाडं तोडवीच लागतात. खरं आहे का हे?"

इक्बाल म्हणाला, "छे: छे:! त्याचं निमित्त करून लाखो झाडं तोडली. या छत्तीसगड भागातली तीन एक लाख झाडं तोडली. लोकांनी, पेपर्सनी खूप आरडओरड करून ती तोड थांबवली. आमचे फारेस्ट मिनिस्टर शिव नेताम म्हणाले, "याला स्टे आला नसता तर आणखी दुप्पट झाडे तोडणार होतो."
"पण याला उपाय काही नाही का?"
वर्मा म्हणाले, "पावसाळ्यात झाडाचा सप बाहेर येतो. तेंव्हा हा किडा त्याकडे आकर्षिला जातो व बाहेर येतो. तो धरून मारणं हाच इलाज आहे. अब देखिये, ये फारेस्ट के लोग बारीश के दिनो में घरमे बैठना जादा पसंत करते है! बारीश में जंगलमे जाकर कौन किडे पकडेगा?"
वर्मा, इक्बाल आणि मित्रांनी जंगलावरचे एक मोठे संकट टाळलेय. दिल्लीच्या फारेस्ट तज्ञांच्या डोक्यात आले, या भागात ट्रोपिकल पाईनची लागवड करावी. पाईन वृक्ष हे हिमालयाच्या पायथ्याशी थंड वातावरणात वाढणारे, पण उष्ण कटिबंधातली पाईनची जात इथे रुजली तर? फतवे गेले. बस्तरच्या अधिका-यांनी टेस्ट घेण्यासाठी जंगलाचा चांगला पच आधी साफ केलं. झाडे तोडण्यात आपल्याला नेहमीच उत्साह. आणि तिथे पाईनची रोपे लावली. पाईनची झाडे एकाच वेळी कापायला येतील, अशी सर्व सोय पहिली होती. ते साफ्टवूड असल्याने त्याचा पल्प एक्स्पोर्ट करता येईल. या '
स्कान' ग्रूपने या सगळ्या योजनेला विरोध केला. दिल्लीपासून सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या छापून आणल्या, तेंव्हा कुठे हा प्रकल्प बारगळला. हा विरोध झालं नसता तर बस्तरचे उरलेसुरले जंगलही साफ झाले असते. वर्मा म्हणाले, "हम गरीब तो थे, लेकीन अब कंगाल बन गये याने 'मेंटली' कंगाल हो गये."
जंगलाकडे फक्त 'लाकूड देणारे जंगल' म्हणून का पहायचे? , असा त्यांचा प्रश्न मला वेधक वाटला. मायनर फोरेस्ट प्रोड्यूस ज्याला म्हणतात त्याला कमी का लेखता? आवळा, हिरडा, बेहडा, चारोळी, साल-बिया, किती तरी औषधी वनस्पती-यांच्याकडे आपण खूप दुर्लक्ष केले. 'सर्पगंधा' हि हृद्यविकाराच्या औषधासाठी लागणारी वनस्पती पूर्वी बस्तरमध्ये जागोजाग दिसायची. आता ती दिसेनाशी झाली आहे. त्यांचे प्लांटेशन फारेस्ट डिपांर्टमेंट हातात का घेत नाही? मोठी झाडे कायम ठेवून तुम्हाला मायनर फारेस्ट प्रोड्यूस जंगलाला डिस्टर्ब न करता मिळवता येतील, आदिवासींचे हित त्यात पहिले जाईल.
"एका बाबतीतल वरदान हे दुसऱ्या बाबतीतला शाप कसा असतो पहा." वर्मा म्हणाले, "आदिवासी का दुर्भाग्य है, कि इस भूमी के मिचे तऱ्ह तऱ्ह के मिनरल्स है- लोखंड, बॉक्साईट, डोलोमाईट, टीन, माणिक, कॉरान्डम, हिरे, युरेनियमसारखे थोरियम असे. दक्षिण बस्तरमध्ये माती खणून चाळून टीनचे दगड बाहेर नेले जातात. तोम पाल नावाचं एक अगदी छोटं झोपलेलं गाव होतं. तिथं टीनची खाण सुरु झाली. तिथं आता एवढी वस्ती वाढलीय, की तिथल्या पोलीस-स्टेशनला बदली मिळावी म्हणून पोलीस अधिकारी लाखो रुपये मोजतात. राजस्थान, यु. पी. हून सगळे लोक आलेत आणि तिथं बकाल वस्त्या झालेल्या आहेत. आता तिथं तुम्हाला एकाही आदिवासीचा मागमूस सापडणार नाही."
नंतर मला पुण्याला शिवाजीराव किरदत्त नावाचे रायपूरला शेती करणारे गृहस्थ भेटले. आमच्या धोंडेसरांचे ते मित्र. ते या खानिजांबद्दल आणि बस्तरच्या जंगलावर येणा-या दडपणाबद्दल सांगत होते. इथली आयर्न ओअर [लोखंड ज्यातून निघते ती दगडमाती] जगातली सरोत्तम ओअर आहे. लोखंडाचे प्रमाण ऐंशी टक्के म्हणजे 'हायेस्ट इन द वर्ल्ड' आहे. आदिवासी नुसत्या भट्टीत दगड घालून लोखंड करतात, अवजारे बनवतात. जपान्यांनी ती लोहामती नेण्यासाठी बस्तरमधल्या बेलाडेला खाणीपासून ते थेट विशाखापटणमपर्यंत ६०० किलोमीटरचा ब्रॉडगेज लोहमार्ग बांधला. न जाणो केवढे जंगल त्यासाठी तुटले असेल. त्यासाठी मजूर आले, वस्त्या झाल्या, बिजलीचे टॉवर आले. खाणींमध्ये खनिज धुतात. त्याचे नाले होतात. जमिनीतली माती वाहून जाते. तीस वर्षापूर्वी हा लोहमार्ग बांधला. हि इनस्टंट कोकण कोकण रेल्वेच' आहे; पण हा लोहमार्ग फक्त आर्यन ओअरसाठीच होता.दिवसातून दोन आगगाड्या जात होत्या आणि दोन रिकाम्या परत येत होत्या. एकेका गाडीला सहा डीझेल इंजिने लावावी लागायची. शंभर डब्यांची गाडी होती. विशाखापट्टण बंदरात बोटीत ओअर भरण्यासाठी automatic लोडिंग प्लांट बसवला होता.
त्यांनी व धोंडेसरांनी हिशेब करायला सुरुवात केली. एका डब्यात पन्नास टन म्हणजे गाडीत ५००० टन, अशा दोन गाड्या म्हणजे १० हजार टन....रोजचे. असे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस. अशी वीस वर्ष. बाप रे! इतकी शून्ये वाढत चालली की शेवटी ते म्हणाले, "ऐसा समझीये, एक पूरा पहाड ले गये."
बस्तरच्या जंगलावर येणा-या दडपणाबद्दल ते सांगत होते, "बांगला देश व्हायच्या आधीपासून अनेक हिंदू निर्वासित आले. त्यांना कुठं वसवायचं? बाकीचे प्रांत विरोध करतात. बस्तर सब लोगोंके के लिये बहुत अच्छी जगह है. दिल्लीवाले तो ऐसे एक्स्पेरीमेंट के लिये हमाराही चोईस करते है. त्यांच्या वस्त्या झाल्या. त्यांच्यासाठी जंगलतोड झाली. त्यांनी आल्यावर आजतागायत ती चालूच ठेवली आहे. दुसरं, रेल्वेसाठी आता आता सिमेंटचे स्लीपर्स आले. परवापर्यंत लाकडाचे स्लीपर्स होते. सर्व भारतातल्या लोहमार्गाच्या स्लीपर्सपैकी पंचवीस टक्के गरज बस्तर भागवत होता."
परत धोंडेसरांची गणिते सुरु! भारतातील एकून लोहमार्ग ६०,००० किलोमीटर आहे. एका स्लीपरचा साईज काय असतो, त्यावरून एका किलोमीटरला २००० स्लीपर्स लागतील. म्हणजे एकूण बारा कोटी स्लीपर्सची गरज. एका स्लीपरला चार घनफूट लाकूड लागते. म्हणजे ४८ कोटी घनफूट लाकूड. बरे, जुन्या झालेल्या स्लीपर्स बदलाव्या लागतात. समजा, दहा वर्षांनी बदलतात. एका झाडात पाच स्लीपर्स निघतील. म्हणजे वीस लाख झाडे दरवर्षी लागत होती. ७० किलोमीटर बाय ७० किलोमीटर दर वर्षी उध्वस्त! धमतरीला मोठा डेपो होता. रायपूरहून धमतरीला फक्त स्लीपर्स आण्यासाठी लोहमार्ग टाकलाय. बाप रे!
किरदत्त म्हणाले, "आता जपानच्या त्या लोहमार्गावर पसेंजर गाडी सुरु आहे. मायबाप सरकारनं आमच्यासाठी कधी रेल्वे केली नाही, पण एवढी भयानक किंमत देऊन हि रेल्वे लाईन आम्हाला मिळालीय."


संकलक:प्रवीण कुलकर्णी



हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....