Wednesday, 13 June 2012

शिवसेना.....इतिहास.....१९६६ ते २००९..........

Sunday, 3 June 2012

अजिंठा :- ना.धों.महानोर

अजिंठा 

शेताभातात रानाउन्हात रमलेली महानोरांची कविता. 'ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे' इतके निसर्गाशी तादात्म्य पावलेले हे मन.
'अजिंठा' हे महानोरांच्या कवितेचे वेगळे वळण. ही एक सलग दीर्घ कविता आहे. कथात्म बाजाची. अजिंठ्यातील भव्य शिल्पांच्या साक्षीने घडलेल्या मेजर गिल आणि पारूच्या प्रेमकथेचा हा काव्यात्म अविष्कार. पारूच्या रुपाने अजिंठ्यातील शिल्पे मेजर गिल समोर सजीव झाली. पारू त्याच्या चित्रांची प्रेरणा ठरली. पण पारूभोवतालच्या आडवळणी समाजाला त्यांच्या प्रेमकथेची भाषा समजू शकली नाही. आणि गिलचे आयुष्य औदासिन्याने झाकोळून गेले. 
या कथेच्या निमित्ताने महानोरांच्या प्रतिभेला नवा बहर आला आहे. 'मी माझ्या मुलुखात नांदतो ऐश्वर्याचा राजा / इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा ' हा आत्मविश्वास सार्थ ठरवणारा हा बहर आहे. 


प्रस्तावना 

अजिंठ्याची  लेणी म्हणजे अलौकिक सौंदर्याने शिगोशिग भरलेली एक स्वप्नशाला. विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या आणि संसाराच्या पैलथडीला गेलेल्या बुद्धाचे स्तवन-पूजन करण्यसाठी ही लेणी कोरण्यात आली. पण असामान्य कलावंतांची प्रतिभा सहसा एकसुरी,  एकदेशी असत नाही. तिच्या खास आकर्षणाचे केंद्रस्थान कोणतेही असले तरी त्या स्थानाच्या अनुषंगाने ती अशेष जीवनाचाच शोध घेण्याचा प्रयत्न करीत असते. म्हणून बुद्धाला वाहिलेल्या या लेण्यांत मानवी किंबहुना सृष्ट जीवनाची सर्वच अंगे अतिशय कलात्मक रूपांत प्रकट झाली आहेत. बुद्धाने संसाराचा त्याग केला म्हणजे केवळ एका घराचा, एका पत्नीचा वा एका मुलाचा त्याग केला असे नाही.  या संसाराच्या सभोवार सर्वदूर पसरलेल्या लक्षावधी संदर्भांचा, त्यातील सौंदर्याचा, सुखदु:खांचा, भावबंधनांचा आणि मानसिक प्रवृत्तीचाही त्याने त्याग केला. बुद्धाची महात्मता या सर्व संदर्भांसह चित्रित करण्याचा प्रयत्न असंख्य कलावंतांनी येथे केलेला आहे. ज्यांची नावनिशाणी आज शिल्लक नाही, अशा या कलावंतांनी पाषाणातून आणि पाषाणावर निर्माण केलेल्या या कलाकृती शिल्पकलेच्या आणि चित्रकलेच्या इतिहासात अजोडच असतील.
अशा  या अजिंठ्याच्या परिसरामध्ये,  किंबहुना त्याच्या गाभाऱ्यामध्ये, गेल्या शतकात एक हृद्यस्पर्शी शोकांत नाट्य घडलेले आहे. अजिंठ्यातील पाषाणमय देवतांनी यक्षगंधर्वांनी भावनिर्भर दुष्टीने या घटनांकडे उत्कंठतेने पहिले असेल आणि त्यांचा अखेरचा पडदा पडल्यावर आपल्या पापण्याही पुसल्या असतील. मुळात चित्रकाराची प्रतिभा असलेला, पण सैनिकी पेशा स्वीकारून भारतात आलेला मेजर रॉबर्ट गिल, आणि फिरस्त्या बंजारा जमातीतील एक रूपवान तरुणी पारू, यांच्या अलौकिक परंतु असफल प्रेमाची ही कहाणी आहे. पश्चिमेकडील सुसंस्कृत प्रतिभा आणि पूर्वेकडील एक अनागर, जमिनीतून वर आलेल्या हिऱ्यासारखे झळझळीत स्त्रीत्व यांचे मिलन या कथेत आहे; आणि बर्बर समजुतींनी या दोन जीवांचा केलेला संहारही आहे. अजिंठ्याच्या पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या, या परिसराशी एकात्म झालेल्या ना.धों.महानोरांसारख्या प्रतिभावान आणि निसर्गातील सौंदर्याचे सूक्ष्म, तरल झंकार आपल्या काव्यातून प्रकट करणाऱ्या कवीला, या गिल-पारूच्या कथेने आपल्याकडे ओढून घेतले नसते तरच नवल. काळाच्या प्रवाहात माणसांच्या संस्कृतीचे बह्यावरण बदलते. आपण सनातन मानतो अशी कांही मूल्येही बदलतात, किंवा वेगळ्या रूपांत विसर्जित होतात. आणि तरीही असे काही शिल्लक राहते, जे सर्वकाळच्या कवींना, कलावंतांना आवाहन करीत असते. महानोरांसारख्या संवेदनशील कवीने हे आवाहन स्वीकारून मराठी काव्याला एक सुंदर देणगी दिली आहे. 
रविकिरण मंडळाच्या काळात कथात्मक काव्यांना बहर आलेला होता. सुधारक, बंदिशाला, आमराई यांसारखी रसिकमान्य झालेली खंडकाव्ये आघाडीच्या रविकिरणांनी लिहिलेली आहेत. परंतु, महानोरांचे 'अजिंठा' हे काव्य त्या प्रकारातील नाही. एखादे काल्पनिक कथानक घेऊन त्यात कादंबरीसारखे पण काव्यात्म तपशील भरत  जाणे हे खंड्काव्याचे प्रमुख लक्षण. 'अजिंठा' मध्ये कथानक सांगणे वा प्रकरणश: उलगडून दाखवणे ही कवीची प्रतिज्ञाच नाही. येथे कवीने गिल-पारूच्या कथेतील स्वतःची गुंतवणूकच प्रकट केली आहे. म्हणून खंड काव्यात कवी जी निवेदकाची तटस्थ भूमिका घेतो ती येथे नाही. अजिंठ्याच्या डोंगरदऱ्यात विखुरलेली ही घटना कवीच्या मनात राहायला आली, तेथे ती कमलपुष्पासारखी अनेक पाकळ्यातून उमलली आणि त्याच्या भावसंवेदना आपल्या कब्जात घेऊन अखेर त्याचीच झाली. अशा एका पूर्णतः भरून गेलेल्या आणि भारावलेल्या मन:स्थितीत महानोरांनी ही दीर्घ कविता लिहिली आहे, हे सहज लक्षात येते. रॉबर्ट गिल अजिंठ्याच्या दर्शनाने झपाटून गेला होता. खांद्यावरची बंदूक त्याने बाजूला टाकली आणि रंगाची कुंचली हातात घेतली. भारतातील एका डोंगराच्या कडेकपारीतील ही अदभूत चित्रे , त्यांच्या प्रतिकृती करून सर्व जगातील रसिकांसमोर मांडावीत आणि आपल्या अनुभवात त्यांना सामील करून घ्यावे, ही गीलची आकांक्षा होती. गिल-पारूच्या प्रेमकथेची स्वतःला आलेली अनुभूती समानशील रसिकांपर्यंत पोचवावी ही महानोरांची भूमिका आहे. खरे तर, भूमिका म्हणणेही बरोबर नाही. काळजाचा कब्जा घेणाऱ्या एका प्रबळ अनुभवाला शब्दांत साकार करण्याची ही उर्मी आहे.(म्हणूनच अडली मधली अवतरणे देऊन मी त्याची मोडतोड  करणार नाही.)  हा प्रवाह आपल्या वेगवान, झपाटलेल्या ओघात आपल्याला शेवटच्या शब्दापर्यंत घेऊन जातो, भावभावनांच्या लाटालहरीत खेचून घेतो. शेवटी त्या चार सुनी फकीरांबरोबर आपणही एक पान वाघुरेच्या पाण्यात सोडतो आणि एका चिरंतन प्रवासासाठी तापीतीराकडे गेलेल्या गिलच्या मोडक्या झोपडीसमोर फुलांची एक ओंजळ वाहतो. हा अनुभव रसिक वाचकांना यावा ही इच्छा आणि येईल हा विश्वास.


वि.वा.शिरवाडकर

 नाशिक, २३/११/१९८३.

०  अजिंठ्याचे शिल्पचित्र १८१९ मध्ये प्रथम ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नजरेत आले. निजाम सरकारचे कलासक्त मन, कलाप्रेमी मंडळी ह्यांच्या १८२४ साली अजिंठ्याच्या चित्रकलेसंबंधी युरोपात पत्रवाचन/विचार झाला. त्याच्या प्रतिकृती करायच्या योजना आखल्या. 

०  १८४४ साली चित्रकार मेजर रॉबर्ट गिल याची अजिंठ्याच्या प्रतिकृती निर्माण करण्यासाठी नियुक्ती झाली. ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचे क्वालिफाईड आर्टिस्ट होते. ईस्ट इंडीया कंपनीतील मिलिटरीत मेजर होते.(मद्रास)


० अजिंठ्याच्या डोंगरावर लेणापूर गावाची आदिवासी (की बंजारा?) पोरगी गिलच्या सहवासात आली. दहा वर्षांचे दोघांचे सहजीवन.


० २३  मे १८५६ ला पारूचा अकस्मात मृत्यू. अजिंठा गावाच्या दिल्ली गेटजवळ तिची स्मृती गिलने बांधली.
   ll टू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो ll हू डाईड २३ मे १८५६ ll


० १० एप्रिल १८७९ साली गिलचा मृत्यू. तापी नदीच्या किनाऱ्यावर भुसावळ येथे. तिथे संगमरवरी स्मृतीकबर आहे.
                                        ll टू द मेमरी ऑफ रॉबर्ट गिल ऑफ अजंठा ll


डोळ्यांना  डसले पहाड इथले ह्या गोंदल्या चांदण्या 

कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या ओल्या इथे पापण्या 

गाभाऱ्यास अजून ओंजळभरी गंधार्थ संवेदना 

बुद्धाच्या पडसावूलीत निजल्या ह्या राजवर्खी खुणा 

 

अजिंठा  
अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात 
काठाकाठातला 
झाडांच्या देठातला
रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला.
अजिंठा 
झाडांच्या झुलत्या प्रवाही गाण्यातला 
लेणापूर फरीदापूरच्या गावंढळ गर्तेतला.
बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा 
पिवळ्याजर्द शेतातल्या पिकातलं बारादरीतला 
काळ्याभोर दगडातला धबधबा झेलणारा.
अजिंठा 
अदभूत भव्य दिव्य स्वप्नातला 
प्रतिभावंतांच्या छिन्नीछिन्नीतला
जगड्व्याळ  चिरंतन नाजूक रेषांमधला 
रंगाचं आभाळ साठवून दगडांवर 
कभिन्न कातळातलं दु:ख 
घोटवून निर्यमक बुद्धाच्या कहाणीत 
शांत सचेतन 
पद्मासनातल्या गाभाऱ्यातला .

अजिंठा  
जगाचे अहंकार मोडून बसलेला 
नामोनिशान नसलेल्या कुठल्याच हातांचे 
ह्या निर्मितीतल्या.
इथल्या दगडातल्या सृष्टीला 
पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा 
एक बलशाली हात 
रॉबर्ट गिलचा.
चिलखती छाताडाच्या निळ्या डोळ्यांतला 
एक राजवर्खी झरोखा कुंचल्यांवर रंगांच्या 
जगभर युरोपच्या कानाकोपऱ्यात 
द्वाही घुमवणारा, अजिंठ्यातली .
त्याच्या  राजवर्खी कुंचल्यातल्या 
नाजूक बोटांना 
डोळ्यांना 
डोळ्यांतील नितळ समुद्राला 
चेतवून नेणारी एक अबलख पारू.
अजिंठा 
पारूच्या पिवळ्या शुभ्र फुलांचा 
फुलांच्या भारानं निस्सीम बहरलेला 
कुठे विस्कटलेला 
अजिंठा
पारूच्या  गर्भार डोळ्यांतला 
अजिंठा 
चिरकाल फत्तरातला.

सराई कोटातल्या बंदिस्त कडेकोट 
गेटमधून दरबारी दिमाखात हत्ती 
मंद पावलांचा 
बारादरीतल्या पाऊलवाटेनं अजिंठ्यात 
पुन्हा एकदा बुद्धाला सामोरा जाणारा. 
कित्येक हजार वर्षांनी साक्षात 
जातक कथांमधला. मलूल डोळ्यांचा 
दहापाच लोकांच्या सोबतीनं गिलसाब 
हत्तीवरून जाणारा.चिलखती छाताडाचा.
गोराभुरा तरणा. निळ्या डोळ्यांचा.
कुंचल्यांचा झुबका 
हजार रंगांच्या तबकड्या 
कागद पेन्सिलींच्या गाठोड्यात 
मेजर रॉबर्ट गिल 
त्याचे लखलख डोळे 
अथांग निळाईत आभाळाच्या. 
निळ्याभोर पहाडात अजिंठ्याच्या.

पक्ष्यांचे  दूरवर उडून जाणारे थवे पठारावर 
झिरकत झुलणारं काळ्या पहाडातलं 
पांढरंशुभ्र पाणी.
पाण्याच्या  वळणांचा पांढराशुभ्र प्रवाह दुरचा
बारादरीतला घुमणारा आवाज 
वाघुरच्या धबधब्यात.
पुढच्या नदीतली निस्सीम शांतता 
प्रतिबिंबित झालेली अजिंठ्यात 
त्याच्या अथांग डोळ्यांच्या पापण्यात.
दूरच्या दरीतला घुमटणारा आवाज 
मोरांच्या स्वरांचा 
त्याचा पडसाद उमटत जाणारा 
अजिंठ्यातून दूरवर.....दरीदरीतून 
गिलच्या डोळ्यांसमोर मोरणी 
निळ्या जांभळ्या रंगांची.
पिसा-यातली.थुईथुई पावलांची.
झुलत्या झाडांच्या रांगा 
वरती भरगच्च भरलेलं आभाळ.


हत्तीवरून उतरताना 
वाघुरच्या पाण्यात 
गिलचे पाय आपोआप 
नाचू लागतात.

अजिंठा  वाघुरच्या पाण्यात.
पाण्याच्या निरभ्र प्रवाही आरशात 
प्रतिबिंब 
काळ्याभोर गर्द पहाडाचं.
लेण्यांचं.
त्याचे  डोळे अधीर उत्सुक 
बेहद्द धावाधाव पावलांची.
दहा पाच माणसांची.
बोली नीट कळत नाही 
तरी समजून सगळ्या 
असल्या नसल्याची 
सवयीनं हळूहळू सोबत लोकांची.
तबकड्या, भेंडोळे, कागदांचे कुंचले टाकून 
पहिल्या दरबारात लेण्याच्या 
तो विरघळून जातो पूर्णाकार.
गर्भगळीत त्याच्या शरीरातल्या 
शक्तीचा सगळा पारा निथळून पडतो 
तो पुन्हापुन्हा छिन्नीतल्या 
दवी रेषांवर दगडांच्या 
नजर टाकून पाहतो.
रंगांचे आवर्त. प्रभामंडळातले 
पुष्पमाला घेतलेले गंधर्व 
ओठांवर मुलायम लालसर रंग 
गोंदणारी शृंगारातली सकवार बाई 
शिबी राजाच्या गोष्टी.
गौतमाच्या पूर्वजन्मीच्या 
जातक कथा कित्येक भिंतीभिंतींवर.
राजवाड्याचे दालन 
कुठल्या रंगाचे आरेखन
त्याचे  डोळे विच्छिन्न होतात पुन्हापुन्हा.
गिल अधाशी डोळ्यांचा. पुन्हापुन्हा अस्वस्थ.
पद्मासनातल्या भव्य गौतम बुद्धाच्या 
मूर्तीजवळ थांबतो 
मान उंचावून टकटक पाहतो 
सुन्नपणानं बुद्धाच्या पायाजवळ बसतो
नि:शब्द 
आपण काय पाहतोय त्याला कळत नाही
क्षणभर. तो कंदिलाचा, मशालीचा उजेड 
भिंतीजवळ घ्यायला सांगतो.

मी  जगातला एक श्रेष्ठ चित्रकार.
त्याच्या अहंतेचा अंधार निथळून पडतो सरकन
तो  अबोल 
अधीर कित्येक दिवस.
सत्तावीस लेण्यांमधून 
भणंग भटकताना.
हाताला कांहीच सामर्थ्य नसल्यागत.
एकाकी.
त्याचे तरारलेले डोळे 
पुन्हा बहरून येतात 
कागदावर हळूहळू रेषा उमटतात
आपोआप रंग ओले होत जातात.


हत्तीवरून 
अजिंठा गावाला गिलचं जाणं येणं 
थकणं. कधी कित्येक दिवस 
तिथेच झोपडी बांधून राहणं.
सावरखेड लेणापूरची मोलकरी मानसं साथीला.
दिवाबत्ती माशालीसाठी. कागद कुंचल्यासाठी .
त्याचं खाणंपिणं मांस शिजवण्यासाठी. 
कळत नसलेलं गाणं नाचणं
शेकोटी  पेटवून रात्री अजिंठ्याच्या 
डोंगरदरीत छोट्या झोपडीत ऐश्वर्यात 
न कळणाऱ्या अनोख्या बोलीत 
अडाणी माणसांच्या जगात 
मेजर रॉबर्ट गिल 
आता फक्त चित्रकार गिलसाब.
माणसांचा आदब निजामी नजाकतीतला.
लाजवाब
हळूवार 
अजनबी बोलीतला.
बोली कळत नाही नीट 
तरी माणसांना समजतं
समजून घेणारी नवी 
अबलख बोली अजिंठ्यात.
नवी रंगशाळा 
अजिंठ्यातल्या हिरव्या पसाऱ्यात.


पाण्यास बिलगले ऊन 
रंग विखरून 
थिरकले मोर 
शब्दांवर मुरडत 
हुरळत गेल्या 
मोरणीचा लयाभर.


अलवार फुलांची होरी 
राजसगोरी
गहिना गौर 
ह्या कळ्या फुलांचे 
रंग नवे गर्भार.


एक 
दोन 
तीन
झपाटून गेलेला रॉबर्ट गिल 
पाच सहा महिन्यांत.
डोळे तारवटलेले
नव्या रंगांचा शोध 
नवा रंग 
नवी रेषा 
भिंतीवरली नवी चित्रं
त्यातलं अफाट सामर्थ्य.
तो  त्याच्या देशीच्या राजाचं
पत्र वाचून पुन्हा बहरतो 
नवं आव्हान झेलून 
रोज नवे रंग मिसळतो.
दिवस रात्र बेचैन 
त्याला मोडून टाकणाऱ्या अजिंठ्यात.
तो मंत्रमुग्ध बेचैन 
कागदावर रंग उभारताना.

पहिल्याच  लेण्यातली 
ती पाठमोरी बाई.
एक दोन तीन चार 
तो कित्येक दिवस हतबल 
तिची छबी प्रतिरूप करण्यात.
तजेलदार ती पाठमोरी 
त्याकाळीही इतके कमी कपडे?
तो हसतो.
पाठीवरला गडद गर्द रंग अर्ध्या भागावर 
लालसर विटकरी 
पाठमोरी निसरड्या स्तनाच्या उभारपणावर
कुंचला थांबतो.
दंडातले  मनगटातले गळ्यातले दागिने 
तिला, पाठमोरीही सुंदर.
जमिनीवर बसलेल्या तिच्या 
शरीराचा भाग, त्याचा रंग किती फिका करायचा? 
त्याहूनही त्याची बोटं अंबाड्यावर थांबतात 
अंबाड्यावर पांढऱ्या पिवळ्या ठीबक्यांचा 
फुलांचा गजरा.
कसा काय माळायचा?
फुलं पुष्कळ झाली.

पुन्हा  पुन्हा हातात ब्रश घेऊन रिकामा 
तो अस्वथ.बेचैन.
काय रंगवायचं राहिलं?
तो विलक्षण कासावीस 
नुसत्या रिकाम्या कुंचल्यात.
ती पाठमोरी.


तिनं फक्त एकदा पाहावं 
पाठमोरी इतकी सुंदर...
समोरी कशी दिसेल?


तळ्याकाठी 
निराभ्रसं
कर्दळीचं बन 


पाण्यात चांदणं
थोडं, लाज पांघरून.


थोडे तरी डोळे वळो
मान वेळावून 
पाठमोरी अंग 
झाले पहाड अनंग 


तो मागे वळून पाहतो 
तोच नि:शब्द गाभारा 
खांबाजवळ पेंगुळलेली 
दोनतीन  नि:शब्द रोजंदार मानसं 
शिडीवरला एकटा कंदील 
मंद प्रकाशातला गौतम बुद्ध 
पापण्या मिटलेला. भिंतीचे रंग....रेषा 


गाभाराभर फुलांची दरवळ 
कुठून उमलते कांही कळत नाही.
पाठमोरीच्या अंबाड्यातल्या गज-याकडे पाहातो
आणि त्याचा त्यालाच हसतो.
 त्याच्या श्वासांना पुन्हा भास 
सुगंधी  दरवळ गाभाराभर 
शिडीवरून खाली उतरताना 
पिवळी पिवळी पांढरी फुलं ओंजळभर 
फुलं कोण आणत असणार? 
भिंतीवर पुन्हा पाठमोरी बाई 
राजाराणीचं शृंगारातलं 
राजमहालातलं चित्र


पिवळ्या शुभ्र फुलांच्या दरवळीनं तो आणखी बहरतो.


पलीकडल्या सुंदर शिल्पांच्या खांबाआड 
थोडी किणकिण 
बांगडयांसारखी.
एक निसटती सावूली 
पोरसवदा.


गिल तिला बोलावतो खुणावून 
बोली नीट कळत नाही म्हणून वैतागतो 
ती  लपझप पळणारी 
गाभाऱ्याबाहेर.भित्री. बावरलेली.
झाडांच्या आडोशाला 
गुडघाभर घाग-यातली 
चोळीच्या गाठीतली.साधी 
निळ्या भिरभिर डोळ्यांची.
पंधरा वीस वर्षांची.
अंबाडा बांधलेली 
झाडांआड....पाठमोरी.


मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले 
घनगर्द  सावल्यांनी आकाश वाकलेले 
पाऊस पाखरांच्या पंखांत थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी 
घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वाटा
गात्रात कापणारा ओला फिका पसारा 
मन चिंब पावसाळी 


गिलच्या डोळ्यांत तरतरी 
नवी उभारी 
अजिंठ्याच्या भिंतीवरली
ती पाठमोरी बाई--
ये
जरा सामोरी ये 
गिल विलक्षण व्याकुळ 
हिरव्या झाडांच्या सावल्यांत.
ही फुलं आणते पिवळ्याशुभ्र रंगांची 
दरवळ असलेली 
एक दोनदा हिला माणसांनी 
भाकरी थापायला आणलं आठवतं
ही लाकडं विकणारी.
एकदा सशाचं मांस बेहद्द शिजवलं होतं 
महिन्या दोन महिन्याआधी.
तेंव्हा अस्पष्ट तिचे निळे डोळे पाहिले होते 
टपोर निळे डोळे.....
ती हीच असणार गोरीभुरी 
तिच्या न्याहारीच्या फडक्यात 
तांबड्याजर्द लाल काळ्या ठिपक्यांच्या 
गुंजा बांधलेल्या, झोपडीत राहिल्या होत्या. 


पिवळ्या जर्द फुलांची दरवळ सबंध अजिंठाभर.
सावळ्या मेघांचे आभाळत बन मन वेटाळते
तिला कुठलीशी जुनी आठवण पांघरून जाते.
गोबऱ्या गालांची मंजुळ बोलांची अश्शी हरखते 
तिच्या निळ्याभोर अश्राप डोळ्यांना पाखरू वेढते.




सतराव्या लेण्यातली चित्रं 
पुन्हा पुन्हा पाहण्यात गेलेले कित्येक दिवस 
रंग रेषा कुंचला कुठेही ठरेना कागदावर 
राजमहालातलं राजाराणीचं चित्र 
मागच्या भिंतीवरली शृंगाराची तसबीर टांगलेली 
तसलाच पेहराव शृंगारातला सगळ्या राजमहालात 
राजमहालातच दुसऱ्या दालनातल्या भिंतीजवळ 
दासींची बोलणी हळुवार...कानातली.
राजाराणीला मिठीत ओढताना 
मांड्यांच्या किनारी घेताना 
त्याचा ब्रश थोडासा सूक्ष्म होत जातो 
तो पुन्हा पुन्हा चितारत राहतो 
तरीही मनासारखं उमटत नाही 
तो अस्वस्थ.


शिडीच्या पायांशी ओंजळभर फुलं 
तिच्या डोळ्यांत तो पाहातो....खुणावतो.
ती फुलं त्याच्या हातांत देते अलगद 
तिचे दोन्ही हात तो हातात घेतो गच्च 
 ती धांदरट
घाबरते 
तो निसटू न देता तिला जवळ घेतो 
कंदिलाचा दिवा तिच्या हाती देतो 
काही सांगण्याचा प्रयत्न करतो सारखा 
त्याची चीडचीड अस्पष्ट 
न कळणाऱ्या बोलीची.
कंदिलाच्या उजेडात 
काठीनं राणीचा रंगमहाल दाखवतो 
तिचा एक हात हातात घट्ट धरून घेतो.
राणी राजाच्या अंगाशी कलंडलेली.
धरलेल्या हातातली किणकिण 
अनोख्या बोलीतली 
तो फक्त पाहत राहतो 
तिच्या टपोर निळ्या डोळ्यांत 
त्यानं कुंचला पुन्हा उचलला 
कुंचला खाली पडला आपोआप.
हात खुपच गळून आलेला 
तो खुणावतो नुस्ताच काही.....
पाणी डोळ्यांवर मारून 
सुस्त गाभाऱ्यात पडून राहतो.


किती तरी वेळ तो सुस्त पडून 
रोजंदार मानसं झोपडीला निघून गेलेली.
अंधार वाढत जाणारा दुरात 
कंदिलाचा मंद फिका उजेड 
लेण्याच्या भव्य गाभाऱ्यात.
शांतता वाढत जाणारी 
गिल खुपच थकलेला 
गाभाऱ्यात सुस्त पडलेला 
उजव्या हाताला वळवून सारखा 
दुखऱ्या अंगावर 
झोपेत बरळत थकलेला गिलसाब.....


थंडगार स्पर्शानं त्याला तजेला येतो थोडाफार 
तो कण्हतो. कूस बदलतो. 
लेण्यांतल्या दगडाच्या लादीवर मेजर रॉबर्ट गिल.
त्याच्या उजव्या हाताची बोटं चोळणारी 
नाजूक बोटं.
तो पुन्हा कांही बरळतो.
त्या बोटांच्या स्पर्शानं त्याच्या सबंध शरीरात सळसळ 
चेतना.
हळुवार बोटांची लवलव त्याच्या गोऱ्याभुऱ्या कातडीला.
त्याच्या पापणीवर रंगमहाल 
तिथले रंग. त्याचा दुखरा हात. 

आख्खं जग ह्या चित्रकृती पाहताना 
पागल झालं पाहिजे.
माझा युरोप. आख्खं जग मला डोक्यावर घेईल.
माझा कुंचला युरोपच्या गॅलरीच्या अग्रभागी राहील.
 ह्या अजिंठ्यांच्या दगडांना लाखोंचे पाय लागतील 
लोक नतमस्तक होतील. 
कितीही मी थकलो तरी हे झालं पाहिजे.
लवकर. दोन पाच वर्षांत.


हे बुद्धा, तुझ्या पावलांशी मी पडलोय इथे 
देशपरदेशात. तू दु:ख वेचणारा महात्मा 
तुझ्या ह्या दगडांच्या लादीत मला सुखी ठेव.
तो बरळत राहतो....
मुलायम बोटांनी पुन्हा सुखावतो.
पापण्या उघडतो 
तिचा हात आणखी घट्ट पकडतो.
ती बाजूला सरकू पाहते 
तो बोलतो तिच्याशी काहीबाही : 


तू कुठली गो S बाई --
इवल्याशा इथल्या लेणापूरची?
परदेशी.....आदिवासी कोण गो S बाई?
अडाणी.सुजाण.सगळं समजणारी.
तू  रोजंदार 
कशाला घेऊन येतेस फुलं माझ्यासाठी?
कशाला शिजवून घालतेस चांगलं अन्न, चांगलं मांस.

माझा  देश कुठला 
माझा गाव कुठला 
कातडी कुठली 
साता समुद्रापलीकडला मी 
कुठल्या कुठे आलो 
का आलो मलाही नीट कळलं नाही. 
पोरी 
तू नादान 
पण तुला समजतं 
माझं चित्र व्हावं म्हणून तुझी धडपड असते. 
पोरी, तुझ्या डोळ्यांत मी गुंतून पडलो.
हे बरोबर नाही 
माझ्या सुखासाठी तुला 
वणव्यात कसा धाडू मी 
एकदोनदा पाहिलं 
खेड्यापाड्यातला हा देश 
ही तुझी मानसं अगदी निराळी बाई....
तू सुखी राहावं म्हणून तुला रोजंदारीतून सोडलं कितीदा 
तू सोसलं.
पण तू येतेच आहेस अजूनही.
कशासाठी?
जवळ ये 
मला सांग 
कुठल्या  ऋणानुबंधात बांधू तुला मी 
तुला महाग पडणार बाई परवा हाहा:कार झाला 
धिंगाणा घातला माझ्या झोपडीवर 
मी मिलिटरीतल्या चिलखती छाताडाचा 
म्हणून सावरलं
तुझ्या गावच्या जातीतला रंगमहाल 
तुला लखलाभ असो.
तुझी मानसं तुझ्याजवळ असू देत पोरी 
तू फार वेडी नादान आहेस अजून.....
तो बरळत मधेच थांबला 
पुन्हा क्षीणसा बोलता झाला.


मेजर गिलच्या डोळ्यांतून 
खळाखळा पाणी. ओघळणारं.
ती भांबावली.त्याचे डोळे पुसत राहिली.
कंदिलाचा मंद फिका हलणारा दिवा 
आणखी गडदगार अंधार.
तो तिच्या डोक्यावरून बोटं फिरवतो.
तिचा अंबाडा सैलसर होतो 
केसांवरून त्याची बोटं फिरत राहतात 
सबंध शरीरभर चरत जातात 
चोळीच्या गाठीवर तिच्या अंगांगांवर 
लख लख लाखेरी विजा चमकतात.

ती  त्याला अधिक बिलगून राहते 
आयुष्यभरासाठी काही मागते 
त्याची कुंचल्याची बोटं 
तिच्या पोटावरून मांडीवरून हळुवार सरकतात 
पिवळ्याजर्द फुलांचे मखमाली तरारलेपण 
अंधारबनात दोघांचं आयुष्य बांधतात.




पानं कानात सांगतात 
पानं पांगतात.
चाहूल लागताच 
(पानं शरमिंदी होतात)
आपसात  डोळेझाक करतात.


गिलच्या डोळ्यांना अधिक ताकद येते 
जग जिंकण्याची 
तो पारूच्या डोळ्यांत पाहातो डोळे टाकून 
लेण्यांच्या समोरच्या टेकडीवर बांधल्या 
त्याच्या झोपडीत राहिलेले रंग गिरवतो 
कधीतरी अजिंठा गावाला जाणंयेणं निमित्तमात्र.
इथल्याच झाडातून जंगलातून भटकणं दूरवर 
पारूच्या सहवासात. त्याच्या आयुष्यात 
एक अनोखी दरवळ 
त्याला चेतवीत नेणारी 
त्याला बहरून टाकणारी.
चित्रांच्या प्रतिकृती करताना 
बेमालूम झपाटून टाकणारी.
एक अनोळखी जादुगरी
अनाहत आलेली बोटांवर,
मनावर, पिकातल्या पाखरांसारखी 
अजिंठ्याच्या  लयभोर गाण्यात 
कुठल्या नव्या बहरल्या वाटांवर.


भर उन्हाचं
वाघूर नदीच्या पाण्यात तिचं न्हाणं खडकावर 
तिचं शरीर नग्नकाय न्याहाळताना 
पाण्याच्या प्रतिबिंबात 
आभाळ उतरावं पाण्यात लखलख
एक विराट रूपसंहिता लेण्यांची.

गिलसाब अल्लद
समोरच्या लेण्यांमधून कुंचला सोडून 
हंसीचं लाख मुरडणं हंसा समोरचं
लेण्यातलं चित्र रंगवलेलं काल परवाचं
ताज्या आठवणी डोळ्यांत 


त्यानं केस विचारले तिचे 
लांबसडक पाठीवरून गोऱ्यापान 
अंगावर तिचा केशसंभार मोकळा 
तजेलदार उन्हाचं तिचं गर्भारपण 
चांदणं पाण्यात उमटावं तसं
प्रतिबिंबात पाण्याच्या.
त्याच्या डोळ्यांत उडत्या राघूंचा किलकिलाट.
दूरचे हिरवे पंख आणखी 
झाडांतून पिकांतून दूरवर गेलेले 
हेलकावे दरियापार.
उघड्या खडकावर नदीच्या काठावर 
दोघांचं प्रतिबिंब 
आणखी एक लेणं कोरलेलं शिल्पाकार 
नितळ पाण्यात.
चिवचिव गाण्यात 
निळ्या डोळ्यांत तळ्याच्या.
पलीकडल्या खडकावर 
बगळ्यांच्या रांगा 
निमूट दूरवर.
दरीकडून मोरणीची लकेर 
अल्लद पावलांचा ठेका.
अजिंठा गर्भार.
बगळ्या बगळ्या फुलं दे फुलं दे 
पाची बोटं रंगू दे रंगू दे 
एक बगळा उडाला उडाला 
तळ्यात जाऊन बुडाला बुडाला.


मेंदीभरल्या हातांची हातांची 
डोळ्यांमधल्या झोताची झोताची 

बगळ्या बगळ्या फुलं दे फुलं दे 

दोन पाच माणसांच्या सोबतीनं गिल आता 
संपूर्ण गढलेला लेण्यांच्या दरबारात.
त्याच्या डोळ्यांत रंगांची धुंदी अपरंपार.
विराट स्वप्नमयी शिणगार
झाडांना नवतीचा बहार. 
 फाल्गुनातल्या चांदण्या रात्री 
दूर डोंगरावरून भटकंतीत दोघं
लेणापूर गावात. तिथून सपाट पाठरातल्या 
पिकातून ज्वारीतल्या.
सावरखेडच्या शिवारावर 
हुरळून गेलेली दोघं घोड्यावरून दूरदूर 
एकट्या रात्री नुस्तीच नंतर भटकंती 
डोंगरावरून खाली प्रचंड खोलवरच्या 
सपाटीच्या प्रदेशात. दूरदूरच्या रानात. 
दूरवर गाण्यांचे पडसाद फाल्गुनात 
होळीच्या लाल जर्द ज्वाला आणखीन 
बंजारा नाचातली बायका माणसांची 
लयभरली गाणी.
झिम्मड झांजरक्यात.
लाल होरी आयी र S
लाले र खेतमा
छुन छुन पायलिया 
बाजै र पैरमा 
हो S__

लालजर्द घोड्यांची खिंकाळ तांड्यावर 
चांदण्यात रात्रभर भटकंती दोघांच्या अंगात होरी 
बंजारा तांड्याच्या होळीच्या गाण्यात 
बायका मनसोक्त झिंगून नाचणाऱ्या 
लालजर्द रंगीन नक्षीदार घाग-यातल्या 
माणसांचा फेर घेताना रिंगण मारून 
ढोलकीच्या ठेक्यावर 
एक गाणं पारुला हरवून टाकणारं
तिचे पाय हलतात आपोआप 
पोटातल्या गर्भासारखे 
अल्लद....अलवार. ठेका वाढत जातो आणि 
बंजारा बायका तिचा फेर धरतात आपोआप.
पारो झिंगून झुलणारी होळीच्या जल्लोषात 
माठातली मोहाची दारू रिचवून 
गिलसाब बेहद्द विसरून सगळं 
होरीच्या गरबारी बंजारा गाण्यात.
दिवस चांदण्यांचे 
भरल्या बहरांचे.   

नाचणं गाणं 
मुद्दाम एकदा गिलसाबच्या लेण्यात 
पैंजणातल्या पिवळ्या पावलांचं 
हौसेनं. होरीतल्या हरवल्या आठवणी.
त्यानं चित्र रंगवलं तिचं कुंचल्यात 
पैंजनातल्या  हलक्या पिवळ्या पावलांत.
कुठल्या किलबिल गाण्यातल्या बोलीतलं
निळ्या डोळ्यांतलं बहरणारं 'दरबारी' लेण्यात 
बुद्धा सामोरी
एक होरी. 

तळपायांवर मेंदी ओली.
अनघड कुठल्या 
गाण्यामधली, मंद्र मदालस 
तिच्या निळ्या डोळ्यांत भिरकली 
लाल पाखरे नभाळ्यातली 

थिरक बिथरली 
ती स्वर ओली.
पैंजणातली हळवी बोली.....
तळपायांवर मेंदी ओली
भिंतीवरला रंग अबोली....
ती दुपारची 
एकटी झोपेतून उठताना ओरडली 
झोपडीबाहेर आली तेंव्हा 
कोणीच नाही जवळपास, तिला भास 
मानसं गिलसाब सगळे लेण्याच्या गाभाऱ्यात.

तिला स्वप्न पडलं
वाईट वखोटं   भीतीचं
तिची धडपड तिला धांदरून टाकणारी.
तिच्या स्वप्नात सतरावी लेणी 
पहाडाएवढा गौतम बुद्ध 
जगाचं दु:ख कमी करायला निघालेला.
शांत करून डोळ्यांचा.
शुभ्रलांब अंगरख्यातला 
भिक्षापात्र घेऊन त्याच्याच दाराशी 
बारा वर्षांनी.
त्याची बायको यशोधरा दारात उभी 
मुलगा भिक्षा वाढणारा 
ती कारुण्यमयी भीतीग्रस्त.
मनानं मोडलेली.बाळाला सावरते.
कित्येक वर्षांनी नवऱ्याला साक्षात सामोरा बघावं
भिक्षापात्र घेऊन.
पुन्हा त्याच वाटेनं त्याच दारात 
महात्मा गौतम बुद्ध, करुण डोळ्यांचा.


ह्या जगातल्या दु:खाला कुठेच किनारा नाही. 
ह्या जगातल्या कारुण्याला  कुठेच किनारा नाही.

 अनंतापार त्याची पाळंमुळं जख्खड जडलेली.
पारू किंकाळी मारते मोठ्यांदा 
सबंध अजिंठ्याच्या दरीतून 
वाघूर नदीमधून ध्वनी उमटतात तिच्याच शब्दांचे 
गिल आणखी मानसं धावत येतात झोपडीवर 
काहीच नाही.
मी ओरडलेच नाही.
गिल रिकामाच हसतो. 

तिच्या डोळ्यांत तुडुंब पाणी 
भेदरलेली त्याला बिलगते 
झोपडीत कांही वाजल्याचा 
भास झाल्याचं सांगते.
बारा वर्षांनी दारी आलेला 
गौतम बुद्ध बायकोसमोर.
काय वाटलं असेल?
ती पुन्हा बावरते.

माया 
मायाजाल 
रक्ताची मानसं 
आई लहानपणी गेली
तिच्या थोड्या आठवणी.
बारादरीच्या पलीकडचा धबधबा 
पांढराशुभ्र धोधो 
उंचउंच गेलेला काळा पहाड 
तिथल्या झाडांच्या पलीकडलं लेणापूर 
पन्नास घरांचं. तसं चांगलं.
तिथला माझा गोतावळा रक्ताचा 
मला दुरावलेला. माझ्या मांसातला.
जातीतच लगीन कर म्हणणारा.
गोतावळा खरा पण मतलबी 
पापी
पैशांच्या लोभातला.
 खोट्या प्रेमाचा 
खोट्या मायेचा.
निदान माझा भाऊ तरी खरा  :
नाही.
तोही खरा नाही.
मला पैशांवर श्रीमंत म्हाताऱ्याला 
विकू पाहणारा.
वाटतं कधी जाऊन यावं
भेटून यावं एकदा मनमोकळं
पण त्यांनी मला वाळीत टाकलं
त्यांनी छळलं 
गिलसाब 
तू भरल्या छातीचा म्हणून माझा जीव 
ह्यांनी मुडदा पाडला असता आजवर.
मी  लेणापूरच्या शेतीत काम केलं थोडंफार 
लोकांना चांगलं पाहता येत नाही गिलसाब.
फरदापूरला लाकडांची मोळी विकत घेताना 
मला वखारीत पकडलं गावच्या
थोराड भल्या माणसानं.
मला धामधूम पळता आलं नाही.
कुठेच ओरडता आलं नाही.
गिलसाब 
गरिबांना अब्रू नसतेच का ह्या दुनियेत?
गरीबानं सुंदर असू नये का ह्या दुनियेत?
गिलसाब ,
मी बाटलेली भ्रष्ट बलात्कार झालेली 
नंतर चालतच नव्हते चांगल्या जातीपातीत माझ्या 
कुठून आली ही कुलशीलाची अस्सल जात?
माझ्या जगण्यातला दोष कुठला गिलसाब ?  

गिलसाब,
तू कुठला माणूस दूर देशातला  
पद्मपाणी बुद्ध, हा अजिंठा 
तू छबीदार उतरविला जसाच्या तसा
तू कसा काय कारागीर?
तू माणूस नाही बाप्पा 
तू मला देव वाटला.
अदभूत  जादूगार वाटला.
तुझे डोळे 
तुझी बोटं 
कुंचला 
गिलसाब 
त्यासाठी मी माझं सगळं आयुष्य तुला दिलं.
अजाणतेपणी.
मला काही कळत नाही 
ते केलं  खरं.
तुझ्या सरकारचं काम 
तुझ्या कामासाठी हजार लोकांची दुवा मिळणार.
चांगलं काम वाटलं म्हणून मी केलं 
तुझ्या थकल्या हाताला थोपटलं. बळ दिलं.
तू जगाचं काम करतोय तुझ्यात मला माणूस दिसला 
तुझ्याशी लगीन लावलं बुद्धासमोर 
शब्द दिला.
मी केलं यात पाप आहे का?
कुठलं पाप?
मी पाप केलं सगळ्या खेड्यातली लोक सांगतात 
असलंच पाप तर मी एका चांगल्या गोष्टीसाठी केलं 
त्यानं तशी बुद्धी दिली. मी काय करू?


गिलसाब,
माझ्या पोटात गरगर होतंय खुपच.
मला सोडू नको.
गिलसाब दिवसादुपारी मला स्वप्नं पडतात भयाण 
धबधब्याचं पाणी किती 
उंचीवरून पडतंय डोहात.
गिलसाब
मला  डोहात यशोधरेचा राहूल दिसतोय....
झोपडीबाहेरच्या हिरव्या डोंगर कठड्यात 
तिला तो घट्ट बिलगून कवटाळतो 
मेजर रॉबर्ट गिलच्या डोळ्यांतला प्रवाह 
अखंड तिच्या अंगावर ओघळत राहतो : अबोल.

मन  ऐसे डोहाच्या गडद गर्द पाण्यापरि
देहावर चरणाऱ्या गर्भाला बळ भारी
मन माझे अवसेचे.विझलेल्या नवसाचे.


अनेक चित्रांचे रंग भराभर जुळून येतात 
अलीकडे कित्येक दिवसांत त्याला भास होतात 
लंडनचे. क्रिस्टल पॅलेसचे.
तिथल्या विख्यात आर्ट गॅलरीचे.
त्याच्या डोळ्यांवर नकळत 
यशाच्या तेजस्विताचे धुरळ पसरते.
आपोआप जुळून येतात जातककथांच्या रेषा 
भराभर नक्षीदार छतांच्या गालीच्यांच्या 
झिळमिळ झालरी उमटतात जिवंत 
त्याच्या कुंचल्यामधून.
युद्धाचं आव्हान पेलणारे त्याचे बाहू.
बलदंड हात आज अजिंठ्यातही 
तितकेच समर्थ असतात.

खूप  मनासारखी उतरलेली 
कांही चित्रं त्यानं आज सोबत घेतली 
ब्रश पुसून ठेवताना 
माणसांना गज-यासाठी फुलं सांगितली.
अजिंठा गावाहून त्यानं मद्रासहून मागविलेली 
मोत्यांची माळ आज आणलेली होती.
म्हणून तो बहरून होता आज दिवसभर.
दोन हजार वर्षांपूर्वीची माळ 
ह्या अजिंठ्याच्या चित्रात 
रुपवती बाईच्या गळाभर चमचम उमटते.
आजही उजळून. त्यानं कितीदा पाहिलं 
तशीच माळ आणली मोत्यांची पारूसाठी.
पाठमोरी बाई.....
पहिल्या चित्राची आठवण त्याच्या डोळ्यांत.


लेण्यांतल्या पाऊलवाटेनं 
वाघूर नदीच्या पाण्यात उतरताना 
झुलणारं आभाळ पावसाळी 
संथ सरकणारं हळुवार...त्याच्या डोळ्यांत मावेना.
कसं टिपता येईल हे रंगरूप 
कागदांच्या झरोक्यात.
आपण चित्रकार.
थोर जगविख्यात.
कमकुवत कमजोर ह्या निसर्गाच्या विभ्रमात.
हे पक्षी पंख बुडवून 
अंगभर न्हातात निळ्या पाण्याच्या तावदानात 
भर्रकन उडून जातात तेंव्हा रंग हिनकळतात 
हे अनघड लावण्यरूप करण्याचं 
बळच नाही आपल्या कुंचल्यात.
गिल मश्गुल नदीच्या वाढत्या प्रवाहात 
काठावरून उडून जाणाऱ्या 
पंखांचा तांडा घनदाट आसमंतात 
शीळ वाजवीत पांढऱ्याशुभ्र झग्यात
झुलत झुलत जाणारा गिलसाब झोकात 

झोपडीजवळ आधी पोचल्या 
दोघा माणसांचा ओरडा 
छाती  बडवणारा.
तो कावराबावरा 
झोपडीच्या आत दाराशी नि:शब्द झोपलेली पारू
इथून कायमची 
घातपाताची कुठल्या विषबाधेची 
किंकाळी झोपड्यांमधून.
तो प्रचंड कोसळतो 
तिच्या निस्तेज अंगावर 
विझलेल्या टपोर निळ्या डोळ्यांच्या पापण्यांत 
पुन्हा पुन्हा पाहातो अजिंठा 
त्याच्या स्वप्नातला.
तो सत्य नाकारून तिच्याशी बोलत राहतो 
ओरडतो प्रचंड किंकाळी फोडून 
त्याच्यातला मेजर जागा होतो 
चिलखती बहुदंडात.
उडवून द्यावे बंदुकीचे बार दणादण चौफेर 
त्यांना फाडून टाकावं वाटतं
करून टाकावे त्यांचे संसार उध्वस्त 
भ्रमिष्टांचे.
बार भरावे बंदुकीत अन्
उडवून द्यावे हे सत्तावीस लेण्यांचे शिल्प.
ह्या रंगरेखा हा गौतम बुद्ध 
आता माझा उरला नाही.
तो मोठ्यांदा ओरडतो 
पारूच्या थंडगार बाहुपाशात.

तिच्या  पापण्यांवर निस्तेज अजिंठा झाकळलेला 
तिच्या गर्भार लेण्यांवर तो पांघरून घालतो 
चुरगळलेलं.
सबंध लेण्यांचं रूप गिरविलं लयभोर 
तिच्या लोकगीतांचे स्वर 
नाजूक पैंजणाच्या तालावर 
तिच्या डोळ्यांवर आभाळ गोंदवून ठेवलं होतं
जन्मदात्यानं
त्याचं बळ माझ्या बोटांना....
कुंचल्यांना.
जन्मभर जतन करण्याचं 
तिचं जीवघेणं योगदान आता आयुष्याचं
कुंचला  रंग उचलणार नाही 
तिच्याशिवाय अजिंठ्यात.
दु:ख दे अवकाशव्यापी नेत्र माझे 
बुब्बुळे जळलीत जळले चंद्र माझे.
ना आता उरला कशाचा खेद चित्ती 
नग्न भटक्या काफिराला शाप दे.


अजिंठा 
निस्तेज 
निरामय 
निराकार
नि:शब्द 
माहेराला लेणापूरला सांगावा धाडूनही
कोणी आलं नाही गोतातलं 
रक्तामासाचं तिचं जवळचं गणगोत 
काही उरलंच नाही म्हणे तिच्या पापानं 
सांगावा धाडूनही कुठल्याच गावाचं कोणी नाही.
गिल थकलेला.एकला. प्रेताच्या सापळ्यात.
त्याच्या डोळ्यांत मृत्यूचे सुन्नाट भयाणपण.
निदान तिचे अंत्यसंस्कार होवो तिच्या धर्माप्रमाणे 
ती सुखरूप राहो आभाळापलीकडल्या 
देशांतरीच्या गावी. तो विझलेला.
अजिंठा गावाला दिल्ली दरवाजाला प्रेत ठेवलं 
मानसं बोलावली. कोणीच फिरकलं नाही मुद्दाम.
कुठलाच समाज आला नाही दिवसभर 
दिल्ली दरवाजाच्या 
बारवेच्या विहिरीच्या वरल्या बाजूला 
पाण्याच्या ओघळाच्या झाडीत पारू 
निस्तेज एकटी. शेवटी.

गोऱ्या  कातडीचा 
हा आमच्या धर्माचा नाही 
आमच्याच वस्तीत जगलेला 
हत्तीवरला गिलसाब 
घोड्यावरला गिलसाब 
आमच्यापासून दूर राहत गेला.
कोणाला काय घेणं देणं?
काय आडनाराय  त्याच्याशिवाय आमचं ?
हिंदू पोरीला  फंद पाडून पाप केलं म्हणे अजिंठ्यात.
शिवशिव. त्याची सावली नको अंगावर.
तिच्या भरल्या पापाचा आम्हाला 
विटाळ नको गावभर.
कुठले रंग चितारले म्हणे कागदांवर 
सरकारच्या त्याच्या देशाला ते लखलाभ असो.
 आम्हाला कांहीच घेणंदेणं नाही 
ह्या दगडांच्या प्रकारात.
आमच्याच  प्रदेशात नजीक असूनही 
आम्ही पाहिलंही नाही कधी 
त्यानं काय पोट भरणारयं आमचं.

मेजर  गिल एकटा. सुन्न, सुळ्यांच्या 
खिळ्यांकडे पाहत दिल्ली दरवाजाच्या.
सुन्नीपंथाचे तीनचार फकीर 
पारुला अग्निडाग दिला 
हिंदूधर्मपद्धतीनं सगळं काही करून 
गिलसाहेबाला आधार झाले.
तिच्यासाठीच्या त्याच्या शेवटच्या इच्छांना 
त्यांनी बोळवण दिले 
वाघूर नदीत राखोंडीचे 
अस्थिकलशाचे त्यांनी शेवटचे पान सोडले.

पारुसाठी
गिलसाबसाठी 
सुन्नी पंथाचे फकीर सगळं काही विसरले.
हजारोंच्या वस्तीतून दोनतीन का असेना 
मानसं सापडल्यानं गिलसाब थोडे सावरले 
दिल्ली दरवाजाला 
बारवेच्या विहिरीवरती 
गंगा यमुना विहिरींच्या सावलीनं.
पारूच्या स्मरणाला सुंदर कबर केलं 


टू द मेमरी ऑफ माय बिलव्हेड पारो 

हू डाईड २३ मे १८५६ 

 

शुभ्र  पिवळ्या फुलांची ओंजळ 
कबरीवर ठेवताना त्याचे डोळे ओघळत राहिले.


बारादरीकडल्या दरवाजाच्या माडीवरल्या 
त्याच्या रंगशालेचे दिवस कोमेजून चाललेले
राहिलेलं काम थोडं फार वर्षभराचं 
नंतरचं कुठलं गाव असेल उजाड उडून जाण्याचं.

शब्दांत  गोठले दु:ख शब्द अलवार 
ग्रासली उन्हे झाडांना हिरवा भार 
काळीज कुरतडे खोल मुका आकांत 
घनघोर मनाच्या तळ्यात चंद्र विखार 
हा अथांग दरिया दु:खाची बारात 
आयुष्य उघडले लक्तरलेले हात.


तो आता दिल्ली गेटनं जाताना 
तिच्या समाधीवर फुलं ठेवायचा 
अजिंठा लेण्यांतल्या झोपड्यांत जगणं 
शक्यच नाही म्हणून गावात राहायचा.
झालेल्या महत्वाच्या चित्रकृती जवळपास 
पाठवून दिलेल्या त्याच्या परदेशात 
किरकोळ काही राहिलेलं काम रंगसंगतीचं
बाहेरच्या नक्षीचं
दहा वर्षांचा अजिंठा त्याच्या डोळ्यांत उतरतो.
पारूच्या रूपानं तो निखळून पडतो.
राहिलेलं काम तिच्या आठवणीनं पूर्ण करत राहतो.

लंडन. 
क्रिस्टल पॅलेस.
युरोपात पाठवलेल्या सुंदर चित्रकृतींचं प्रदर्शन 
सबंध अजिंठा ओतप्रोत. आर्ट गॅलरीत.
 महिन्याभराचं प्रदर्शन. तो उल्हसित होतो. 
आयुष्यात एक भलं काम झालं
लाखो लोकांसाठी.
सरकारनं माझ्या हाती विश्वासानं काम दिलं
मी चितारलाय अजिंठा बलवत्तर....
त्याचं मन भिरंगतं पार सात समुद्रापार 
क्रिस्टल पॅलेसच्या विख्यात आर्ट गॅलरीत
त्याचे  डोळे माणसांच्या झुंबडीत 
कलावंतांच्या , रसिकांच्या बेहद्द युरोपच्या गर्दीत.


युरोप.
क्रिस्टल पॅलेस.
सगळं  जग चित्रकृती पाहून चकित.
दोन हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास 
हे रंग..ह्या रेषा...हे सामर्थ्य 
माणसांनी निर्मिलेलं असूच शकत नाही.
हे अदभूत भुयारातून निसर्गदत्त आलेलं काही 
सर्वत्र गजबज. गाजावाजा.
लेख. अग्रलेख.
अजिंठा 
चित्रकार 
चित्रकार मेजर रॉबर्ट गिलचं जगात नाव.
पत्र तारा अभिनंदनाचे निरोप
खूप  लिहून येतं लोकांचं, सरकारचं
हुरळून गेल्याचे त्याचे दिवस 
थोडं दु:ख हलकं होण्याचे दिवस.
तो कलावंत 
जातिवंत चित्रकार 
त्याचे डोळे तारवटले जातात पुन्हा रंगांनी 
पुन्हा हत्तीवरून फिरून यावं अजिंठ्यात 
लाल घोड्याच्या रिकिबीत पाय टाकून 
टाच दयावी डोगरमाथ्यावर दूरवर.
अजिंठ्याच्या ह्या डोंगरात पुन्हा काही सापडेल 
त्याच्यातला चित्रकार पुन्हा बहरून येतो एकदा 
लंडन 
क्रिस्टल पॅलेस.
विख्यात आर्ट गॅलरीतल्या 
प्रदर्शनाचा बोलबाला महिनाभरात दूरवर.
अजिंठा 
रॉबर्ट गिल.
प्रदर्शनाच्या चोविसाव्या दिवशी 
आर्ट गॅलरीस प्रचंड आग.
सगळी चित्रं भस्मसात एकाएक.


काळी बातमी.
बातमीनं त्याचं काळीज कुरतडतं
तो वेडा होतो.अधांतरी बोलत राहतो 
कलावंत म्हणून तेवढाच आधार 
सबंध आयुष्य निथळून टाकलेलं दहा वर्षांत.
अजिंठ्याचा काळा पहाड 
सत्तावीस लेणी.
तिच्या आठवणीचं जे होतं तेही भस्मसात.
पारुमुळेच हे चितारलं गेलं
गिल वेड्यागत बोलत राहतो 
वेड्यासारखा कुठे भटकत राहतो अजिंठ्यात.




अजिंठा 
पेटलेला लालजर्द 
काळ्या जांभळ्या रक्ताच्या 
लालजर्द लाटा दूरवर झाडांतून 
पहाडातून एका अवसेच्या राती 
वणवा पेटलेला 
काळाभोर अजिंठा काळ्या फत्तरांचा 
काळी रात्र आणखी घटोत्कच गुंफांकडून 
अजिंठा गुंफांकडे येणारा ज्वालांचा प्रवाह.
एका रात्री गिल वणव्यात भेदरलेला.

अजिंठा  
निष्पर्ण झाडांचा 
सुनसान एकला 
पाचोळा झाडांच्या पावलांशी विकल 
सळसळ क्षीण पार विस्कटलेली.
उंच उंच पहाडापार गेलेली 
झाडं सागवानी निष्पर्ण 
घेरी घेणारी प्रचंड अवकाशात 
एकटी घार. अपार अथांग अजिंठा.
त्याच्या सुजलेल्या डोळ्यांच्या 
काळ्या कातळावर एक कलेवर 
त्याच्या उलट्या काळजाचे 
लंडनमधल्या आर्ट गॅलरीचे.
अजिंठा 
भस्मसात 
निळ्या डोळ्यांत.


गिल दगडांशी.....
अजिंठा लेणीतल्या पहिल्या गाभाऱ्यात 
थकल्या पावलांनी चढतो 
त्याच्या डोळ्यांत उतरू लागतात ते रंग 
ती पाठमोरी बाई...
अंबाडा 
पिवळी शुभ्र फुलं.
भिक्षापात्रातला बुद्ध आणखी यशोधरा 
तो किंकाळी फोडतो प्रचंड मोठ्यांदा.....
गाभाराभर सबंध 
पारूचा आवाज.
गिल घाबरतो 
एकटाच.
त्याला भूताडासारखा भास होतो 
प्रचंड उंचीच्या गौतमबुद्धाच्या 
पावलांशी आपोआप कोसळून पडतो.


पांगलेला पावसाळा वाट भरलेली धुळीने 
मोडक्या फांदीस घरटे वाळलेली शुष्क पाने 
दूर गेल्या पायवाटा....डोंगराच्या पायथ्याशी 
पंख मिटल्या झोपडीचे दु:ख कवटाळे उराशी 


अजिंठा लेणीच्या समोरच्या टेकडीतलं 
त्याचं मोडलेलं झोपडं
दांडीवरला तुटलेला हलणारा कंदील 
गिल साबला ओळखून खिंकाळणारा 
लालजर्द घोडा रिकिबीशिवायचा .
ओंजळभर  फुलं झोपडीशी टाकून 
तो पुढे निघतो 
पारुचं मोठ्ठ काढलेलं चित्र 
गाठोड्यात गुंडाळतो 
चार कोरडे ब्रश 
थोड्या पेन्सिली 
पाठीशी रिकामी बंदूक हलणारी 
उन्हाळ्यातलं वाघूर नदीतलं 
खांडोळी पडलेलं काळपट पाणी 
शेवाळी.

इथलं  काहीच  नकोय आता 
इथून  दूर कुठे तरी....
साता  समुद्राकडे.
कुठल्या  गावी ?
कुठल्या  मुलुखात ?
कुठल्या  वाटेनं ?
कुणासाठी जायचं ?
कशासाठी  जायचं ?
पुन्हा  थांबतो.
एकटा. नि:शब्द.

माझं  कोणीच नाही ह्या जगात 
माणसांना  टाळून 
गावांना  टाळून 
फरदापूरचा राजमार्ग सोडून 
तो  आडरस्त्यानं निघतो 
कोरड्या  शेतातल्या धसकटांमधून 
चालत  जातो दूरवर.
ती  आडवी पायवाट त्याला 
दूर  तापी नदीच्या प्रवाहाकडे घेऊन जाते 
अनवाणी  एकली 
त्याच्या गढूळ डोळ्यांतल्या सावल्यांसारखी 

 ००००००० 


संकलक  : प्रवीण कुलकर्णी










 


 






हंस-दमयंती

हंस-दमयंती

असंही असतं!!

an alcoholic

My photo
Pune, Maharashtra, India
Hi.. I am Pravin and I am an alcoholic....