Tuesday, 23 November 2010

आम्ही!

जगाची झोकुनी दु:खे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे?
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही

तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळीतो स्वप्ने
वधस्तंभास्तवे दाही दिशांना हिंडतो आम्ही

दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांची बोलतो आम्ही!

सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment