Thursday, 8 April 2010

निष्कर्ष


उगाच काळजी संभावितांना
-कण्हाया लागती दारू पिताना!

तसा झुंजार तो नावाजलेला
(तसा नावाजला गेला भिताना)

अहो ह्या पंगतीला अंत नाही
....अता पत्रावळी खाती शितांना!

भुकेलेल्या, तुझी पूजाच खोटी
हवे अश्रू तिच्या दैवी स्मितांना

दगा केला पुन्हा सामुद्रीकांनी
चला शोधू फरारी भाकितांना!

कसे झुंजले ते प्रस्थापितांशी?
विचार ह्या नव्या प्रस्थापितांना!

दिसे हे रक्त साध्या माणसांचे
(कुणी मारी न चाकू प्रेषितांना)

इथे ज्वाळाविना काहीच नाही
फुले मागू नये कोणी चितांना!


सुरेश भट
संकलन:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment