Wednesday, 31 March 2010

संसार


अरे, संसार संसार
जसा तावा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर!

अरे, संसार संसार
खोटा कधी म्हनू नही
राउळाच्या कयसाले
लोटा कधी म्हनू नही

अरे, संसार संसार
नही रडन कुढनं
येड्या, गयातला हार
म्हनू नको रे लोढन

अरे, संसार संसार
खीरा येलाव-हे तोड
एका तोंडा मधी कडू
बाकी सर्वा लागे गोड

अरे, संसार संसार
म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे
मधी चिक्ने सागरगोटे!

ऐका, संसार संसार
दोन्ही जीवाचा इचार
देतो दु:खाले होकार
अन सुखाले नकार

देखा, संसार संसार
दोन्ही जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखदु:खाचा बेपार!

अरे, संसार संसार
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्यावरती मदार

असा संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मग जीवाचा आधार!


बहिणाबाई चौधरी
संकलक:प्रवीण कुलकर्णी

No comments:

Post a Comment